हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमूला प्रकरण दिवसेंदिवस चिघळले जात असून,यानिमित्ताने अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत,देशातील आरक्षणधारक मागाससमाज आणि विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची आणि प्रतारणेची भावना घट्ट होत चालली आहे.रोहित वेमूला प्रकरणास सरकारमधील नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थ्यी संघटना ज्या पद्धतीने व्यक्त होत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरून त्यांची नियत संशयास्पद आणि दलित मागास समूहविरोधी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.मनुष्यबळ आणि विकासमंत्रालय मंत्री स्मृती इराणी यांनी रोहित वेमूला आत्महत्येप्रकरणी धादांत खोटी आणि बुद्धिभेद करणारी विधाने केलेली आहेत.त्या म्हणतात त्यांच्या खात्याने कोणत्याही प्रकारचा दबाव हैद्राबाद युनिव्हर्सिटीवर आणलेला नव्हता,
हे त्यांचे म्हणने मान्य करायचे तर मग त्यांनी विद्यापीठाला कडक कारवायी करा अशा आशयाची पाचपाच पत्रे कोणत्या उद्देशाने पाठविली होती? हा प्रश्न इथे उपस्थित होतो.
स्मृती इराणी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या विद्यापीठाच्या चौकशी समितीमध्ये चौकशीप्रमुख अध्यक्ष “दलित” प्राध्यापक होते.वस्तुस्थिती अशी आहे कि समितीअध्यक्ष किंवा सदस्यसुद्धा दलित नव्हते तर ब्राह्मण होते. हे या मंत्रीबाई का दडवत आहेत?
या त्यांच्या धादांत असत्यकथनामुळे चिडून विद्यापीठातील २० पैकी १० दलित प्राध्यपकांनी आपल्या प्रशासकीय पदावरून राजीनामा दिलेला आहे.
स्मृती इराणी म्हणतात विद्यापीठात काही राष्ट्रविरोधी कारवायी करणारी मुले होती त्यांच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला,रोहित आणि त्याची संघटना हिंसक कारवाया करते,त्यातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थ्यी सेनेच्या अध्यक्षाला मारहाण केली,वस्तुस्थिती अशी आहे कि विद्यापीठाने गठीत केलेल्या चौकशीत कोणतीही मारहाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत,आणि हि गोष्ट लिखित स्वरूपात समितीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.याचा अर्थ जो मारहाणीचा कांगावा केला जातो आहे ती प्रत्यक्षात झालेलीच नाहि.वस्तुतः सुशीलकुमारला अपेंडिक्सचा त्रास होता त्याकारणाने त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते.स्मृती इराणी म्हणतात रोहित वेमूला ‘दलित’ नाही,केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याप्रमाणे तो ओबीसी प्रवर्गातील होता.त्यामुळे हा दलित-दलितेतर वाद नाही,यावरून राजकारण करू नये.वस्तुस्थिती अशी आहे कि,रोहितचे कायदेशीर जातप्रमाणपत्र माध्यमांत सादर झाले आहे.त्यानुसार रोहित हा एससी म्हणजे शेड्युल्डकास्ट अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे.याचा अर्थ तो ‘दलित’ आहे हे स्पष्ट होते,दुसरा मुद्दा जर तो ओबीसी प्रवर्गातील असता तरी तो ढोबळमानाने दलितच गणला गेला असता.दलित हि स्थितीवाचक आणि समूहवाचक संज्ञा आहे.हे स्मृती इराणीबाईना माहित नसावे.आणि तिसरा मुद्दा असा आहे कि तो कोणत्याही जाती-जमाती प्रवर्गातील असला तरी एक माणूस म्हणून त्याला न्यायमिळवून देणे हे आपले प्रथम कर्त्यव्य नाही काय? कि थातुरमातुर स्पष्टीकरण देत या प्रकरणावरच वेगळे राजकारण करायचे ? एका विद्यापिठीय घटनेत उच्चस्तरावरील दोन दोन केंद्रीय मंत्र्यांनी इतका रस का घेतला होता हे घटनेचे राजकारण करू नका असे म्हणनाऱ्यांनी सांगितले पाहिजे.हे उच्चस्तरीय राजकारण कसे काय चालू शकते याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.मुख्य म्हणजे मंत्रीबाईना रोहितची जात शोधण्याची आणि तिचा संबंध आपल्या नेत्याच्या जातीशी जोडण्याची घाई हे प्रकरणाला मुद्दाम वेगळे वळण देत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व पाहता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती काय अहवाल देईल याचा पुरेसे अंदाज बांधण्यात काही हरकत नाही.
रोहितच्या बातम्याप्रसार माध्यमात आल्यानंतर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदीची मागणी सोशल माध्यमांत जोर धरू लागल्यानंतर abvp विद्यार्थी सेना सक्रीय झाली. रोहितच्या विरोधात त्यांनी पुन्हा विखारी विषारी प्रचारप्रसार करायला सुरुवात केली.रोहितच्या फेसबुकवॉलवरील पोस्ट वापरून त्याचा चुकीचा अर्थ लावत फोटोशॉप केले गेले.आणि लोकांचा अतिशय पद्धतशीरपणे बुद्धिभेद सुरु केला हे इतके मोठ्याप्रमाणावर आणि संघटीतरित्या सुरु झाले कि हे लोक याच संधीची वाट पहात होते कि काय असा संशय निर्माण होतो आहे.
कधी रोहित हा नक्षलवादाशी संबंधित आहे तर कधी डाव्या कम्युनिस्ट चळवळी संबंधित आहे अशा प्रकारची वक्तव्य आणि लेख/पोस्ट लिहिले जाऊ लागले आहेत. याकुबच्या फाशीला विरोध केला असाही धादांत खोटा प्रचार केला जात आहे.देशद्रोही मेला असे म्हणून विकृत आनंदही व्यक्त केला जातोय.एकीकडे त्याला देशद्रोही म्हणायचे नक्षलावादी म्हणायचे दुसरीकडे त्याला श्रद्धांजली देखील वहायचे नाटक करायचे असे प्रकार abvp ने सुरु केले आहेत.आपली भूमिका कधीच समजू न द्यायची काळजी हिंदुत्ववादी पक्ष संघटना या नेहमीच घेत आलेल्या आहेत.सतत बुद्धिभेद करत राहण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.आपल्याच पक्षातील नेते आणि संबंधित संघटना या मृत्यूनंतरही रोहितला बदनाम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहितला मृत्यूनंतर गौरान्वित करत “भारतमातेने सुपुत्र गमावला मला,अतिशय दुःख झाले”असल्याची भावना व्यक्त करतात तेव्हा सामान्य माणूस बुचकळ्यात पडल्याशिवाय रहात नाही.नरेंद्र मोदीना खरे मानायचे तर स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे खोटे आणि उघडे पडतात आणि जर या दोघांचे म्हणने मान्य करायचे तर पंतप्रधान खोटे ठरतात असा पेच निर्माण झालेला आहे.त्यामुळे सामान्यनागरिकांच्या मनात संभ्रम आहे.
नरेंद्र मोदीच्या याच कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी “मोदी गो-ब्याक” "रोहित वेमूला अमर रहे" अशा घोषणा दिल्या होत्या,आता त्या विद्यार्थ्यांवरही निलंबनाची तलवार लटकली आहे.
रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणार्यांना भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यमस्वामी यांनी वादग्रस्त वक्त्यव्य करत कुत्र्याची उपमा दिली आहे.अशीच उपमा मागे याच पक्षाचे एक नेते व्हि के सिंह यांनी दलित-ओबीसी मुलांच्या जळीत प्रकरणी दिलेली होती.याअगोदर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसंबंधी एका वक्त्यव्यात त्यांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी केली होती.यावरून भारतीय जनता पार्टी दलित-मुस्लिम समाजाला कोणत्या नजरेतून पाहते हे लक्षात येते.अलीकडेच असहिष्णुतेच्या मुद्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोर्चा आयोजित केला होता.तेच अनुपम खेर आता एका व्हिडीओद्वारे काश्मिरी पंडितांच्या मुद्यावर आव्हान देताना दिसत आहेत,हा व्हिडीओ कोणत्याही हिंदुच्या भावना भडकतील अशा पद्धतीने बनविण्यात आला आहे,सरकार भाजपाचे असताना हा मुद्दा व्हिडीओद्वारे लोकांसमोर न्यायची गरज का वाटते? हा मुलभूत प्रश्न आहे.रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी याच सरकारचे नेते,आता व्हिडीओ आणि शिलापूजन जोरात सुरु आहे त्यामुळे छातीत धडकी भरते.काळजी वाटते.सरकार गरीब जनतेच्या संरक्षणासाठी आहे कि जातीय आणि धार्मिक धृवीकरण करत तेढ निर्माण करणारे राजकारण करत आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडणारे आहे.
भाजपासरकारला या देशात नक्की काय हवे आहे हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.