गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

वो बात करो पैदा तुम अपनी जुबानो में..दुनिया भी कहे कुछ है हम भीम दिवानों में !!


१४ एप्रिल हि तारीख फक्त तारीख नाही.तमाम शोषित वंचित समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एका नव्या जीवन पर्वाची सुरुवात आहे.नवा आत्मसन्मान आत्मभान देणारा नवा जन्म,नवे जग नवी सुरुवात करणारा दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस.यंदाचे वर्षे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ जन्मशताब्दी वर्षे म्हणून देश आणि संयुक्त राष्ट्रसंघातही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी होणार असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमासाठी १६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.लंडनपासून अमेरिका टोकियो जपानपर्यंत.जगभरात मोठयाप्रमाणावर जयंती साजरी होण्याचा मान केवळ बाबासाहेबांना मिळाला असे म्हणने अतिशयोक्ती ठरू नये.

बाबासाहेबांचे बोट धरून शोषित वंचित समाजाने त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आपल्या  प्रगतीच्या वाटा चोखाळल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आंबेडकरी समाजाने दैदिप्यमान कामगिरी केली.१९५६ नंतरचा काळ हा समस्त आंबेडकरी समाजासाठी नवतेचा काळ आहे.पूर्वाश्रमीची ओळख,संस्कृती परंपरा इत्यादी सोडून एक नविन सुरुवात आंबेडकरी समाजाने केली.हि घटना केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची नाही तर मानवीय इतिहासात एक अचंभित करणारी गोष्ट ठरते.ज्यांना माणूस म्हणूनच नाकारले गेले.गावकुसाबाहेर जगावे  लागले त्यांना संधी मिळताच त्यांनी पूर्वाश्रमीच्या कोणत्याही अनुवंशिक न्यूनगंडात न राहता आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.तशी ती संधी मिळूनही अनेकांना करता येत नाही.

या अनुषंगाने आंबेडकरी समाजाची कामगिरी कौतुकास्पद आहे.
राजकीयदृष्ट्या मात्र आंबेडकरी समाज सपशेल नापास झाल्याचे दिसते आहे.बाबासाहेबांनी  स्थापन केलेला शेड्यूल कास्ट्स फेडरेशन हा पक्ष एकेकाळचा सर्वात मजबूत विरोधीपक्ष होता.आंबेडकरी नेते आंबेडकरांचे राजकीय विचार सर्वसामान्य जनतेसमोर नेण्यात कमी पडले असे म्हणण्यास वाव आहे.यासाठी आंबेडकरी नेते आणि आंबेडकरी जनता यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

आजची आंबेडकरीसमाजाची प्रगती आर्थिक सामाजिकदृष्ट्या तेवढी समाधानकारक नाही.
आज आरक्षणाच्या विषयावर आंबेडकरी समाज हा जेवढा संवेदनशील असलेला दिसते तेवढा इतर कोणताच समाजदिसत नाही.आरक्षणाच्या माध्यमातून समाजात अनेक मोठे वकील डॉक्टर इंजिनिअर अर्थशास्त्रज्ञ सीए झालेले पहायला मिळतात.मात्र एक असाही वर्गही आहे  जो आजही मुख्य प्रवाहात आलेला नाही.आणि ज्याला क्रीमबेस्ड वर्ग म्हणतो तो अतिशय गीनाचुना मोजका आहे.

बाबासाहेबांनी सांगितले होते कि शिकलेल्या आणि शिक्षणाने सक्षम होऊन गलेलठ्ठ नोकरी पटकावलेल्या लोकांनी त्यांच्या आर्थिक उत्पन्नातील एक वाटा समाजाच्या प्रगतीसाठी दिला पाहिजे.त्यादृष्टीने अजूनही काम झालेलं नाही ते होणे गरजेचे आहे.आरक्षण हा आपला अधिकार हक्क असला आणि त्या अनुषंगाने आपण शिक्षण मिळवत असलो तरी समाजातून शिक्षित होऊन उच्चपदावर पाहोचलेल्या बड्या अधिकारी वर्गाने मागे राहिलेल्या समाज बांधवांसाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आंबेडकरांच्या जयंतीवर दरवर्षी आपण आवाढव्य खर्च करतो तो किती प्रमाणात करावा कसा करावा यावर चर्चा होऊ शकते परंतु तो केलाच पाहिजे.त्याव्यतिरिक्तही काही महत्त्वाचे मुलभूत प्रश्न आहेत त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉक्टर बाबासाहेबांनी दलित समाजाला शिक्षण मिळावे म्हणून घटनेत आरक्षणाची तरतूद केली शिक्षण संस्था काढली दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालये आणि शाळा काढल्या.देशभरात या संस्थेची ३०-३२ महाविद्यालये आहेत.त्यानंतर मात्र कुणी नविन शिक्षण संस्था काय शाळा देखील काढलेली नाही.हे असे का घडले? आंबेडकरी समाजाने स्वप्रगती करत सामाजिक दायित्व निभावण्यास कसूर केली काय? असा प्रश्न निर्माण होतो.अर्थात असे मूलगामी कार्य हातून घडलेलं नसलं तरी समाजाने आंबेडकरी चळवळ आणि विचार आजही जिवंत ठेवली आहे.परंतु यात आपण कुठतरी कमी पडलो आहोत हे मान्य केले पाहिजे.

ब्राह्मण समाजाने स्व-समाजाच्या उन्नतीसाठी “ब्राह्मण चेंबर्स ऑफ कॉमर्स”ची स्थापना केलेली आहे.या धर्तीवर आंबेडकरी समाजाने बुद्धिस्ट चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना केली पाहिजे. त्यातून समाजातील होतकरू विद्यार्थ्यी तरुणांना रोजगार शिक्षण इत्यादीची तरतूद  केली पाहिजे.दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होता आहेत आणि सर्वत्र खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला जातोय.सरकारी धोरणे गरिबांच्या किती फायद्याची असतात हे आपल्याला माहित आहे.त्यामुळे हि गोष्ट लक्षात ठेवून आंबेडकरी समाजाने पाउल उचलले पाहिजे. आज वैद्यकीय क्षेत्रात फार बिकट परिस्थिती आहे.महागडी औषधे आणि त्यावरील उपचार समान्य गरीब लोकांना जगावे कि मरावे या प्रश्नावर घेऊन येतात.

साठ वर्षात अशी एकही संस्था निर्माण करता आलेली नाही जी समाजातील गरीब रुग्णांना मोठमोठ्या ऑपरेशनसाठी मदत करू शकेल?
समाजातील कुणा व्यक्तीवर अशी वेळ आली कि इतर धर्मदाय संस्थांकडे आंबेडकरी बुद्धिस्ट लोकांना धाव घ्यावी लागते.सुधृढ सक्षम समाज निर्मिती हे बाबासाहेबांचे स्वप्न होतं.आंबेडकरी समाजात आज तरुण शिक्षित वर्ग हा मोठ्याप्रमाणावर आहे.हि फार मोठी जमेची बाजू आहे.या युवा शक्तीचा योग्य वापर समता बंधूता आणि विद्न्याननिष्ठ विवेकवादी समाज आणि त्या अनुषंगाने देश घडविण्यासाठी करणे गरजेचे आहे.

बाबासाहेबांनी “शिका,संघर्ष करा,संघटीत व्हा” असा मूलमंत्र आंबेडकरी समाजाला दिला, आपण हि क्रम बदलला “आपण शिकतो संघर्ष करतो संघटीत होत नाही.हे दुखणे आहे.आंबेडकरी समाज संघटीत झाला तर फार निर्णायक अशी चळवळ देशात उभी राहू शकते.
यासाठी अहंमपणा थोडा बाजूला ठेवला पाहिजे.

  
आंबेडकरी तत्वज्ञान हे सामन्यांना समजेल अशा सामान्य सुलभ भाषेत उपलब्ध करून दिले पाहिजे.संविधान मानणारा लोकशाही प्रेमी समाज निर्माण करायचा असेल तर विद्यार्थ्यी वर्गापासून त्याची चळवळ रुजवली पाहिजे.यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन राबविणाऱ्या शाळा हव्यात.सरकारवर विसंबून न राहता हे सहकारी तत्वावर आपणही करू शकतो.जागा घेऊन गरीब होतकरू मुलांच्या शाळा कॉलेज वसतीगृहांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो एवढी आर्थिकसुबत्ता तर नक्कीच समाजात आलेली आहे.घोडे अडते ते पुढाकार आणि कृतीमध्ये.

भविष्यात रोहित वेमुलासारखे विद्यार्थ्यी गमवायचे नसतील तर हे पाउल उचलणे गरजेचे आहे. आंबेडकरी तत्वज्ञान हे व्यक्तिपूजा नाकारते हे खरे आहे.बाबासाहेबांनी व्यक्तीपुजेचा सक्त विरोध केला आहे.आपण बघतो काही समाजकंटक देशभरात कुठेतरी बाबासाहेबांच्या प्रतिमा पुतळ्याची विटंबना करतात सोशल मिडियात वाईट द्वेषमुलक विचार अपशब्द लिहितात.

त्याने आपण चिडतो.तुम्ही चिडता हेच त्यांना हवे असते.त्यातून तुम्ही जर रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया दिली कि त्यांचा हेतू साध्य होतो.ज्या ज्या वेळी अशा घटना घडतात त्या त्या वेळी आपण त्याउलट प्रतिक्रिया दिली पाहिजे.सोशल मिडियात तर तुम्ही सरळ दुर्लक्ष केले पाहिजे किंवा तिथली मार्गदर्शक तत्वे वापरून असे मजकूर हटविण्यासाठी जी पद्धत असते ती अंमलात आणली पाहिजे.दुसरे जेव्हा प्रतिमा पुतळा यांची विटंबना होते तेव्हा न डगमगता न वाईट वाटून घेता.त्या प्रतिमा पुतळ्यास पुष्पहार घालून त्याच दिवशी जंगी जयंती साजरी करायची.तुम्ही भडकावण्याचे त्यांचे मनसुबे अशारितीने सहज हाणून पाडता येतात.बाबासाहेबांनी आपल्याला नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.

प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण  चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.

इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.

- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE जयंती विशेषांक २०१६


बुधवार, १३ एप्रिल, २०१६

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांनी चालविलेली सामाजिक उत्थानाची परिवर्तनाची चळवळ शेवटच्या टप्प्यात आणून तीस एक आयाम दिला आणि खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून ती यशस्वी केली.हिंदू धर्म नाकारून गुरूने सावर्जनिक सत्यशोधक धर्माची तर शिष्योत्तमाने बौद्ध धम्माची स्थापना केली.अलीकडे देशात ब्राह्मण्य ब्राह्मणवाद हिंदुत्व असे शब्द प्रचलित आहेत,सामान्य नागरिकांना हे समजण्यास कठीण होते.तर हे सर्व शब्द आणि त्यांची एका साध्यासोप्या शब्दांत व्याख्या करायची असेल तर “मनुवाद” अशी ती केली पाहिजे.हा शब्द कसा योग्य आहे याची आपण माहिती घेऊ.मनु ऋषीने जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात ब्राह्मण समाजास अवास्तव आणि अवाजवी असे भरमसाठ अधिकार दिले. याद्वारे ब्राह्मण समाजाने आपल्या भोवती एक अभेद्य अशी तटबंदी निर्माण करून घेतली नियम बनवले त्यास धर्माचे नाव दिले.वेद श्रुती पुराणे अरण्यके सगळीकडे ब्राह्मण गौरव आणि श्रेष्ठत्वाचे उल्लेख आहेत.ब्राह्मणोऽस्य मुखमासीद बाहू: राजन्य:कृत:ऊरू तदस्य यदवैश्य पद्धयां शूद्रो अजायत “ हा पुरुषसूक्तातील श्लोक आहे.जो प्रत्येक पूजेत आवर्जून भटजीद्वारे म्हटला जातो.त्याचा अर्थ असा- ब्राह्मण  मुखातून क्षत्रिय बाहुंपासून वैश्य मांड्यापासून आणि शुद्र पायांपासून निर्माण झाले. त्यामुळे आजही वेद आणि मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात.
मुळात देश स्वतंत्र झाल्यापासून आणि इथे लोकशाहीभिमुख राज्यघटना अंमलात आल्यापासून ते व्यवहारात नाहीत त्यामुळे आजवर कुणाचे काहीही अडले नाही.कालविसंगत असूनही काही लोकांना ते पुन्हा पुन्हा इथे रुजविण्याची हुक्की येते,राज्यघटना नाकारून मनुस्मृती लागू करावी असे वाटते.त्यामागे हिच श्रेष्ठत्व मिरविण्याची भावना आहे.बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदूइझम आणि शुद्र पूर्वी कोण होते ? हे दोन ग्रंथ  लिहिले ज्योतीबांनी शेतकर्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब लिहिले,ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक फुल्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी माळी महार मांग या लोकांस अर्पण केले.त्यांनी प्रस्तावनेत केलेला उल्लेख आजही  किती चपखल आहे हे वाचून लक्षात येते,”या लहानशा चोपडीस प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही.आमच्या देशांत ब्राह्मणांचे महत्व किती आहे  व ते धर्माच्या मिषाने लोकांवर केवढा जुलूम करतात हे प्रसिद्धच आहे.असे असता कोणी म्हणतील कि हे पुस्तक रचण्याचे कारण काय?तर त्यास असे उत्तर आहे कि,ब्राह्मण आपला कावा सर्व लोकांसी सारखा चालवीत नाहीत.कुणबी माळी वगैरे शुद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते.आणि ते इतर जातींच्या आणि विशेषकरून सांप्रतकाळच्या सुधारलेल्या लोकांस फारसे ठाऊक नाहीत.जे विद्या शिकून सुधारले आहेत.त्यांच्यामध्ये भटजीबुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे.परंतु अशी गोष्ट शुद्र जातींत नाही.तेथे अद्यापि बाजीरावाच्या वेळची भटशाही राज्य करीत  आहे.”
बाबासाहेबांनी या ब्राह्मण्याची व्याख्या केलीय.”जन्मजात उच्चनीच भाव” बाबासाहेब आपल्या बहिष्कृत भारत मधील अग्रलेखात म्हणतात.आंग्लाई आणि ब्राह्मणाई या हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या जळवा आहेत.व त्या एकसारख्या हिंदी जनतेच्या रक्ताचा शोष करीत आहेत.आंग्लाई सत्तेने देहाने लोकांना  गुलाम बनविले तर  ब्राह्मणाईने लोकांच्या आत्म्याला गुलाम करून ठेविले आहे.ब्राह्मण लोक सर्व प्रकारच्या चळवळीत धडाडीने भाग घेतात.राजकीय चळवळ हे तर त्यांचे जीवनच आहे.एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल परंतु राजकारणाच्या ताकाचा एखादा भुरकाजर त्यांना मिळाला नाही तर त्यांना अमांशाची पीडा होण्याचा संभव असतो.सामाजिक सुधारणेच्या चळवळीत हि त्यांचे अंग असते.विधवा विवाह बालविवाह केशवपन वगैरे सामाजिक प्रश्नांसंदर्भात त्यांनी आस्था दाखवली आहे.मजूर वर्गाच्या वतीने भांडवलशाहीवाद घालणाऱ्या चळवळीचे ते पुरस्कर्ते होऊ शकतात.नव्हें तर बोल्शेविझम व कम्युनिझमसारख्या आर्थीक हितसंबंधात क्रांती घडवून आणणाऱ्या चळवळी या देशात आणून त्या पाडाला लावण्यास ब्राह्मणच कारणीभूत झालेले आहेत.”
अर्थात तात्पर्य असे कि ब्राह्मणवादी शोषण व्यवस्था निर्माण करणारे जरी ब्राह्मण असले तरी त्यातही काही सुधारणावादी लोक होते.त्यासर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली.आणि यासाठी सर्व धर्मीय आणि सर्व जातीय घटकांना भारतीय राज्यघटनेत समानता बहाल केली.यापुढे देशात होणाऱ्या  कोणत्याही चळवळी या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी वाटचाल करतील तर यशस्वी होतील.नाहीतर त्यात फुटीरतावादी वृत्ती वाढीस लागून ती क्षीण होईल आणि उन्मळून पडेल.
अलीकडे हा ब्राह्मणवाद त्याच विचाराचे सरकार आल्यापासून अधूनमधून डोके वर काढतो आहे.
बाबासाहेबांनी अनुयायांना नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.

प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण  चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.


- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

महात्मा ज्योतिबा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (b)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुलेंच्या वैचारिक चळवळीस सैद्धांतिकरित्या मूर्त रूप दिलं.केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषच दूर करण्यावर या दोघांनी भर दिला नाही तर समाजाच्या अनुषंगाने इतर क्षेत्रातही आपले भक्कम योगदान दिलेलं आहे.आज शेती प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत,दुष्काळ आक्राळविक्राळ रूप अनेकांचा घास घेतोय. 

शेतकऱ्यांच्या तळमळीतून ज्योतीबांनी १८८3 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” नावाचा ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ वाचला असता असे लक्षात येते कि इथल्या समूहांना जसे इंग्रजांनी छळले त्याहीपेक्षा किंबहुना जास्त शोषण आणि छळवणूक हि त्यावेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने केली होती. या ग्रंथात शेतीविषयक व्यावसाभिमुख शेतीचे संकल्प चित्र आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ज्योतीबांनी सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि व्यावसायिक अनुषंगाने समस्या आणि उपाय सुचविले होते.शेतकऱ्यांचे कर्ज,दुष्काळ समस्या आणि नियोजन,नापीकी,पीक पद्धती,शेती संरचना, शेतमालाची लुट करणारे दलाल आणि व्यापारी सावकार आणि एकूणच या सर्वातून नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर उपाययोजना सुचवल्या होत्या.शेतीच्या व्यवसायाला इतर उद्योगांची जोड दिली पाहिजे असे त्यांचे मत होते.शेतीसाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी,पाण्याचे दुर्भिक्ष आज प्रचंड प्रमाणात आहे.

त्यावेळी फुल्यांनी शेतीच्या पाण्यासाठी धरणे,विहिरी,तलाव कॅनॉल बांधले पाहिजेत असे सुचवले होते.पावसाचे पाणी अडवून त्या पाणीसाठ्याद्वारे कायमस्वरूपी सिंचन सुविधा निर्माण करण्याविषयी सांगितले.जवळ जवळ १३२-३३ वर्षे अगोदर त्यांनी शेतमालाला योग्य भाव देण्याविषयी मत मांडले होते,
हा ग्रंथ शेतीसाठी किती उपयुक्त आहे याचे अनुमान यावरून करता येवू शकते.दुर्दैवाने आजही यातील एकही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही असे म्हणता येईल.

बाबासाहेबांनी याच दृष्टीकोनातून पुढे आपल्या विचारांची दिशा दृढ केली.शेतजमीनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे असा विचार त्यांनी मांडला.तसेच सर्व शेती हि सामुदायिक पद्धतीने म्हणजे कलेक्टिव्ह पद्धतीने करावी असे सुचवले होते.ज्योतीबांनी सावकार दलाल यांवर आसूड ओढला बाबासाहेबांनी तोच विचार पुढे नेत खोती पद्धती विरोधी बील मंत्रीमंडळात सादर करून ती जुलमी शोषण पद्धती कायमची बंद केली.
शेतीकरिता जमीन  आणि पाणी हे दोन मुख्य घटक आहेत.शेतजमीन आहे परंतु पाणी नाही अशी परिस्थिती यासाठी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प सुचवला.दुष्काळावर मात  करायाची असेल तर पाण्याचे नियोजन अत्यावश्यक ठरते. यातून साकार झाला “दामोदर खोरे परियोजना प्रकल्प”

भारतातील थोर शास्त्रज्ञ डॉ होमी जहांगीर भाभा बाबासाहेबांचे खूप जवळचे मित्र होते.
बाबासाहेब कामगार मंत्री असताना त्यांच्याकडे जास्तीचे सिंचन / पाटबंधारे खाते सुद्धा होते,
एकदा बाबासाहेबांनी स्थापत्य अभियांत्रिक (सिविल)सी.एस.पिलाई यांचा "अणुउर्जेने पुरावर नियंत्रण" हा लेख वाचलायापूर्वी बाबासाहेब अणु उर्जेच्या वापराच्या संशोधनात होतेच. 

आपल्या काही लेक्चर्समध्ये त्यांनी हा पर्याय सुचविला सुद्धा होता. महापूर किंवा पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंत अमलात आणलेले सर्व पर्याय फसलेले असताना या सर्व धर्तीवर भारतीय इंजिनिअर्स अणूउर्जेच्या पर्यायाकडे का पाहत नाहीतअसे विचारताना त्यांनी १० सप्टेंबर १९५४ च्या Bombay Contemporary

या वृत्त पत्राचा दाखला दिलातसेच " Atomic science to  the  rescue " या मथळ्याखाली आलेल्या माहितीपर लेखाबद्दल उपस्थितांना प्रबोधित केले बाबासाहेब नेहमीच नवीन तंत्रज्ञाननवीन शोध आणि त्याचा मानवी आयुष्यातील उपयोग आणि फायदे यांचा खुल्या मानाने स्वीकार करत असतत्यांचा सतत नवनवीन शोध आणि पर्यायांचा अभ्यास सुरु असायचा या विषयाला फक्त चर्चेत न सोडता बाबासाहेबांनी यावर संशोधन करत असलेल्या पिलाई यांच्या कडून अणु ऊर्जेबद्दल आणि तिचा पूरनियंत्रण करण्यास कसा उपयोग करता येईल यावर सखोल चर्चा करून माहिती मिळवून घेतली.

अणुऊर्जेद्वारे आपण पूरसंकटांवर कायमचे उपाय तयार करू शकतो असे त्यांना समजल्यावर त्यांनी तशी मांडणी सुरु केलीआपल्या एका व्याख्यानात ते म्हणतात, " अणुउर्जा आणि तिचा वापर समजून घेणे खूप सोपे आहेज्यांना विद्युत उर्जेच्या विघटना वरील ओहमचा नियम माहित आहे त्यांना हे समजून घेणे अगदीच सोपे आहे" आण्विक भट्टीमधून अतिवेगवान न्यूट्रोन्सच्या मदतीने आपण नदीच्या पाण्याचा प्रवाह तसेच पाण्याचा स्तर मर्यादित ठेऊ
शकतो आणि त्या अनुषंगाने पुराच्या पाण्याला आपल्याला हवं तसं नियंत्रित करता येऊ शकेल तसेच नको असलेले जास्तीचे पाणी तिथल्या तिथे वाफेत रुपांतरीत करता येऊ शकते" एखाद्या प्रख्यात वैज्ञानिकाप्रमाणे ते अगदी सोप्या भाषेत सांगत होते. नदीचा पूर हा सतत भेडसावणारा प्रश्न आहे तेव्हा सरकारने फक्त जुन्या पद्धतींवर निर्भर न राहताशक्य तितक्या नवीन पर्याय आणि सूचनांचा त्यांनी स्वीकार करायला हवा असा इशारा सुद्धा बाबासाहेब देतात.

आपल्या अनुयायांना सुद्धा बाबासाहेब हेच सांगत कि आपण एका पारंपारिक अशा ठराविक चौकटीत राहून विचार करत राहतो आणि आपल्या फायद्याच्या बऱ्याचशा नवीन गोष्टींचा पारंपारिकतेच्या न्यूनगंडामुळे स्वीकार करत नाही हे बदलले पाहिजे.साधारणात: आपण पूर आला कि बचावकार्य करणे आणि केवळ पूर ओसरण्याची वाट पाण्याशिवाय आजतरी इतर कोणती उपाययोजना राबविताना दिसत नाही.बाबासाहेबांनी सुचविलेल्या उपायांवर विचार केल्यास पुराच्या पाण्याचा आणि पाणी टंचाईचा काही प्रमाणत नक्कीच सुटू शकेल यात शंका नाही. दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगलमहानदीसोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर "उर्जा खाते " बनवण्यात आले ,भारताने फक्त उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कंपनीचा पाया ठरला.बाबासाहेबांमुळे सिंचनजल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या मेहनतीमुळेबाबासाहेबांच्या या प्रकल्पामधील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे.

यावरून बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी कसे काय असू शकतात? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
बुलढाणा अलमपूर येथे गेल्या २५ वर्षापासून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.सदर मतदार संघ हा भाजपाचा असून त्या पक्षाचे आमदार चैनसुख संचेती यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे.गावात बहुसंख्येने असणारा समाज कुणबी माळी म्हणजेच
आरक्षण गटातील ओबीसी तथाकथित वर्णव्यवस्थेत शुद्र गणला गेलेला समाज.

ज्या समाजातूनच क्रांतिसूर्य ज्योतीबा फुलेंनी विद्रोह केला ब्राह्मणी विचार व्यवस्था नाकारली.तोच समाज मनात ब्राह्मण्य जपत आहे, हे धक्कादायक आहे.ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलं आता ते ब्राह्मणेतरांनी अंगिकारलेय कि काय अशी विचित्र परीस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे भाजपा सरकार देशभरात आंबेडकरांची १२५ वे जन्मशताब्दी वर्षे म्हणून जयंती साजरी करत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते त्या उपक्रमास असे डांबर फासण्याचे काम करत आहेत.विशेष म्हणजे स्थानिक पोलीस प्रशासन हि यात सामील आहे.हे दुर्दैवी म्हणावे लागेल.  


-       मिलिंद धुमाळे

- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 






सोमवार, ११ एप्रिल, २०१६

महात्मा ज्योतिबा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (A)

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.
कारण महाराष्ट्राला या तीन थोर समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे.विषमतेत बरबटलेल्या महाराष्ट्राची विस्कटलेली सामाजिक घडी बसवली ती या तिघांनी.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं आहे.बाबासाहेबांनी तीन गुरु केले तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा जोतीबा फुले.या तिघांचे वैशिष्ट्य हे कि तिघांनीही दैवावाद नाकारला.ब्राह्मणवादाचा कडाडून विरोध केला.
बाबासाहेबांनी त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविला.
महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवर्गाविषयी अतिशय संवेदनशील होते.हि संवेदनशीलता केवळ मानवीय दृष्टीकोनातून आलेली नसून त्यात पितृत्वाची छाया आहे.
पेशवाईचा काळ १८१८ ला संपलेला असला तरी पेशवाईने दिलेली वैशिष्ट्ये समाजात तशीच रुजलेली होती.
फुले दांपत्यांचे आगमन पेशवाईनंतरचे, परंपरेने चालत असलेल्या रुढीप्रिय बुरसटलेल्या सामाजिक व्यवस्थेत ब्राह्मणातील विधवा स्त्रियांचे केशवपन ,विधवा विवाह ,जरठ कुमारिका विवाह ,सती प्रथा, बेकायदेशीर संतती व तिची भ्रुणहत्या इत्यादी चालूच होते त्याविरुद्ध जोतीबांनी अविरत संघर्ष केला.आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा असलेला जरठ नवरा वृद्धपकाळाने वारल्यानंतर घरातीलच कुणाकडून तरी दिवस गेलेल्या बाल विधवेचे बाळंतपण करण्यासाठी त्यांनी त्यावेळी भारतातील पहिले प्रसूतीगृह काढले.त्याचबरोबर अनाथ आश्रम देखील काढले ज्यात विधवा बाळंतीण आणि तिचे मूल देखील रहात असे.भारतातील पहिली मुलींची शाळा आणि अस्पृश्य समाजासाठी शाळा काढली.आयुष्यभर ब्राह्मणवादाशी संघर्ष करणाऱ्या फुले दांपत्यानी आत्महत्या करायला निघालेल्या आणि ब्राह्मण असलेल्या विधवा काशीबाई यांना त्यापासून परावृत्त करून बाळंतपणानंतर त्यांच्या मुलाला ”यशवंत”ला दत्तक घेतले.यावरून त्यांची सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि नेणीव किती उच्चकोटीची होती याचा प्रत्यय येतो.त्याकाळच्या सनातनी लोकांनी फुले दांपत्याचा अनन्वित छळ केला होता.एकदा तर चिडून त्यांनी मारेकरीसुद्धा पाठवले होते.आजच्या काळात जसे मॉर्निंगवॉकला मारतात किंवा  जायला सांगतात तसे, तर आश्चर्य म्हणजे माणूसकी दाटून आली ती सुपारी दिलेल्या मारेकऱ्यासच त्याने जोतीबांचे कार्य पाहिले त्यांचा नम्र विनयशील स्वभाव अनुभवला  आपण एका सज्जन भल्या माणसाला विनाकरण मारणार होतो याचा त्याला पश्चताप झाला.पुढे हाच मारेकरी धोंडीराम कुंभार जोतीबांच्या मार्गदर्शना खाली पंडीत झाला.
जोतिबांनी सावित्रीमाईना बरोबर घेऊन १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा काढली.बहुजन समाजातील अस्पृश्यांना आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.याच शाळेत ज्ञानाचे बाळकडू घेत शिकत असलेल्या अवघ्या अकरा वर्षाच्या मुक्ताबाई साळवे या विद्यार्थ्यीनीने एक निबंध लिहिला होता.निबंधाचे शिर्षक “महारा-मांगाच्या दु:ख विषयी “ असे असून त्यात मुक्ताबाई लिहिते “वेद तर ब्राह्मणांचा मक्ता आहे.ब्राह्मणांनीच त्याचे अवलोकन करावे.यावरून उघड दिसते कि महारा-मांगांना धर्म पुस्तक नाही.वेद जर ब्राह्मणांसाठी आहेत तर त्यांच्याप्रमाणे बरहुकूम वर्तवणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे.आम्हाला जर धर्म पुस्तक नाही ते पाहण्याचा अधिकार नाही तर आम्ही धर्मरहित लोक आहोत असे साफ दिसते कि  नाही बरे?” स्त्री शिकली कि तीला आत्मभान येते.गुलामीविरुद्ध ती बंडखोरी करते.मुक्ताबाई साळवे हे त्याचे ज्वलंत उदाहरण.
बाबासाहेब आयुष्यभर समाजातील दुर्बल वंचित शोषित घटकांच्या शिक्षणासाठी न्याय हक्कांसाठी संघर्षरत राहिले.जोतीबांचा वैचारिक वारसा पुढे चालवत त्यांनी भारतीय स्त्रीला घटनेत स्थान दिले.समानतेचा दर्जा  बहाल केला.तिच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. ”न स्त्री स्वातंत्र्यम महर्ती” म्हणत मनूने स्त्रीवर्गास हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत लोटले होते.या अंधारयात्रेत भारतीय स्त्री आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बाबीमध्ये परावलंबतेशिवाय काहीही प्राप्त करू शकली नाही.बाबासाहेबांनी “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती” हा निबंध लिहिला.त्याचे पुढे पुस्तक प्रकाशन केले.हा निबंध म्हणजे स्त्री मुक्तीचा जाहीरनामा जो पुढे हिंदू कोडबिल रूपाने अवतरला.क्रातीबा जोतीबा फुलेंचा वैचारिक वारसा पुढे रुजवत त्यांनी स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून हक्क अधिकार दिले.पुरुषप्रधान मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारलेले अधिकार भीमस्मृतीने प्राप्त करून दिले.आजची स्त्री हि अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते आहे.आपला ठसा उमटवते आहे.आज असे कोणतेही क्षेत्र नाही काम नाही कि ते करण्यास स्त्रिया असमर्थ ठरतील.आज आधुनिक स्त्री हि यशाच्या शिखरावर आहे.स्त्री शिकली कि संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हणतात.अर्थात या सर्व यशामागे प्रगती मागे या दोन महान समाजसुधारकांचे कष्ट आहेत.हेही विसरून चालणार नाही.

-       मिलिंद धुमाळे
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


सोमवार, ४ एप्रिल, २०१६

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का...?

“सोनियाची उगवली सकाळ..जन्मास आले भीम बाळ..” जयंतीची चाहूल लागली कि हे गाणं कानावर ऐकू येतं.जयंतीदिनी आंबेडकरी वाड्यावस्त्यांवर हमखास ऐकू येणारं हे गीत,शहरी मेट्रोसिटी निमशहरी अन ग्रामीण भागातही तेवढेच आत्मीयतेने ऐकलं जातं.ग्रामीण भागात जसे जातनिहाय वेगळे वाडे आहेत तसे शहरातही घेट्टोवस्त्या आहेत.

हा आपला पुढारलेल्या शहरी लोकांचा क्युटनेस.सुदैवाने तो ग्लोबलायझेशनच्या रेट्यात एसआरएच्या साथीने काहीसा विरघळत चालला आहे.

१४ एप्रिल १८९१ हा दिवस आंबेडकरी किंबहुना समस्त भारतीय समाजासाठी सोन्याचा दिवस घेऊन आला,जात-धर्माच्या विषमतेत बरबटलेल्या अमानवीय जोखडात अडकलेल्या भारताला आधुनिकता उदारमतवादी धर्मनिरपेक्ष अशा लोकशाहीचं सुंदर स्वप्न पडलं.त्या स्वप्नाला बाबासाहेबांच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळालं.एक युगांतर घडलं,हजारो वर्षाचा इतिहास बदलला.जगाच्या इतिहासात दास्य परंपरेला मूठमाती देत मानवमुक्तीचा हा लढा रक्ताचा एक थेंबही न सांडता यशस्वी झाला.

”उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे...”
कवी गीतकार वामनदादा कर्डक यांनी या क्रांतीपर्वाचे यथार्थ वर्णन शब्दातीत केलं.पूर्वी ग्रामीण भागात एक म्हण होती.‘बामना घरी लिवणं,कुणब्या घरी दाणं,महारा घरी गाणं,अन कोल्हाट्या घरी नाचणं” बाबासाहेबांना मानवमुक्तीच्या या लढ्यात समर्थपणे प्रामुख्याने साथ दिली ती यातील महार समाजाने..

या समाजाने लोककलेच्या माध्यामातून अनेक शाहीर महाराष्ट्राला दिले आहेत.ज्यांनी इथल्या माणसांवर, माणसांच्या दु:खावर रचना केल्या.बाबासाहेबांनी आरंभलेल्या चळवळीत त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बाबासाहेबांना या शाहिरांचा उचित आदर होता.ते एके ठिकाणी आपल्या भाषणांत म्हणतात “माझी दहा भाषणे आणि शाहिरांचे एक गाणे “ यावरून बाबासाहेबांचे शाहिरांबद्दलचे प्रेम आणि आदर आपण समजू शकतो.काही अंशी आंबेडकरी चळवळ वाढविण्याचे अन जनमानसांत रुजविण्याचे व ती जगविण्याचे काम या शाहीर जलसाकारांनी केले आहे.

आंबेडकरी अनुयायांना आंबेडकरोत्तर सामाजिक आणि धार्मिक अनुषंगाने चळवळीच्या माध्यमातून समाधानकारक कामगिरी करता आली.काहीअंशी स्वप्रगती साधता आली.परंतु दुर्दैवाने राजकीय चळवळ मात्र यशस्वीपणे राबविता आलेली नाही.राजकीय अपयश हे जुने दुखणे आहे.एकेकाळचा भक्कम विरोधी पक्ष म्हणून ज्याचे संसदेत संख्याबळ हे कॉंग्रेसच्या खालोखाल होते,तो आंबेडकरी चळवळीचा “शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन” हा पक्ष होता.हे वाचले तरी आज विश्वास बसणार नाही.अशी आजची परिस्थिती आहे.परंतु हि वस्तुस्थिती आहे.

सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग बाबासाहेबांनी तेव्हाच केला होता.प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देणारा मानवी उत्कर्षाचा समग्र राजकीय विचार हा केवळ आंबेडकरी चळवळीत आहे.हे माहित असल्यामुळे प्रस्थापितांनी हि राजकीय चळवळ फोडण्याचा अन खिळखिळी करण्याचा अतोनात प्रयत्न केला.नेत्यांना विविध आमिषे दाखवून आपल्या वळचणीला जोहार म्हणत उभे राहण्यास भाग पाडले. नेतेही कलंदर.अमुकतमुक मंत्रीपद द्या तरच युती करतो असे बेधडक मागणी करणारे.

जनतेचे प्रश्न सोडवा.शिक्षित पदवीधर तरुणांना नोकऱ्या लावा.बॅकलॉग भरा.नविन प्रभावी योजना राबवा एकूण काय तर ‘गरीब वंचित जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवा तरच युती करतो’ अशी मागणी करणारा नेता अजून जन्माला यायचा आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांबाबत आंबेडकरी जनतेत उदासीनता आहे.ती नेत्यांच्या अशा बेगडी कचखाऊ धोरणांमुळे.त्यातल्यात्यात समाधानकारक नेतृत्व आणि वाटचाल एकमेव भारिप पक्ष आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे.परंतु ते व्यापक प्रमाणावर स्विकारले जात नाही.यामागेही रिपब्लिकन राजकारण आहे.जसे प्रस्थापित राजकारण करतात तसे अंतर्गत विस्थापित राजकारण करतात.या सर्वांना कंटाळलेल्या जनतेने अनेकदा ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.बुद्ध बाबासाहेबांच्या शपथा दिल्या.आत्मदहनाचे प्रयत्न देखील झाले.  

१९९०,१९९४,१९९८,२०११ या चार वेळी ऐक्य प्रत्यक्षात घडून आलं. पैकी १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर,प्रा.जोगेंद्र कवाडे,रा.सु.गवई विदर्भातून आणि रामदास आठवले मुंबईतून निवडून आले.निवडून आल्यानंतर ऐक्याचे कवित्व संपलं प्रत्येक नेता आपआपले शक्ती प्रदर्शन करू लागला.बेबनाव झाला आणि पुन्हा नेते वेगळे झाले.ऐक्य फार काळ मानवले नाही.जनतेने ऐक्याचा नाद सोडला.नेत्यांचे हे वैशिष्ट्यगुण असताना रिपब्लिकन पक्षात दररोज एका नव्या पक्षाची भर पडते आहे.त्यास पक्ष म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.त्यामुळे गटबाजीचे हे राजकारण आज लाजिरवाणे झाले आहे.रिपब्लिकन पक्ष/गटांची आकडेवारी पाहिली तर आजमितीस ती ४० च्या वर आहे.

हे बेसुमार राजकीय गट राजकारणातही सुमार कामगिरी करतात.किंबहुना ते नेमकं काय राजकारण करतात हा मुलभूत प्रश्न आहे.अशी दयनीय राजकीय अवस्था असताना आंबेडकरी जनता मात्र आपला नेता बाबासाहेबांनाच मानत आली आहे.त्यांची निस्सीम निष्ठा व बांधिलकी बाबासाहेबांच्या वैचारिक चळवळीशी आहे.ती नुसतीच अंधभक्ती अन भाबडी नसून डोळस आहे.कोणतीही चळवळ उभी राहण्यासाठी तिला ठोस भूमिका आणि वैचारिक बैठक असावी लागते.चळवळ एकाकी उभी रहात नाही,ती कुणाच्या तरी खांद्यावर उभी असते.खांदे बळकट असतील तरच चळवळ तगते,फुलते त्यावर उभे राहूनच भविष्याची वाटचाल होते.खांदे पोकळ लेचेपेचे अन कच खाणारे असतील तर त्यावर उभी राहणारी चळवळसुद्धा डळमळते,कोसळते,बाबासाहेब हे तथागत भगवान बुद्ध आणि क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या मजबूत वैचारिक खांद्यावर उभे होते.या दोघांच्या भक्कम खांद्यांवर उभ्या केलेल्या चळवळीने नवा इतिहास लिहिला.त्या इतिहासाचे नायक अन म्हणून युगपुरुष ठरले ते अर्थात डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर.

आंबेडकरोत्तर चळवळ हि बाबासाहेबांच्या पोलादी खांद्यावर आजही न डगमगता उभी आहे.मानवमुक्तीची हि चळवळ आंबेडकरी विचार वारसा जोपासत तो समाजात रुजवते आहे.सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात ती आग्रही आणि अग्रभागी आहे.आंबेडकरवाद हा समता स्वातंत्र्य बंधूता न्याय हि वैश्विक मुल्ये जपणारा आणि विवेकवादी वैशिष्ट्य असणारा वाद आहे,सामाजिक राजकीय आणि धार्मिक तिन्ही क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेबांनी भरीव योगदान देवून समाजाला एक भक्कम इन्स्टीट्युट पर्याय म्हणून दिले आहे.त्याअर्थाने आंबेडकर हे एक परिपूर्ण स्कूल आहे.या वैचारिक स्कूलमध्ये शिकणारी व्यक्ती हि आयुष्यभर वरील वैश्विक मुल्ये जपत विवेकवाद जोपासते.गेली साठ वर्षे नियमित चैत्यभूमीला लाखो अनुयायी कोणतेही गालबोट लागू न देता अतिशय शिस्तबद्धरीतीने अभिवादन करत असतात जगाच्या पाठीवर घडणारी हि दुर्मिळ घटना आहे.
तो काही चमत्कार नाही.हा संयम अन शिस्त येते आंबेडकरी विचारातून.

आंबेडकरी समाज अन्याय अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तेवढाच संवेदनशील असलेला दिसतो.दुर्दैवाने इतर दलित समाजाला असे अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करण्याचे भान अजूनही आलेलं नाही असं म्हणावं लागेल.आंबेडकरीबौद्ध सोडले तर आजही अशावेळी यल्गार पुकारणारे तुलनेत फार कमी आहेत.
आज कोणत्याही आंदोलनासाठी आंबेडकरी जनता राजकीय नेत्यांची वाट पहात नाही.
आंबेडकरी समाज गटात गटात विभागलेला असला तरी अशावेळी मात्र सर्व विसरून तो एक होतो.
“डेड आंबेडकर इज मोर डेंजरस देन अलाइव” याची प्रचीती अनेकदा देशाने घेतली आहे.

११ जुलै १९९७ रोजी घडलेलं घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड,त्यात बळी गेलेल्या दहा निष्पाप नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी समाजाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी उग्र निदर्शने  करत दहा वर्षे झुंज देत अनुक्रमे सत्तेवर असणाऱ्या शिवसेना-भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांना गोळीबाराचे आदेश देणाऱ्या जातीयवादी मनोहर कदमवर गुन्हा नोंदविण्यास अखेर भाग पाडले.गुंडेवार आयोगाने मनोहर कदमला दोषी ठरवले,त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

शिवसेनेने मनोहर कदमला स्वखर्चाने वकील दिला.पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्यास जामीन दिला.शेवटी न्याय झालाच नाही.आंबेडकरीचळवळ समाजाला या प्रस्थापित पक्षांनी आणि व्यवस्था चालविणारांनी नेहमीच अन्यायी अन अपमानकारक वागणूक दिली.आंबेडकरी समाज हे ओरखडे काळजावर झेलत संघर्ष करतो आहे.अन्याय अत्याचाराविरोधात त्याला मनस्वी चीड आहे.अन्याय मग तो समाजातील कोणत्याही घटकांवर झालेला असो त्यासाठी प्रथम रस्त्यावर उतरतो तो आंबडेकरी समाज.

२९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीत घडलेलं हत्याकांड हे पुरोगामी अन संतांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रावर कधीही न पुसला जाणारा एक ठाशीव काळाडाग आहे.जनतेने कोणत्याही नेतृत्वाविना महाराष्ट्रासह देशभरात उस्फुर्त आंदोलने केली.आक्रमक आंदोनामुळे तत्कालीन सरकारला यात लक्ष घालावे लागले.सदर खटल्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अॅड.वाहावणे यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ती मान्य करून नियुक्तीचे पत्रही दिले परंतु ऐनवेळी सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली.सदर खटल्यात अॅड.उज्वल निकम यांनी सामुहिक बलात्कारासाठी असणारे ३७६ ई हे कलम न लावता साधे विनयभंगाचे कलम लावले.त्यामुळे खटला कमकुवत झाला.मुंबईतील शक्तीमील बलात्कार प्रकरणी त्या तीन आरोपींना मात्र हे कलम लावण्याची मागणी अॅड.उज्वल निकम यांनी केली आणि त्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा देखील झाली आहे.त्यामुळे अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो आहे.

१ जानेवारी २०१३ रोजी आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड घडले.तथाकथित उच्च (मराठा) आणि कनिष्ठ जात हा अडसर ठरला त्यातून एकाच घरातील तीन तरुणांच्या देहांचे अक्षरशः तुकडे केले गेले.दुर्दैवी तरुण होते हिंदू-मेहतर (वाल्मिकी),हिंदू धर्मव्यवस्थेच्या जात उतरंडीत पूर्वास्पृश्य अन आता लौकिक अर्थाने “दलित”.जातीयवादाचे बळी ठरलेल्या या तीन तरुणांचा एक भाऊ पंकज धनवार हा भारतीय सैन्यात सीमेवर कर्त्यव्य बजावतो आहे.आपल्याकडे सैन्यातील जवानांचा उपयोग अलीकडे भावनिक राजकारणासाठी केला जातो म्हणून हि जास्तीची माहिती.

२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगे प्रकरण घडले.त्यापाठोपाठ २४ ऑक्टोबर २०१४ रोजी जवखेडा घडले या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्र हादरला सोशल मीडियामध्ये तीव्र पडसाद उमटले.यात नितीन आगे हा हिंदू-मातंग.हिंदू एकता,समरसता अशा गप्पा मारणारे,मुस्लिम समाजाची भीती दाखवत सर्व हिंदुना त्याविरुद्ध उभे राहण्यासाठी भडकवणारे तथाकथित हिंदू उच्चजातीय आपल्याच हिंदू दलित बांधवांच्या देहाचे सुपारी कातरावी तसे तुकडे करून फेकून देतात,अशावेळी कुणी हे थांबवा म्हणून चिंतन मनन प्रबोधनात्मक शिबीर घेताना दिसत नाही.काळीज हलते ते फक्त आंबेडकरी समाजाचे,अस्वस्थ होतो तो फक्त आंबेडकरी तरूण.यातून आपल्याकडे एक विचित्र समज निर्माण झाला.”दलित” म्हणले कि डोळ्यासमोर येतो तो आंबेडकरीबौद्ध समाज.प्रसारमाध्यमांनाही “दलित”शब्द कोण प्रिय.बातमीचे वृत्तांकन करताना दलित शव्द वापरला कि काम झाले.त्यामुळे इतर तथाकथित उच्चजातींना तसा समज आहेच परंतु वंचित मागास जातींचाही असाच गैरसमज आहे.दलित हत्याकांड झाले तरी बौद्धेतर जाती त्याविरुद्ध उतरताना दिसत नाहीत.भले ती घटना आपल्याच जात बांधवासोबत घडलेली का असेना.

नितीन आगे प्रकरणात मातंग समाजातील एकही संघटना न्यायासाठी रस्त्यावर उतरलेली नव्हती.अलीकडे काही मातंग संघटना पिवळासलाम म्हणतात.पिवळा झेंडा घेऊन एससी प्रवर्गातून वेगळे आरक्षण हवेय अशी मागणी करतात.स्वभान आलं पण कसं? जातीय अस्मिता किती टोकदार झालीय याचे हे उदाहरण.कोणत्याही अशात दलित हत्याकांडाच्यावेळी पोलिसांची भूमिका हि नेहमीच संशयास्पद राहिली आहे.पोलीस प्राथमिक रिपोर्टच असा बनवतात कि केसच उभी राहणे मुश्किल होते.याचा अनेकदा प्रत्यय आला आहे.सोनईच्या घटनेत सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्याचा प्रताप केला.त्यांनतर व्ही ए दौलताबादकर यांच्या न्यायालयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान सकाळी ११ ची वेळ असताना आरोपींना चक्क दुपारी 3 वाजता हजर करण्यात आले.अर्थात सुनावणी होऊ शकली नाही.न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली. पोलिसांना ना न्यायालयाची भीड ना कसली तमा.अशा धर्तीवर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर होतो अशी नेहमी खोडसाळपणे आवई उठवून तो रद्द करा अशी मागणी केली जाते.खैरलांजीसारख्या प्रकरणात अॅट्रॉसिटी लावला जात नाही,हि वस्तुस्थिती आहे.त्यामुळे हे कार्यतत्पर पोलीस खोट्या अॅट्रॉसिटीजच्या केस कशा काय दाखल करून घेत असतील हे फारच रोचक वाटते.मुळात जातदांडगे धनदांडगे लोक या कायद्याला घाबरून आहेत.आणि त्यांच्या सरंजामीवृत्तीवर या कायद्यामुळे बर्यापैकी अंकुश बसला आहे.हे वास्तव आहे.म्हणून त्याचा वेळोवेळी विरोध केला जातो.अशावेळी एक दबाव गट हवा.खंबीर नेतृत्व हवं, तो दबाव गट सोशल मिडीयाच्या माध्यमातून आंबेडकरी तरुणांनी बऱ्यापैकी परिणामकारक असा बनवला आहे.केवळ सोशल मिडियात न राहता तो ग्रासरूट लेव्हलवर काम करतो आहे.समाज सध्या नेतृत्वहिन असला तरी आंबेडकरी चळवळ आज परिणामकारकरित्या आपली भूमिका निभावते आहे.
सोशल मिडिया प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयातही हि परिणामकारकता आता दिसून येते आहे.

सोशल मिडिया नव्हती तेव्हा दलित अत्याचाराच्या बातम्या या फार उशिराने वर्तमानपत्रातून समजत होत्या.अलीकडे सोशलमिडियामुळे बातम्या ताबडतोब जनमानसात पोहोचतात.सदर घटनांवर सामान्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायला पूर्वी माध्यमही नव्हतं ती कमी सोशल मिडीयाने भरून काढली.अशा बातम्या आल्या कि आंबेडकरी तरुण अस्वस्थ होतो. पूर्वी शिक्षण नोकरी यात वेळातवेळ काढून स्थानिक पातळीवरील विभागीय कार्यक्रम आणि अवांतर वाचन होत असे.यातही एखादा उत्साही असेल तरचं तो भाग घेई.वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या चर्चाही सीमितच त्यामुळे प्रत्यक्ष चळवळीत काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांची संख्या रोडावली होती.हे चित्र सोशल मिडीयाने बदललं.नोकरी शिक्षणात व्यस्त असलेला सुशिक्षित आंबेडकरी तरुण पुन्हा चळवळीकडे ओढला गेला.किंबहुना आता त्याला एक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप आलं आहे.
आपल्या जबाबदारीचे भान आलं आहे.

कोणत्याही दलित मागास वंचित घटकावर झालेला अन्याय अत्याचार हा आंबेडकरी समाजाला आपल्यावरील अन्याय वाटतो.कारण सारा मागास शोषित वंचित समूह हा एकच आहे.हा आंबेडकरी चळवळीची मूळ वैचारिक सिद्धांत राहिला आहे. उत्तर प्रदेश दादरीमध्ये गोमांसची अफवा उठवून खून करण्यात आलेलं अखलक प्रकरण असो मद्रास आयआयटी आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल असो कि दिल्ली जेएनयु कन्हैया कुमार या सर्वांसाठी आंबेडकरी चळवळ खंबीरपणे उभी राहिली. हैद्राबाद रोहित वेमुला हत्या प्रकरणात आंबेडकरी विद्यार्थ्यी संघटना आणि डाव्या संघटना यांनी देशात अक्षरशः रान उठवले. त्याचा परिणाम एवढा तीव्र होता कि आरएसएसने त्यामुळे बिथरून काही मोर्चांवर थेट हल्ले केले.त्यांची विद्यार्थ्यी विंग abvp ने हल्ले केले. मिडीयाला हाताशी धरून देशद्रोहाच्या कहान्या रचण्यात आल्या.शिवाय पोलिसी बळाचा वापर करून आंदोलने चिरडण्याचा प्रयत्नही झाला.तरीही आंबेडकरी तरुणांनी देशभरात ठीकठिकाणी निदर्शने केली.निषेध केले.सोशल मिडिया इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया सगळीकडे आपली परखड भूमिका मांडत अन्यायाविरुद्ध बंड करून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आंबेडकरी चळवळ.सरकारला याची दखल घ्यावी  लागली केंद्रीय मंत्र्यांना संसदेत जबाब द्यावा लागला.

रोहितला अजून न्याय मिळालेला नाही त्यासाठी अजूनही संघर्ष चालूच आहे.सध्या आंबेडकरी चळवळीला कोणतेही ठोस नेतृत्व नसताना विवेकावादाची कास  धरत अन्यायाविरुद्ध संवैधानिक मार्गाने दाद मागत संघर्ष करण्याचे बळ आणि भान आलेय ते केवळ आंबेडकर नावाच्या धगधगत्या ज्वालामुखीमुळे.आता इथून पुढील संघर्ष हा शिक्षण आरक्षण आणि संविधान यांच्यासाठी करावा लागणार आहे. देशात आजही कुठे न कुठे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते सोशल मिडीयात अपमानजनक मजकूर येतो.अनेक लोक त्यांच्या जातीवरून आपली संस्कृती दाखवून देतात.यावर एक सांगावेसे वाटतं.युरोप खंडात हंगेरी नावाचे एक शहर आहे. तिथे रोमा नावाची एक भटकी जमात आहे, ज्यांना जिप्सी म्हणूनही ओळखल्या जाते.तिथे ते नागरी हक्कांपासून वंचित होते. त्यांच्या डेर्डेक तिबोर या नेत्याला इंटरनेटद्वारे बाबासाहेब त्यांचे कार्य कर्तृत्व अन विचार समजले.डॉक्टर आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून त्यांनी संघटना बांधली तिथे संघर्ष केला.सरकारशी झगडून त्यांनी आपले हक्क मिळवले.

मुला-मुलींसाठी डॉक्टर आंबेडकर स्कूल याच नावाने तीन शाळा काढल्या. डेर्डेक तिबोर इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी स्वत: बुद्धिस्ट धम्म स्वीकारला आणि त्यांच्या समुदायालाही त्याची दीक्षा दिली.जगात जिथे कुठे वंचित अन्यायग्रस्त नाडलेला समाज असेल त्यांना बाबासाहेब त्यांचे विचार हे कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न विश्ववंदनीय ठरतात.

यंदाचे हे १२५ वे जन्मशताब्दी वर्षे त्यानिमित्त जगातील तमाम शोषित वंचित समूहांना आणि देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन

शेवटी जाताजाता या ओळी उधृत केल्याशिवाय रहावत नाही.
सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का....? 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का...?
जयभीम !!


- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक दिव्यमराठी जयंती विशेषांक २०१६ 

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

गुढीपाडवा आणि बौद्ध समाजाची भूमिका (B)

गुढीपाडवा साजरा करण्याच्या विरोधी कल्टमध्ये आंबेडकरी समाजाने सहभाग घेऊ नये 
या संर्दभातील लेखाचा उत्तरार्ध -
गुढीपाडवा साजरा का करू नये याचे संदर्भ दावे वगैरे जे सोशल मिडिया
आणि इतर ठिकाणी प्रचलित आहेत.
मी ते अॅज इटीज दिले.जे बाहेर प्रचारित आणि प्रसारित होतेय,ज्यावर एक पुस्तकही छापलेलं आहे तेच मुद्दे इथं मांडले कारण मग मूळ मुद्दा समजायला सोपं जातं.अनेकांना ते समजलेही.विशेषतः ज्यांच्यासाठी लिहिलं त्यांना.
यात कुणा समाज व्यक्तीला बदनाम करण्याचा टीका करण्याचा छुपा अंत्यस्थ हेतू नव्हता तसा तो कधी नसतो.म्हणजे जे म्हणायचं आहे ते उघड म्हणन्यास काही प्रत्यवाय नाही.त्यादिवशी अशाच प्रकारचे संदेश मला व्हाटसेपवर प्राप्त झालेले आहेत तेही आंबेडकरी मित्रांकडून.ज्यांना इच्छा आहे त्यांनी इनबॉक्समध्ये तशी विनंती करावी पुरावे दिले जातील.यात माझ्या मनाचं कपोलकल्पित वगैरे काही नाही.हे संदर्भ दावे वगैरे माझं संशोधन नाही.
असे संदेश उघड प्रसारित होतात ते लक्षात घ्यायचं नसेल किंवा डोळे झाक करत केवळ मिलिंद धुमाळे ने मांडलं म्हणून थयथयाट करायचा असेल त्यांनी तो जरूर करावा.मात्र जे माझे दावे नाहीत संशोधन मांडणी माझी नाही त्याबद्दल मला दोषी धरून ऊर बडवणाऱ्यानी वस्तुस्थिती एकदा तरी जाणून घेतली पाहिजे.
मला कीव येते त्यांच्या बालिशबुद्धीची.माझ्या पोस्टवरून काहींनी थयथयाट सुरु केला आहे. पुरोगामी व्यक्तींची चळवळ त्यांचं माध्यम बदनाम करण्याचा हा एक बालिश प्रयत्न आहे तो अक्षरनामा आणि बिगुल या पोर्टलचा जाणीवपूर्वक नामोल्लेख झाल्यामुळे लक्षात आलं.अर्थात तो विशिष्ट लोकांकडूनच सुरु आहे हे वेगळं सांगायला नको.त्यांचे अजेंडे असतात त्याप्रमाणे ते वागत असतात.अर्थात माझाही त्या पोस्टमागे काहीएक अजेंडा आहे होताच. तो अत्यंत स्पष्ट होता.
माझ्या समाजाने कोणत्याही परीस्थितीत तोफेच्या तोंडी उभं राहून नुकसान करून घेऊ नये.मुद्दा फक्त हिंदू धर्मातील सणांचा नाही.गांधीवरील टीकेचाही आहे.
हे मागेही एकदा मी मांडलं आहे.
ज्यांनी खून केला ते राष्ट्रभक्त राष्ट्रवादी म्हणून मिरवतात आणि आम्ही मात्र गांधीवर टीका करून देशद्रोही ठरवले जातो.आज समाजाला महत्वाचं काय हे पाहणं जास्त गरजेचे आहे.जे घडून गेलेय त्यानिरुपयोगी मुद्यांवर टीका करून ते आज बदलणार नाही.आणि फायदाही होणार नाही.
आपलं विशिष्ट डबकं म्हणजे जग नाही.त्या डबक्याबाहेर प्रचंड मोठं आणि समजुतीने वागणारं समजून घेणारं आणि आपल्या चुका मोठे मन करून स्वीकारत पुढे चालणारं एक जग आहे हे विशिष्ट डबक्यात हुंदडणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं.तुम्ही नागडे आहात याची जाणीव करून दिली म्हणून थयथयाट करण्यापेक्षा कपडे घालावे आपत्कालीन परिस्थिती टॉवेल गुंडाळून घेतला तरी चालेल पण नाही आमचा नग्नपणाही पारदर्शक आहे हे जगाला दाखवून द्यायचं असतं यांना.त्यामुळे यांना कार्पेटमध्ये गुंडाळलं तरी नग्नता झाकली जात नाही.हिंदू धर्म हा विषमतावादी धर्म आहे यात नविन काय आहे? मुद्दा हा नव्हताच सणांचा होता.आणि आम्ही तर टीका करू नका हेच सांगतोय.
त्यात एक सांगायचं राहिलं ज्या सण उत्सवांचा त्रास होतो त्यावर तर बोललेच पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळली पाहिजे अशा सणांचा इतरांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी त्या त्या धर्मांनी घेतली पाहिजे.
मी तर उघड माझ्याच आंबेडकरीसमाजावर टीका केली दुषणे दिली तरीही त्यांनाच त्रास झाला ये बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना क्यू? माहितेय कारण तूम्ही सुधारू नये असं त्यांचं मत असतं कायम नको त्या प्रश्नावर मुद्यांवर संघर्षरत करणे बिझी राहणे हेच त्यांचे ध्येय असते जेणेकरून तुम्ही प्रगती करू नये.म्हणून आरक्षण बंद करण्याची धमकी दिली जाते दम असेल तर करून बघा म्हणावं.
मला व्यक्तिशः १९५६ अगोदरच्या कोणत्याही प्रकारच्या इतिहासात रस नाही.
फारतर १९४७ नंतरचा इतिहास स्वीकारायला हरकत नाही.अर्थात तोही स्वातंत्र्यलढा या अनुषंगाने.
आंबेडकरी-बौद्ध समाजासमोर सण-उत्सव यात रममाण होण्यापेक्षा आणि इतर सणांना विरोध करण्यापेक्षा जास्त कळीचे आणि मुलभूत प्रश्न आहेत,सर्वात प्रथम भयमुक्त जगण्याचा नैसर्गिक हक्क अधिकार,संरक्षण,शिक्षण,रोजगार या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे.ही त्या पोस्टची मुख्य भूमिका होती.असो.

Translate