१४ एप्रिल हि तारीख फक्त तारीख नाही.तमाम शोषित वंचित समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एका नव्या जीवन पर्वाची सुरुवात आहे.नवा आत्मसन्मान आत्मभान देणारा नवा जन्म,नवे जग नवी सुरुवात करणारा दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस.यंदाचे वर्षे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ जन्मशताब्दी वर्षे म्हणून देश आणि संयुक्त राष्ट्रसंघातही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी होणार असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी १६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.लंडनपासून अमेरिका टोकियो जपानपर्यंत.जगभरात मोठयाप्रमाणावर जयंती साजरी होण्याचा मान केवळ बाबासाहेबांना मिळाला असे म्हणने अतिशयोक्ती ठरू नये.
बाबासाहेबांचे बोट धरून शोषित वंचित समाजाने त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आपल्या प्रगतीच्या वाटा चोखाळल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आंबेडकरी समाजाने दैदिप्यमान कामगिरी केली.१९५६ नंतरचा काळ हा समस्त आंबेडकरी समाजासाठी नवतेचा काळ आहे.पूर्वाश्रमीची ओळख,संस्कृती परंपरा इत्यादी सोडून एक नविन सुरुवात आंबेडकरी समाजाने केली.हि घटना केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची नाही तर मानवीय इतिहासात एक अचंभित करणारी गोष्ट ठरते.ज्यांना माणूस म्हणूनच नाकारले गेले.गावकुसाबाहेर जगावे लागले त्यांना संधी मिळताच त्यांनी पूर्वाश्रमीच्या कोणत्याही अनुवंशिक न्यूनगंडात न राहता आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.तशी ती संधी मिळूनही अनेकांना करता येत नाही.
या अनुषंगाने आंबेडकरी समाजाची कामगिरी कौतुकास्पद आहे.
राजकीयदृष्ट्या मात्र आंबेडकरी समाज सपशेल नापास झाल्याचे दिसते आहे.बाबासाहेबांनी स्थापन केलेला शेड्यूल कास्ट्स फेडरेशन हा पक्ष एकेकाळचा सर्वात मजबूत विरोधीपक्ष होता.आंबेडकरी नेते आंबेडकरांचे राजकीय विचार सर्वसामान्य जनतेसमोर नेण्यात कमी पडले असे म्हणण्यास वाव आहे.यासाठी आंबेडकरी नेते आणि आंबेडकरी जनता यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
आजची आंबेडकरीसमाजाची प्रगती आर्थिक सामाजिकदृष्ट्या तेवढी समाधानकारक नाही.
आज आरक्षणाच्या विषयावर आंबेडकरी समाज हा जेवढा संवेदनशील असलेला दिसते तेवढा इतर कोणताच समाजदिसत नाही.आरक्षणाच्या माध्यमातून समाजात अनेक मोठे वकील डॉक्टर इंजिनिअर अर्थशास्त्रज्ञ सीए झालेले पहायला मिळतात.मात्र एक असाही वर्गही आहे जो आजही मुख्य प्रवाहात आलेला नाही.आणि ज्याला क्रीमबेस्ड वर्ग म्हणतो तो अतिशय गीनाचुना मोजका आहे.
बाबासाहेबांनी सांगितले होते कि शिकलेल्या आणि शिक्षणाने सक्षम होऊन गलेलठ्ठ नोकरी पटकावलेल्या लोकांनी त्यांच्या आर्थिक उत्पन्नातील एक वाटा समाजाच्या प्रगतीसाठी दिला पाहिजे.त्यादृष्टीने अजूनही काम झालेलं नाही ते होणे गरजेचे आहे.आरक्षण हा आपला अधिकार हक्क असला आणि त्या अनुषंगाने आपण शिक्षण मिळवत असलो तरी समाजातून शिक्षित होऊन उच्चपदावर पाहोचलेल्या बड्या अधिकारी वर्गाने मागे राहिलेल्या समाज बांधवांसाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आंबेडकरांच्या जयंतीवर दरवर्षी आपण आवाढव्य खर्च करतो तो किती प्रमाणात करावा कसा करावा यावर चर्चा होऊ शकते परंतु तो केलाच पाहिजे.त्याव्यतिरिक्तही काही महत्त्वाचे मुलभूत प्रश्न आहेत त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉक्टर बाबासाहेबांनी दलित समाजाला शिक्षण मिळावे म्हणून घटनेत आरक्षणाची तरतूद केली शिक्षण संस्था काढली दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालये आणि शाळा काढल्या.देशभरात या संस्थेची ३०-३२ महाविद्यालये आहेत.त्यानंतर मात्र कुणी नविन शिक्षण संस्था काय शाळा देखील काढलेली नाही.हे असे का घडले? आंबेडकरी समाजाने स्वप्रगती करत सामाजिक दायित्व निभावण्यास कसूर केली काय? असा प्रश्न निर्माण होतो.अर्थात असे मूलगामी कार्य हातून घडलेलं नसलं तरी समाजाने आंबेडकरी चळवळ आणि विचार आजही जिवंत ठेवली आहे.परंतु यात आपण कुठतरी कमी पडलो आहोत हे मान्य केले पाहिजे.
ब्राह्मण समाजाने स्व-समाजाच्या उन्नतीसाठी “ब्राह्मण चेंबर्स ऑफ कॉमर्स”ची स्थापना केलेली आहे.या धर्तीवर आंबेडकरी समाजाने बुद्धिस्ट चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना केली पाहिजे. त्यातून समाजातील होतकरू विद्यार्थ्यी तरुणांना रोजगार शिक्षण इत्यादीची तरतूद केली पाहिजे.दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होता आहेत आणि सर्वत्र खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला जातोय.सरकारी धोरणे गरिबांच्या किती फायद्याची असतात हे आपल्याला माहित आहे.त्यामुळे हि गोष्ट लक्षात ठेवून आंबेडकरी समाजाने पाउल उचलले पाहिजे. आज वैद्यकीय क्षेत्रात फार बिकट परिस्थिती आहे.महागडी औषधे आणि त्यावरील उपचार समान्य गरीब लोकांना जगावे कि मरावे या प्रश्नावर घेऊन येतात.
साठ वर्षात अशी एकही संस्था निर्माण करता आलेली नाही जी समाजातील गरीब रुग्णांना मोठमोठ्या ऑपरेशनसाठी मदत करू शकेल?
समाजातील कुणा व्यक्तीवर अशी वेळ आली कि इतर धर्मदाय संस्थांकडे आंबेडकरी बुद्धिस्ट लोकांना धाव घ्यावी लागते.सुधृढ सक्षम समाज निर्मिती हे बाबासाहेबांचे स्वप्न होतं.आंबेडकरी समाजात आज तरुण शिक्षित वर्ग हा मोठ्याप्रमाणावर आहे.हि फार मोठी जमेची बाजू आहे.या युवा शक्तीचा योग्य वापर समता बंधूता आणि विद्न्याननिष्ठ विवेकवादी समाज आणि त्या अनुषंगाने देश घडविण्यासाठी करणे गरजेचे आहे.
बाबासाहेबांनी “शिका,संघर्ष करा,संघटीत व्हा” असा मूलमंत्र आंबेडकरी समाजाला दिला, आपण हि क्रम बदलला “आपण शिकतो संघर्ष करतो संघटीत होत नाही.हे दुखणे आहे.आंबेडकरी समाज संघटीत झाला तर फार निर्णायक अशी चळवळ देशात उभी राहू शकते.
यासाठी अहंमपणा थोडा बाजूला ठेवला पाहिजे.
आंबेडकरी तत्वज्ञान हे सामन्यांना समजेल अशा सामान्य सुलभ भाषेत उपलब्ध करून दिले पाहिजे.संविधान मानणारा लोकशाही प्रेमी समाज निर्माण करायचा असेल तर विद्यार्थ्यी वर्गापासून त्याची चळवळ रुजवली पाहिजे.यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन राबविणाऱ्या शाळा हव्यात.सरकारवर विसंबून न राहता हे सहकारी तत्वावर आपणही करू शकतो.जागा घेऊन गरीब होतकरू मुलांच्या शाळा कॉलेज वसतीगृहांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो एवढी आर्थिकसुबत्ता तर नक्कीच समाजात आलेली आहे.घोडे अडते ते पुढाकार आणि कृतीमध्ये.
भविष्यात रोहित वेमुलासारखे विद्यार्थ्यी गमवायचे नसतील तर हे पाउल उचलणे गरजेचे आहे. आंबेडकरी तत्वज्ञान हे व्यक्तिपूजा नाकारते हे खरे आहे.बाबासाहेबांनी व्यक्तीपुजेचा सक्त विरोध केला आहे.आपण बघतो काही समाजकंटक देशभरात कुठेतरी बाबासाहेबांच्या प्रतिमा पुतळ्याची विटंबना करतात सोशल मिडियात वाईट द्वेषमुलक विचार अपशब्द लिहितात.
त्याने आपण चिडतो.तुम्ही चिडता हेच त्यांना हवे असते.त्यातून तुम्ही जर रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया दिली कि त्यांचा हेतू साध्य होतो.ज्या ज्या वेळी अशा घटना घडतात त्या त्या वेळी आपण त्याउलट प्रतिक्रिया दिली पाहिजे.सोशल मिडियात तर तुम्ही सरळ दुर्लक्ष केले पाहिजे किंवा तिथली मार्गदर्शक तत्वे वापरून असे मजकूर हटविण्यासाठी जी पद्धत असते ती अंमलात आणली पाहिजे.दुसरे जेव्हा प्रतिमा पुतळा यांची विटंबना होते तेव्हा न डगमगता न वाईट वाटून घेता.त्या प्रतिमा पुतळ्यास पुष्पहार घालून त्याच दिवशी जंगी जयंती साजरी करायची.तुम्ही भडकावण्याचे त्यांचे मनसुबे अशारितीने सहज हाणून पाडता येतात.बाबासाहेबांनी आपल्याला नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.
प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.
- मिलिंद धुमाळे
- पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE जयंती विशेषांक २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा