सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरात हिमाचलप्रदेश इलेक्शन आंबेडकरी समाज आणि राजकारण

सदर लेखातील विचार मांडणी तुम्हाला पटेलच असे नाही.कदाचित नाही पटणार.
एकूण सभोतालची परिस्थिती वातावरण आणि निकाल यावर मला जे वाटले ते माझं मत मी मांडलं आहे.
हे केवळ माझं पर्सेप्शन आहे.तुमचे वेगळे असू शकेल.किंवा असेच असेलही.

गुजरात इलेक्शनचे निकाल आज घोषित झाले.त्यासोबतच हिमाचलप्रदेशचे निकाल देखील घोषित झाले.
चर्चा फक्त गुजरात इलेक्शनचीच होते आहे.दोन्हीकडे भाजपला अपेक्षित यश मिळाले.
एकतर्फी घवघवीत यश मिळाले असते तर लोकांनी इलेक्शनकमिशनची ऑफिसे जाळली असती.
लोकांना संशय येऊ नये म्हणून भाजपला निसटता विजय मिळवून दिला गेला आहे.

माझा इलेक्शनकमिशनवरील विश्वास उडण्यामागची दोन कारणे आहेत.
हिमाचलप्रदेशचा निकाल तब्ब्ल दीड महिना उशिराने गुजरातसोबत मनमानी करत लावला गेला.
यामागे काय लॉजिक आहे? असे पायंडे कशासाठी?
गुजरातमध्ये इलेक्शनच्या दिवशी मोदीना रोड शो करू दिला.

दुसरे अन महत्वाचे कारण EVM घोटाळा.अनेक ठिकाणी त्यात फेरफार केला गेला हे उघड झाले.
तब्ब्ल सहा मतदार संघात फेरमतदान घेण्यात आले याचा अर्थ काय? तरीही  EVM  बद्दल भाजप आणि इलेक्शन कमिशन आग्रही आहे.

यासोबत ज्यांचा फायदा होतो आहे तेही पक्ष गप्पच आहेत.उदा.काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी बीएसपी हे लोक EVM बंद करून बॅलेटपेपरवर मतदान घेण्यास उत्सुक दिसत नाहीत.EVM  चा असाही व्यावहारिक फायदा काय मला कळलेले नाही.वेळ वाचविणे प्रक्रिया सुलभ करणे हा मुद्दा असेल तर ज्या देशात निवडणूक निकाल द्यायला तब्ब्ल दीड महिने लावले जातात त्या राज्यात बॅलेटपेपर काउंट करायला पुरेसा वेळ आणि भरमसाठ बेरोजगार हात उपलब्ध आहेतच.मग हे कारणही निकालात निघते.

आणखी एक भयंकर गोष्ट म्हणजे ज्या देशानी EVM ची निर्मिती केली तिकडे तेच देश बॅलेटपेपरवर मतदान घेतात.असे असताना  EVM मुळे नेमके काय साध्य होते अन यात कुणाचा फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे.अशा परिस्थितीत तुम्ही २०१९लाही भाजपच विजयी झालेले पहाल.यात आश्चर्य वाटून घेऊ नका.
ज्या राज्यातील बहुतांश जनता नाडलेली आहे.त्रासलेली आहे.

ज्या राज्यातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आणि ज्या समाजघटकांनी मोठ्यासंख्यवेर सरकारविरोधी रॅलीज काढत विरोध प्रदर्शन केले त्या लोकांचा विरोध एकाएकी कसाकाय मावळला?
त्यांची मते गेली कुठे? याच भीतीने देशाचा कारभार "रामभरोसे" ठेवून देशाचा प्रधानमंत्री  गुजरातमध्ये पक्षाचा निवडणूक प्रचार करण्यासाठी  तळ ठोकून बसला याचा  आपण सारासार विचार केला पाहिजे.

भाजपचा जीव EVM मध्ये जोपर्यंत  EVM असेल तोपर्यंत भाजप जिवंत असेल सत्तेत असेल आणि ते सोबत इतरांना सत्तेचा वाटा देतील.म्हणजे विरोधकही खुश राहतील.विरोध करणार नाहीत.आणि सध्यातरी असेच घडताना दिसत आहे.यात एक सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे उना दलित मारहाण प्रकरणात आवाज उठून आंदोलन करणाऱ्या जिग्नेश मेवानी यांचा विजय.

खरेतर गुजरातच्या विषमतावादी सामंतवादी राजकारणात दलित समाजात नवचेतना निर्माण झाली असेल तर तिचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे.मोठ्या फरकाने जिग्नेश यांचा विजय झालेला आहे हे दिलासादायक चित्र म्हणता येईल.सुरुवातीला जिग्नेश यांनी बसपमधून तिकीट मागितले होते परंतु त्यांना ते दिले गेले नाही.असे समजले.त्याचा बसपच्या उमेदवाराला १२६३  मते आहेत.आणि जिग्नेश ९५ हजार अधिक मतानी विजयी झालेले आहेत.काही लोकांना असे वाटते कि जिग्नेश हा माध्यमांनी आणि प्रस्थापित पक्षांनी प्लान्ड केलेला माणूस आहे.काहींचे मत आहे तो कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी करणारा आहे.

या सगळ्या शक्यता आणि समज म्हणा किंवा गैरसमज हे सुरुवातीला बोलून दाखवून आपण त्याच्यावर अन्याय करतोय असे वाटत नाही काय? आता कुठे  "तुमच्यातला" एकजण निवडून आला.ज्याने सरकारला जाब विचारला उघडे पाडले मोदींना भूमिका घेण्यास भाग पाडले तिथल्या दलित समूहात निवडून येण्याची नवचेतना निर्माण केली असेल  त्याच्याकडे बघताना डोळसपणेच बघूया पण बाजूला रेटण्याचा घाई कशाला?

अर्थात टक्केवारी पाहता केवळ दलितच नाही इतर सर्वच समाज घटकांनी मतदान केले असे म्हणू शकतो,
हळूहळू त्याच्या भुमीका समोर येतीलच तेव्हा ठरेलच हे नेतृत्व म्हणून योग्य आहे लंबी रेस का घोडा आहे कि  प्लान्डपपेट आहे.त्याने संघर्ष केला आहे.हे आपण सर्वानीच पाहिलेलं आहे.
त्यामुळे प्रत्येकीसाठी नकारात्मकता योग्य नाही.

राजकारण हा धूर्त लोकांचा खेळ आहे.इथे प्रामाणिक सभ्य लोक फारसे टिकत नाहीत.राजकारणात ताठ राहून चालत नाही.लवचिक असावे लागते हे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे.तुम्हाला सर्वच समाजातून समर्थन मिळणे आवश्यक असते.

कन्हैय्याकुमार जेव्हा प्रकाशझोतात आला तेव्हा अनेकांनी नाके मुरडली परंतु त्याने सरकारला कोंडीत पकडले हे आपण प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे कन्हैय्याकुमार जी मते मांडतो ती लोकशाहीसाठी पूरक आहेत असे मलातरी जाणवते.कम्युनिस्ट राजकारण वेगळे आहे.त्यावर बोलूच.मात्र मला एक कळते कि फ्यासिस्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी तुम्हाला समविचारी लोकांना सोबत घ्यावेच लागेल.
या देशात तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही.
जी ऊर्जा निर्माण होती तिचा वापर आपण सामाजिक चेतना जागविण्यासाठी केला पाहिजे.
जनलोकपालच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या उर्जेचा वापर करत आप पक्ष सत्तेवर आला आहे हे वास्तव आपण कधीतरी लक्षात घेऊयात. सतत नकारात्मक असण्यापेक्षा आलेल्या संधीचा वापर अन ते सगळं ट्विस्ट करणे हे राजकारण आपण शिकले पाहिजे.

कितीवेळ इतरांनी वापर केला म्हणून गळे काढत अपयशावर रडत बसायचे? दबाव गट निर्माण करणे आपले हक्क मिळवणे यात शहाणपणा आहे.अजूनही वेळ गेलेली नाही.भाजपसोबत असणाऱ्या आंबेडकरी नेत्यांनी भाजपची साथ सोडली पाहिजे.भाजप  ज्या राज्यात सत्ता आहे तिथे जनमत पाहून हळूहळू आरक्षण नागरिकांना मिळणाऱ्या इतर सवलती बंद करत आहेत.यासाठी कधी राष्ट्रवाद देशभक्ती मेक इन इंडिया आणि असे अनेक शब्द योजले जात आहेत.जे उच्चारता उच्चारता तोंडाला फेस येईल.
कारण यावेळी एकाच दगडावर पाय नको अशी खेळी आहे.

मागे फक्त एकच शायनिंग इंडियाचा दगड होता.जो लोकांनी योग्य ठिकाणी भिरकावला म्हणून दररोज नवीन दगडांची पूजा बांधली जाते.उद्या कदाचित आरक्षण बंद होईल तशी मानसिकता तयार व्हावी लागते ती होतेच आहे.काही जातींची मानसिकता आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी आहे.काहींची आम्हाला वेगळं पाहिजे.अशी आहे.आरक्षणाचा उपयोग शिक्षण आणि नोकरी दोनच ठिकाणी होतो.

आरक्षणावरून आरक्षण लाभार्थ्यांना इथल्या गैर आरक्षणधारी जातींनी इतके छळले आहे पिडले आहे आणि अपमानित केले आहे कि यामुळे आरक्षण लाभार्थी जातींना आरक्षण नको अशी मानसिकता हळूहळू वाढीस लागली आहे.भीक नकोच्या धर्तीवर हक्क नको पण कुत्रे आवर अशी काहीशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते.

राष्ट्रपती पदावर बसवलेले आणि आरएसएस संघाच्या मुशीतून तयार झालेले तथाकथित दलित हे प्रगतीसाठी आरक्षणाची गरज नाही म्हणतात तेव्हा असे बोलताना ते आपल्या सर्वोच्च पदाला आणि भारतीय राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वालाच डांबर फासत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नसावे? हे आणि असे अनेक इतर सत्तेचे लाभार्थी हाडूक चघळण्यात मश्गुल आहेत.

त्यामुळे भाजपच्या लोकशाही विरोधी धोरणावर बोलण्यास त्यांना भानच येत नाही.यासोबतच राजकारण करताना आपण सर्वच समाजाचा विचार केला पाहिजे तसा तो करतोच मात्र आता धार्मिक जातीय अनुषंगाने होणाऱ्या टीका प्रबोधन बाजूला ठेवले पाहिजे.तुम्ही एक लक्षात घ्या मागास दलित वर्गातही जेवढ्या काही जाती आहेत त्याही तुम्हाला मतदान करत नाहीत याचा आपण विचार केला पाहिजे.

कारण आपण विज्ञाननिष्ठ धम्म मानतो आणि इतरांच्या देव-धर्मावर टीका करतो.त्यामुळे दलित मागास असला तरी तो आंबेडकरी समाजापासून चार हात दूर राहतो आणि यातून वेगळेपणाची भावना आणखी दृढ होते.हे टाळणे गरजेचे आहे.प्रबोधनाची जबाबदारी एकट्या आंबेडकरी समाजाची नाही. काही गोष्टी जाहीर मांडता येत नाहीत.त्यामुळे काही गोष्टी बिटवीन द लाईन वाचून घ्या.समजून घ्या.सोशल माध्यमे हि समाज जोडण्यासाठी गरजेची आहेत.ना कि द्वेष आणि मागचे स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत.इथून पुढे सकारात्मक राजकारण करूया.प्रगतीवर लक्ष देऊया.




मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा ,पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे
जेष्ठ कवी गीतकार वामनदादा कर्डक यांच्या कवितेतील या ओळी
त्यातील शब्दांचा काल शब्दशः अनुभव घेतला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन.
६ डिसेंबर या दिवशी दरवर्षी देशभरातून लाखो-करोडो भीमअनुयायी दादर चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात.
यंदा ओखी वादळाची छाया आणि त्यामुळे पडलेल्या पावसाने शिवाजीपार्क आणि चैत्यभूमीपरिसरात जमणाऱ्या भीमअनुयायांना नेहमीप्रमाणे परंतु थोडा जास्त त्रास सहन करावा लागला.नेहमीप्रमाणे यासाठी कि सरकार आणि पालिकाप्रशासनाच्या कृपने दरवर्षी भीमअनुयायांची पुरेशा मूलभूत सोयी-सुविधा अभावी कुचंबणा होतच असते.यावेळी पाऊस पडल्यामुळे त्यात आणखी भर पडली.
मूलभूत सोयी-सुविधांचा मुद्दा पाहिला तर यावेळी पिण्याचे पाणी (नळ) आणि फिरती शौचालये अजिबातच दिसली नाहीत.आपल्या जबाबदार आणि श्रेष्ठ हवामानखात्याने संबंधितांना अगोदरच सूचना दिलेल्या होत्या असे कळते.त्यापार्श्वभूमीवर भाजप सरकार आणि शिवसेनेच्यापालिकाप्रशासनाने दखल घेतली नाही ना त्यानुसार काही उपाय-योजना केल्याचे दिसले.याना मतदान करताना हा मुद्दा लक्षात ठेवा.
शिवाजीपार्क मैदानात सर्वत्र चिखलच चिखल दिसत होता.तो हटविण्यासाठी पालिकेने काहीही केले नाही.ना सरकारने केले.
परिसरात फ्लडलाईट्स नव्हत्या अंधुक प्रकाशात सरकारप्रशासन आपली न केलेली कामे आणि योगदान जाहिरातींचा रतीब लावून सांगताना दिसली. शिवाजी पार्क परिसरात एवढ्या मोठ्याप्रमाणार जनसमुदाय उपस्थित होत असतो हे दरवर्षीचे आहे त्यामुळे त्याची आगाऊ सूचना देण्याची काहीएक गरज नसते.सरकारमध्ये पालिका प्रशासनामध्ये असणारे लोक काही दुधखुळे आहेत असेही म्हणता येत नाही.
तरीही त्यांचा बोऱ्या वाजला.अर्थात हे दुधखुळे नसून यांनी हे जाणीवपूर्वक गैरसोय होईल असे पाहिले आहे.कारण आंबेडकरी जनतेला जेवढा त्रास देता येईल तेवढा देण्यात याना आसुरी आनंद मिळत असतो.
नंतर पालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्था करून वेळ मारून नेण्याचा कांगावा भाजपसरकार आणि शिवसेनेच्या पालिकाप्रशासनाने केला.
१ जून २०१७ रोजीच्या एका वृत्तपत्रातील बातमीनुसार हवामानखाते दररोज किती पाऊस पडेल याची माहिती सरकार आणि पालिका प्रशासनाला देणार असल्याचे कळते या अगोदर ८ दिवसांच्या पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून देण्यात येत होता.याचा अर्थ याना पावसाचा अंदाज नव्हता असे म्हणता येत नाही.जूनच्या पावसात तुंबलेल्या मुंबईसाठी नियोजित दौरा रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पलिकेच्या कंट्रोलरूममध्ये दाखल झाले होते.अर्थात हे सेने-भाजप मधील कुरघोडी आणि शह-काटशह देण्याचे राजकारण.मात्र आंबेडकरी जनतेला आम्ही अमुक केले तमुक केले म्हणून भरमसाठ जाहिरातींचा रतीब घालणाऱ्या सरकरने आणि मुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबरला शिवाजीपार्क परिसरला भेट का दिली नाही? परिस्थितीचा आढावा का घेतला नाही?
पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत कि नाही हे का पाहिले नाही?
पिण्याच्या पाण्याचे नळ नव्हते ना फिरते शौचालय मात्र ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर भाजप सरकारच्या जाहिरातीसांठी जनरेटरसहित डिजिटल जाहिराती दाखविणारे ट्रक्स मात्र उभे दिसले.
पालिकेचा बजेट ५ करोड आहे.तसेच स्टॉलधारकांकडून ५ हजार भाडे वसूल केले जाते. असे कळले मात्र त्याप्रमाणत पालिकेने काहीही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसले नाही.दरवर्षी पालिकेचे कर्मचारी शिवाजीपार्कवर स्वच्छता करताना दिसत तेही यावेळी कुठेच दिसले नाहीत.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी अशाप्रकारे आपली "जात" दाखवली.
मुंबईस्पिरिटबद्दल काही बोलणार नाही हि रिकाम्या यडबंबू आणि विशेषतः मुंबईबाहेरील लोकांनी पसरवलेली अफवा आहे.माझा उभा जन्म गेला मुंबईत तेव्हा मुंबईस्पिरिट हे बारमधील स्पिरिटच्या बाटलीशिवाय कुठेही दिसले नाही.नैसर्गिक आपत्तीच्यावेळी जी काही मदत होते ती देशात विदेशात सर्वत्रच स्थानिक लोक आपल्यापरीने करत असतात.त्याला कुणी स्पिरिटबिरीट म्हणत नाही.
मात्र दादरच्या स्थनिक लोकांनी दाखवलेल्या मानवतेची झलक तीला जगात कुठेच तोड नाही.त्याचबरोबर शिवाजीपार्कला खेटून असणाऱ्या बंगल्यात मराठीमाणसाचा कैवार घेणाऱ्या पक्षाचा एक नेता असूनही त्याने शिवाजीपार्कवर जमणाऱ्या या तमाम मराठी माणसांसाठी आपल्या बंगल्यात किंवा ओट्यावरही जागा दिली नाही ना आपल्या कार्यकर्त्यांना मानवतावादी सेवा करण्याचे "आदेश"दिले.हि मराठी जनता त्यांच्यासाठी केवळ निवडणुका आल्या की जवळ करण्याची आणि झेंड्यात रंगापुरती वापरण्यासाठीची बाकी वेळी ते "अस्पृश्य" आणि टिंगलीचा विषय.
तुम्हाला लोकांना वाटले असेल सोयी-सुविधा पुरवल्या नाहीत तर हा समाज पुढच्यावर्षी यायचे टाळेल.या भ्रमात राहू नका.गेली ६१ वर्षे सोयी-सुविधांचा अभाव असताना दरवर्षीच लाखोंची गर्दी होती.ज्याने तुमच्या छातीत धडकी भरते.असो देशभरातून येणारी आंबेडकरी जनता सरकार,प्रशासनाच्या मदतीच्या भरवशावर बाबासाहेबांना अभिवादन करायला नतमस्तक व्हायला दादरला येत नाही.हे उद्गार आहेत वयवर्षे ७१ असणाऱ्या झुणकाबाई बोराटे यांचे ज्या विदर्भातून आल्या होत्या.
एवढ्या गर्दीत त्या मैदानात एके ठिकाणी बसल्या होत्या कपड्यांची बोचकी अन कडाक्याची थंडी बाधू नये म्हणून मांडीवर साडीत गुंडाळून झोपवलेली ३ वर्षाची नात ते दृश्य पाहून त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा रोखता आली नाही.तेव्हा समजलं त्यांना मुलगा नाही.मुलगी आणि नात याना घेऊन त्या आलेल्या.आणि त्या अशाच दरवर्षी येत असतात.कोणत्याही अडचणींना नैसर्गिक आपत्तींना न डगमगता घाबरता त्या येत असतात आणि पुढेही येत राहतील आम्हा तरुणांना लाजवणाऱ्या आणि ऊर्जा भरणाऱ्या अशा तमाम वादळांना सलाम !!
यावेळी आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब घडली ती म्हणजे कुठेच डीजे किंवा स्पिकर्स लावून गाणी वाजवली गेली नाहीत.
त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी जे धीरगंभीर आणि जबाबदारीचे वातावरण अपेक्षित होते ते जाणवत होते.पाऊस किंवा कार्यकर्त्यांचे प्रयत्न असोत यावर्षी जत्रेचे स्वरूप संपुष्टात आले ही त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब.
नेहमीप्रमाणे चळवळीतील सहकारी मित्रांची भेट झाली.ही एक ऊर्जा देणारी बाब असते.आपण सर्व एका परिवाराप्रमाणे जोडले गेलो आहोत.आणि या दरम्यानच्या काळात मी काय काय मिस केले याची जाणीव मला झाली.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे तनमनधनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देत समाज बांधवाना मदत केली त्या ज्ञातअज्ञात तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.
चैत्यभूमी ही ऊर्जाभूमी आहे कितीही वादळ-वारा पाऊस आला तरी समुद्राशी स्पर्धा करणारी ही सम्यक सम्बुद्ध गर्दी आटणार नाही.ती दिवसेंदिवस वाढत आहे वाढतच राहील.
जयभीम !!

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

हिंदूंच्या सणांवरच बंदी का?


आपल्या देशात जशी विविधतता आहे.त्याचप्रमाणे विविध सणांची रेलचेल देखील आहे.मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. दोन लोक एकत्र जमले की त्या क्षणांमधून आनंद साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.त्यास सामूहिकता लागू झाल्यावर अमूक दिवशी तमूक सण उत्सव साजरा करण्याच्या पूर्वपार प्रथेला सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले.
भारतात ढोबळमानाने हिंदूंची संख्या जास्त आहे.असे मानले जाते.

इथे कळीचा मुद्दा असा की मुळात हिंदू कोण?
हिंदू धर्मात जातीय विषमता असल्यामुळे आणि प्रत्येक जात दुसऱ्या जातीला नीच व कमी प्रतिष्ठेची आणि काही जाती स्वतःला इतरांपेक्षा उच्च आणि अतिप्रतिष्ठीत मानीत असल्यामुळे हे सर्व एकाच धर्मातील आहेत एकच आहेत हे मानणे शुद्ध मूर्खपणा ठरतो त्यामुळे कुणाकुणाला हिंदू या संज्ञेत बसवायचे याचा सर्वमान्य नियम नाही.नियम बनला तर हिंदू अल्पसंख्य ठरतील अशी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे विविध जाती पंथ इत्यादी अशा सर्वच समुहांचे सरसकटीकरण हिंदू करण्यात राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या जास्त फायद्याचे असते.यात धर्माच्या ठेकेदारांपेक्षा राजकीय धार्मिक ठेकेदार अशा सोयीचा पुरेपूर फायदा घेत आले आहेत.जसजसे समाज विकसित होऊ लागला त्याचे आधुनिकीकरण होऊ लागले तसे तसे समजात साजरे होणाऱ्या उत्सवसणांचे स्वरूप बदलू लागले.लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली तसे सामूहिकपणे सण साजरे करण्याची व्यापकता वाढली.

अर्थातच यामुळे प्रचंड प्रदूषण निर्माण होऊ लागले.मग ते ध्वनिप्रदूषण असो वायू प्रदूषण जल प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण असो कि सामाजिक प्रदूषण हे स्वाभाविक आहे.ही सर्वच प्रदूषणे ही मानवनिर्मित आहेत.अन त्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच त्यासोबत मानवी आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होतो आहे.हा धोका ओळखून समाजातील काही संवेदनशील समाजसुधारकांनी या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.समाजात विविध स्तरावर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जर इथे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की इथे अमूक धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे.त्याप्रमाणे त्या अमूक लोकांकडून सामूहिकरीत्या साजरे होणाऱ्या उत्सव सणांची व्यापकता आणि सामूहिकरीत्या केल्या जाणाऱ्या उत्सव सणांच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम हे इतर धर्मीयांच्या तुलनेत जास्तच असणार हे नैसर्गिकच ठरते.

समजा इथे हिंदू धर्मियांच्या ठिकाणी आपण जर मुस्लीम शीख ख्रिस्ती बौद्ध इत्यादी धर्म ठेवले आणि त्या लोकांनी अशाच प्रकारे सणउत्सव साजरे केले तर तेव्हाही हीच परिस्थिती उद्भवू शकली असती.किंबहुना या धर्मियांच्याकडून साजरे केल्या जाणाऱ्या सण उत्सवातूनही प्रदूषण हे होतच असते.फक्त फरक असा की तुलनेत यांची संख्या कमी असल्यामुळे उपद्रवमूल्य कमी प्रमाणात दिसते.शिवाय हिंदू आणि इतर धर्मियांच्या सणांची तुलना केल्यास हिंदू धर्मात सर्वात जास्त सणउत्सव आहेत आणि ते मोठ्याप्रमाणात साजरे केले जात आहेत असे आढळून येते.त्यामुळे केवळ हिंदूंच्या सणांवरच बंदी का? असा प्रश्न पडणे किंवा तशी भावना निर्माण होणे गैर आहे.अप्रस्तुत आहे.राजकीय नेते जेव्हा अशी मखलाशी करतात तेव्हा ते धर्माच्या आड राजकारण करतात हे स्पष्ट होते.

दुसरा मुद्दा महत्वाचा असा की भारतातील समाजाने स्वतःमध्ये काळानुरूप अनेक बदल केले आहेत.आणि जसजसे जग बदलत आहे तसतसे भारतीय समाजही स्वतःमध्ये बदल करत जातो आहे.त्यामुळेच तो सामाजिक धार्मिक सुधारणांसाठी आग्रही असलेला दिसतो.अर्थात यात अपवाद आहेतच आणि त्यातही राजकारण करणारे अपवाद जास्त असल्यामुळे तसेच त्यांचे उपद्रवमूल्यही भरमसाठ असल्यामुळे अशावेळी भारतीय सुधारणावादी नागरिक संभ्रमात पडलेला दिसतो.आपले नेमके कशात आहे हे त्यास ठरवता येत नाही.याचमुळे धार्मिक अस्मिता की सामाजिक आरोग्य सुधारणा या पेचात तो अडकलेला दिसतो.सामाजिक धार्मिक सुधारणा होऊ न देणे आणि त्यात आपली राजकीय पोळी भाजून घेणे हे राजकीय धार्मिक ठेकेदारांचे पूर्वापार चालत आलेले षड्यंत्र आहे.त्यामुळे आजकाल न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांच्या विरोधात उघडपणे नाराजी नापसंती आणि विरोध प्रकट करण्याचे प्रकार वाढले आहेत.

मुळात आपण एक नीट लक्षात घेतले पाहिजे की भारतीय न्यायालये धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत.न्यायालय नागरिकांचे मुलभूत अधिकार स्वातंत्र्य सामाजिक आरोग्य यासाठी कटिबद्ध आहे.आजवर आपण न्यायालयांचे निर्णय पाहिले तर त्यांनी कोणत्याही धार्मिक उत्सवसणांवर बंदी आणलेली नाही.स्पेसिफिकली दिवाळीबाबत बोलायचं तर दिवाळी साजरी करू नका असे न्यायालयाने कधीच म्हणलेले नाही ना तसा निर्णय दिला ना तसा तो देण्याचा त्यांचा अधिकार आहे.

ज्या ज्या गोष्टी मानवी आरोग्यास हानीकारक आहेत.सामाजिकदृष्ट्या अहितकारक आहेत.त्याच संबंधी निर्णय न्यायालयात दिले जातात.आणि यातही मुख्य मुद्दा असा की जोपर्यंत कुणी नागरिक न्यालयात जाऊन त्यासंबंधी दाद मागत नाही,तोपर्यंत न्यायालाय स्वतःहून हस्तक्षेप करून कोणताही निर्णय देत नाही.मुद्दा दिवाळीचाच असेल तर फटाके बंदीसाठी न्यायालयात जाणारे हे हिंदू धर्मीय बांधवच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.त्यामुळे आपल्या धर्माविरुद्ध इतर कुणीतरी इतर धर्मियांनी कारस्थान केले वगैरे संशय घेण्यात अर्थ नाही.शिवाय फटाके केवळ दिवाळीतच वाजवले जातात अशातला भाग नाही.तर वर्षाचे ३६५ दिवस आपल्याकडे काही ना काही सुरु असते.

यात गंमतीचा भाग असा की फटाक्यांचा शोध सातव्या शतकात चीनने लावला.ज्या देशातील वस्तूमालांवर आपण बहिष्कार टाकण्याच्या गप्पागोष्टी करतो.जो देश आपल्या देशाविरुद्ध खुसपटे काढत असतो.पाकिस्तानच्या सतत बाजूने उभा असतो अशा देशाने लावलेल्या शोधातून आपण आपला आनंद शोधणे,व्यक्त करणे हे देशप्रेमी नागरिकांसाठी कितपत योग्य आहे? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे.

कोणताही सणउत्सव साजरा करत असताना आपल्या प्रियजनांना इजा दुखापत होऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते.आनंदाच्या दिवशी अघटीत घडू नये अशीच सर्वांची भावना असेल.त्यामुळे अपघाताचे साधन आनंद व्यक्त करण्यासाठी उपयोगात आणने योग्य आहे काय? याचाही एकदा विचार व्हावा.




-   मिलिंद धुमाळे       
  १३-१०-२०१७ 

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

हवे पंख नवे - नाटक

हवे पंख नवे
‘जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही' याचा अर्थ इतिहासातील चूका पराभव विजय यांची उजळणी करत भविष्याचा वेध घेत वर्तमानात सजगपणे व्यवहारनीती ठरवायची असते.सध्याच्या काळात आंबेडकरी चळवळीत काहीशी उदासीनता अन विस्कळीतपणा आलेला आहे.स्वस्वार्थाच्या राजकीय सोयीसाठी ऐतिहासिक अपयश अपमान पराभव विसरून लाभाचा गरम केक खाण्याची अहमिका लागलेली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर एखाद्या दैवताप्रमाणे जपण्याची नवीच घातक सवय जडू पाहते आहे.बाबासाहेब त्यांचे विचार डोक्यात घ्यायचे की डोक्यावर असा प्रश्न निर्माण झालेला हा काळ.
अशा या काळात आपल्याला पुन्हा बाबासाहेब अनुभवता आले तर? एकीकडे अडवणूक अनन्वित अत्याचार हत्या,अन संरक्षणासाठी असणारे कायदे मोडून काढण्याचे षडयंत्र दुसरीकडे त्याच लोकांसोबत अभद्र राजकीय युती.राजकीय शहाणपणाचा अभाव.अशी आजची ही दुर्दैवी परिस्थिती पाहून बाबासाहेबांना काय वाटलं असतं?
या प्रश्नांचे थैमान आंबेडकरी चळवळीतील कुणाही संवेदनशील माणसाच्या डोक्यात घोंघावत असणार.त्याला मुर्त स्वरुपात रंगमंचावर आणण्याचा एक आगळावेगळा असा अविस्मरणीय कलाआविष्कार बोधी नाट्य परिषद यांच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे..
जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या “हवे पंख नवे”या काव्यमय कादंबरीवर आधारलेली तब्बल २ तास ५० मिनिटाची ही एक महानाट्यकाव्यांबरी.”हवे पंख नवे”याच नावाने निर्मित केली गेली आहे.
सदर दोन अंकी नाट्यकलाकृती मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगाने त्यांच्या खाजगी आयुष्यातील अतिशय नाजूक अशा काही गोष्टीही हळुवारपणे उलगडून त्या सामान्य जनमानसात विचारार्थ पुढे ठेवलेल्या आहेत.आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर इतर समाजातील प्रेक्षकांनीही हे अकथित बाबासाहेब समजून उमजून घ्यायला हवेत.काही लोकांनी यावर आक्षेप घेतला होता.मात्र योग्य संदर्भासहित उत्तम सादरीकरण आणि परिणामकारक संवादातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजवरच्या जनमानसातील उत्तुंग प्रतिमेला यत्किंचितही गालबोट लागू देत नाहीत.
याचे जबाबदारीयुक्त भान लेखक दिग्दर्शकानी बाळगल्याचे ठळकपणे जाणवते.त्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणखी लख्खपणे बावनकशी सोन्याप्रमाणे उजळून निघतात.याचे श्रेय अर्थात लेखक प्रेमानंद गज्वी आणि दिग्दर्शक अशोक हांडोरे यांना जाते.
डॉ.बाबासाहेबांचा जीवनप्रवास आणि सिंधू संस्कृती मोहेंजो दाडो ते स्वातंत्र्य अन भारतीय संविधान निर्मिती,धर्मांतर असा आठ हजार वर्षापूर्वीचा इतिहासाचा पट उलगडणे तसे ही आव्हानात्मक बाब. मात्र लेखक दिग्दर्शकानी हे आव्हान समर्थपणे निभावले आहे. त्यांना तेवढीच भक्कम साथ दिलीय यातील कलाकारांनी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत विक्रांत शिंदे आहेत.अनेकदा आपण पाहतो बाबासाहेबांची भूमिका करताना कलाकारास अनेक दिव्य प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.भल्याभल्यांना ते जमत नाही.जब्बार पटेलांच्या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटीने कठोर परिश्रमपूर्वक अभ्यास आणि स्वतःच्या व्यक्तीमत्वात बदल केले होते हे आपण जाणतोच.त्याचप्रकारे अत्यंत ताकदीने विक्रांत शिंदे यांनी बाबासाहेब अक्षरशः जिवंत उभे केले आहेत.एक क्षण आपण थेट बाबासाहेबांनाच अनुभवतो आहोत असे वाटून जाते.अत्यंत समरसून त्यांनी भूमिका केलेली आहे. उच्चविद्याविभूषित व्यासंगी बाबासाहेब आणि त्यांचे वैचारिक तत्वज्ञानात्मक संवाद पाठ करून सफाईदार संवादफेक आवाजातील चढउतार देहबोली हातांची लयबद्ध हालचाल याद्वारे विक्रांत शिंदे मूर्तिमंत बाबासाहेब साकारतात.ते अनुभवताना त्यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही सुरुवातीला पुतळ्यातून बाहेर येणारे बाबासाहेब शेवटी पुतळ्यात परततात या प्रवासात कुठेही रटाळपणा जाणवत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात येवून गेलेल्या तीन स्त्रिया अन त्यांच्याशी असणारे डॉ.बाबासाहेबांचे निष्कलंक नीतिमान आदरयुक्त व्यवहार हे आदर्शवत अन अनुकरणीय असेच आहेत.अनुषंगाने एकूणच पुराणकाळापासून आजपर्यंतच्या स्त्रियांचं दु:ख वेदना मांडून त्यांना त्या स्थितीत ढकलणाऱ्या समाजव्यवस्थेलाच “जगातला कोणता भाषातज्ञ तुमच्या सन्मानासाठी नवा शब्द घडवेल? असा रोकडा प्रश्न या कलाकृतीद्वारे विचारलेला आहे. डॉ.बाबासाहेब हे आधुनिक भारताचे शिल्पकार अन भारतीयांना गुलामीतून मुक्त करणारे मार्गदाते उद्धारक जरी असले तरी तेही शेवटी एक माणूस होते.त्यांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे हळवं मन होतं विरह प्रेम भाव भावना होत्या अन त्यातूनही सर्वात महत्वाचं होतं लोकांची दु:खे,स्वातंत्र्य, देशाचे हित या सर्वांचा समग्र आढावा हे नाटक घेते.नाटकात ओघाने येणारे अतिशय बारीक तपशील अभ्यासपूर्वक योजले आहेत ते पाहताना थक्क व्हायला होतं.अन नकळत आपण लेखकाच्या व्यासंगास दाद देवून जातो.काही प्रसंगी डोळे भरून येतात.तरी काही प्रसंगी हास्याचा शिडकावाही होतो.दुसऱ्या लग्नाच्या प्रसंगी अनमोल घडी (१९४६) चित्रपटातील
जवां है मोहब्बत हसीन है ज़माना लुटाया है दिल ने खुशी का खज़ाना
या गीताचा अतिशय चपखल वापर केला आहे.मात्र त्याची लांबी अनावश्यक वाटते.
रमाई आंबेडकर यांच्या भूमिकेत स्नेहल थाटर असून त्यांनी रमाईची प्रेमळ अन समाजाभिमुख तगमग अतिशय प्रभावीपणे साकारली आहे.फॅनीची भूमिका प्रियांका पाठारे यांनी लक्षणीय केली आहे.प्रणाली गणवीर यांनी सविता आंबेडकर यांची भूमिका उत्तम वठवली आहे.शाहू महाराजांच्या भूमिकेत निखिल जाधव चपखल.अलोक जाधव यांचा गांधीजी आणि सुनिल थोरात यांचा फाईल फेकणारा शिपाई लक्षात राहतात.हेच कलाकार पुन्हा कार्यकर्ते म्हणून वेगळ्या भूमिकेत.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या भूमिका अतिशय जिद्दीने आणि मेहनतीने निभावल्या आहेत.सर्वांचं टायमिंग आणि संवाद पाठांतर प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद त्या सर्वांचे चीज करून जाते.
नाटकाचा घाट हा पथनाट्यप्रकार असल्यामुळे इतर नेपथ्याचा वापर केलेला नाही.यामुळे हे नाटक इतर ठिकाणी ऑन डिमांड कुठेही सादर करण्याची सोय लक्षात घेतलेली आहे. संवाद अन इतर मुमेंटसाठी प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीताचा परिणामकारक वापर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
प्रत्येक आंबेडकरी हितचिंतक चळवळीतील कार्यकर्ता यांनी हे नाटक अन त्यातील विचार डोक्यात घेणे अन यासाठी समाजालाच पुन्हा बाबासाहेबांची भेट घडवून आणणे गरजेचे आहे.त्यामुळे या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हायला हवेत.
लोकांचा आग्रह असेल तर आम्ही हे नाटक कुठेही सादर करू असे दिग्दर्शक अशोक हंडोरे यांनी कळवले आहे.
त्याचा समाजात प्रचार प्रसार व्हावा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी.
- मिलिंद धुमाळे


पूर्वप्रकाशित - दैनिक जनतेचा महानायक 18-02-2017

Translate