मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

वैचारिक प्रबोधन हे सर्वांच्याच हिताचं आहे

सोशलमीडिया हा एक स्फोटक प्लेटफोर्म आहे.इथं तुम्ही जे लिहिता त्याचे पडसाद बाहेर उमटत असतात.तसेच तुमच्या वेळोवेळी घेण्यात आलेल्या भूमिका तुमची विश्वासार्हता आणि इमेज निर्माण करत असतात. तुम्ही समाजाच्या वतीने जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही समाजाचे प्रतिनिधित्व करत असता.

कोणताही समाज आपल्यावतीने कुणालाही नेमत नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने अक्कलहुशारीने अन जबाबदारीने व्यक्त होत असतो.त्यामुळे या स्फोटक प्लेटफोर्मवर लिहिताना आपण आपल्या समाजाची पत जाणार नाही.त्यास लांछन लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.हे सर्वच समाजासाठी आहे.
आता मुख्य मुद्यावर येतो. मराठा क्रांती मोर्चाच्या काळात सोशल मीडियात अन बाहेरही जाणीवपूर्वक आंबेडकरी समाज टार्गेट केला गेला. हे कितीही नाकारा हेच सत्य आहे.मला आठवतं लातूर भागात एका अजाण मुलीच्या भाषणाने काहींच्या डोक्यात तिडीक गेली.भाषा चुकीची नव्हती भावना चुकीची नव्हती संदर्भ चुकले कारण मुद्दा वैयक्तिक होता,त्यावर मीही स्पष्ट शब्दांत लिहिलं होतं.की असे नॉनइशू उभे करून समाजाला अडचणीत आणू नये.याचे भान आम्ही बाळगलं होतं.बाळगत आहोत. परंतु या मुद्यावर फेसबुक पेटले होते.सदर अजाण मुलीला निळी रांड म्हणण्यापर्यंत मजल गेली.यात अशा पोस्ट लाईक करणाऱ्या चक्क "घरंदाज"वगैरे मिरवणाऱ्या स्त्रिया देखील होत्या हे पाहून अतोनात यातना झाल्या होत्या ती पोस्ट स्क्रीनशॉट मी इथे दिले होते.एवढे होऊनही याच लोकांनी एट्रोसिटी कायदा बदनाम करण्यासाठी बनावट कहाण्या रचून आंबेडकरी समाज बदनाम करण्याचे धोरण ठेवले. मराठा क्रांती मोर्च्या संदर्भात सामानातून अपमानजनक खिल्ली उडवली गेली.फेसबुक पेटले नाही.छिदमने तर टोकच गाठले पण यांच्याकडून तसा संताप दिसला नाही जो इतरवेळी दिसतो.अन कालच संभाजीब्रिगेडच्या अन मराठा क्रांती मोर्च्याच्या पुणे संघटक पदी असणाऱ्या शरद पोखरकर यांना शिवरायांचा विचार सांगणारी पुस्तके वाटली म्हणून जबर मारहाण केली आहे.पण ज्यांनी त्यावेळी आंबेडकरी समाजाच्या विरोधात रान पेटवले होते. त्यांनी याचा साधा निषेध देखील केला नाही.एका महाभागाने तर बातमी सांगावी तसे सांगून वेळ मारून नेली.मला आश्चर्य वाटलं.हेच जर इतर कुणाकडून झालं असतं तर इथं दंगली पेटवल्या असत्या. भीमा-कोरेगांव दगडफेक झाली तेव्हाही यातील काही लोक भिडे-एकबोटेला वाचवताना दिसले.

ही अशी दुटप्पी भूमिका पाहून यांची पक्ष अन जात निष्ठा प्रकर्षाने ठळक होतेच पण इतरांविषयी किती द्वेष ठासून भरला आहे हेही स्पष्ट होते.जय शिवाजी जय भवानी म्हणत काल भीमनगरवर दगडफेक झाली.गाड्यांचे नुकसान झालं.सेम मोडसऑपरेंडी भीमा-कोरेगांवची.विशेष म्हणजे भीमनगरमध्ये शिवजयंतीच साजरी होत होती.जातीचा माज अन इतरांविषयी विषाक्त द्वेष एवढा भयानक आहे की आज शिवाजी असते तर त्यांनाही या लोकांनी सुनावलं असतं.असेही शिवाजीना स्वकीयांनीच जास्त त्रास दिलेला.आजही तीच पिलावळ नाव खराब करत हिंडते.कालच्या घटनेवर सगळ्यांनी तोंड शिवले आहे.हाताला लकवा मारला आहे.आंबेडकरी समाजाने कधीही कुणाच्या सण उत्सवावर दगडफेक केल्याचा इतिहास नाही.
पण हे एवढे नीच आहेत की शिवजयंती असली तरी त्यावरही दगडफेक करून आपली मर्दानगी गाजवणार.अर्थात पार्श्वभागात दम तसा कुणाच्याच नाही हे लांडगे झुंडीने येतात.हे षंढ कधीच समोरून लढले नाहीत. कुणातरी म्हाताऱ्याच्या नादी लागून गरिबांना त्रास देत त्यांच्यावर अत्याचार करत रहायचं हाच यांच्याठायी शिवविचार उरलेला दिसत आहे.यात यांनी आपले जात-बांधवही सोडले नाहीत.त्यालाही बेदम मारहाण. नेमकं कुठे चाललाय हा समाज मला याचीच जास्त काळजी आहे.कारण शेवटी मरण गरीबांचेच असते. यासाठी समाजात विचारवंतांची नितांत गरज असते.नाहीतर समाज गुंड आणि गंड जपणारा म्हणूनच इतिहासात नोंदला जातो.त्यामुळे प्रबोधन हे सर्वांच्याच हिताचं आहे. - मिलिंद धुमाळे

Translate