Mahatma jyotiba fule satyashodhak chalwal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mahatma jyotiba fule satyashodhak chalwal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ एप्रिल, २०१६

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांनी चालविलेली सामाजिक उत्थानाची परिवर्तनाची चळवळ शेवटच्या टप्प्यात आणून तीस एक आयाम दिला आणि खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून ती यशस्वी केली.हिंदू धर्म नाकारून गुरूने सावर्जनिक सत्यशोधक धर्माची तर शिष्योत्तमाने बौद्ध धम्माची स्थापना केली.अलीकडे देशात ब्राह्मण्य ब्राह्मणवाद हिंदुत्व असे शब्द प्रचलित आहेत,सामान्य नागरिकांना हे समजण्यास कठीण होते.तर हे सर्व शब्द आणि त्यांची एका साध्यासोप्या शब्दांत व्याख्या करायची असेल तर “मनुवाद” अशी ती केली पाहिजे.हा शब्द कसा योग्य आहे याची आपण माहिती घेऊ.मनु ऋषीने जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात ब्राह्मण समाजास अवास्तव आणि अवाजवी असे भरमसाठ अधिकार दिले. याद्वारे ब्राह्मण समाजाने आपल्या भोवती एक अभेद्य अशी तटबंदी निर्माण करून घेतली नियम बनवले त्यास धर्माचे नाव दिले.वेद श्रुती पुराणे अरण्यके सगळीकडे ब्राह्मण गौरव आणि श्रेष्ठत्वाचे उल्लेख आहेत.ब्राह्मणोऽस्य मुखमासीद बाहू: राजन्य:कृत:ऊरू तदस्य यदवैश्य पद्धयां शूद्रो अजायत “ हा पुरुषसूक्तातील श्लोक आहे.जो प्रत्येक पूजेत आवर्जून भटजीद्वारे म्हटला जातो.त्याचा अर्थ असा- ब्राह्मण  मुखातून क्षत्रिय बाहुंपासून वैश्य मांड्यापासून आणि शुद्र पायांपासून निर्माण झाले. त्यामुळे आजही वेद आणि मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात.
मुळात देश स्वतंत्र झाल्यापासून आणि इथे लोकशाहीभिमुख राज्यघटना अंमलात आल्यापासून ते व्यवहारात नाहीत त्यामुळे आजवर कुणाचे काहीही अडले नाही.कालविसंगत असूनही काही लोकांना ते पुन्हा पुन्हा इथे रुजविण्याची हुक्की येते,राज्यघटना नाकारून मनुस्मृती लागू करावी असे वाटते.त्यामागे हिच श्रेष्ठत्व मिरविण्याची भावना आहे.बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदूइझम आणि शुद्र पूर्वी कोण होते ? हे दोन ग्रंथ  लिहिले ज्योतीबांनी शेतकर्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब लिहिले,ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक फुल्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी माळी महार मांग या लोकांस अर्पण केले.त्यांनी प्रस्तावनेत केलेला उल्लेख आजही  किती चपखल आहे हे वाचून लक्षात येते,”या लहानशा चोपडीस प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही.आमच्या देशांत ब्राह्मणांचे महत्व किती आहे  व ते धर्माच्या मिषाने लोकांवर केवढा जुलूम करतात हे प्रसिद्धच आहे.असे असता कोणी म्हणतील कि हे पुस्तक रचण्याचे कारण काय?तर त्यास असे उत्तर आहे कि,ब्राह्मण आपला कावा सर्व लोकांसी सारखा चालवीत नाहीत.कुणबी माळी वगैरे शुद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते.आणि ते इतर जातींच्या आणि विशेषकरून सांप्रतकाळच्या सुधारलेल्या लोकांस फारसे ठाऊक नाहीत.जे विद्या शिकून सुधारले आहेत.त्यांच्यामध्ये भटजीबुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे.परंतु अशी गोष्ट शुद्र जातींत नाही.तेथे अद्यापि बाजीरावाच्या वेळची भटशाही राज्य करीत  आहे.”
बाबासाहेबांनी या ब्राह्मण्याची व्याख्या केलीय.”जन्मजात उच्चनीच भाव” बाबासाहेब आपल्या बहिष्कृत भारत मधील अग्रलेखात म्हणतात.आंग्लाई आणि ब्राह्मणाई या हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या जळवा आहेत.व त्या एकसारख्या हिंदी जनतेच्या रक्ताचा शोष करीत आहेत.आंग्लाई सत्तेने देहाने लोकांना  गुलाम बनविले तर  ब्राह्मणाईने लोकांच्या आत्म्याला गुलाम करून ठेविले आहे.ब्राह्मण लोक सर्व प्रकारच्या चळवळीत धडाडीने भाग घेतात.राजकीय चळवळ हे तर त्यांचे जीवनच आहे.एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल परंतु राजकारणाच्या ताकाचा एखादा भुरकाजर त्यांना मिळाला नाही तर त्यांना अमांशाची पीडा होण्याचा संभव असतो.सामाजिक सुधारणेच्या चळवळीत हि त्यांचे अंग असते.विधवा विवाह बालविवाह केशवपन वगैरे सामाजिक प्रश्नांसंदर्भात त्यांनी आस्था दाखवली आहे.मजूर वर्गाच्या वतीने भांडवलशाहीवाद घालणाऱ्या चळवळीचे ते पुरस्कर्ते होऊ शकतात.नव्हें तर बोल्शेविझम व कम्युनिझमसारख्या आर्थीक हितसंबंधात क्रांती घडवून आणणाऱ्या चळवळी या देशात आणून त्या पाडाला लावण्यास ब्राह्मणच कारणीभूत झालेले आहेत.”
अर्थात तात्पर्य असे कि ब्राह्मणवादी शोषण व्यवस्था निर्माण करणारे जरी ब्राह्मण असले तरी त्यातही काही सुधारणावादी लोक होते.त्यासर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली.आणि यासाठी सर्व धर्मीय आणि सर्व जातीय घटकांना भारतीय राज्यघटनेत समानता बहाल केली.यापुढे देशात होणाऱ्या  कोणत्याही चळवळी या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी वाटचाल करतील तर यशस्वी होतील.नाहीतर त्यात फुटीरतावादी वृत्ती वाढीस लागून ती क्षीण होईल आणि उन्मळून पडेल.
अलीकडे हा ब्राह्मणवाद त्याच विचाराचे सरकार आल्यापासून अधूनमधून डोके वर काढतो आहे.
बाबासाहेबांनी अनुयायांना नितांत सुंदर असा बुद्धाचा धम्म दिला आहे.

प्रज्ञा शील करुणा हि त्याची वैशिष्ट्ये आहेत.बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला त्यावर आपण  चालले पाहिजे. त्याही पुढे बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि अतंत:हि भारतीय आहे.हे आंबेडकरी अनुयायांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.आपला धम्म आपल्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो.आपले आचरण नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे.आपण आंबेडकरांचा आदर्श सांगतो तेव्हा आपले वागणे सुद्धा तसेच असले पाहिजे त्यांच्या विचारांना गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.इतर समाज कसे सण साजरे करतात यावर टीका करण्यापेक्षा सामाजिक सौहार्दता वाढविण्यास आपणही मदत केली पाहिजे.आंबेडकरी तत्वज्ञान समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय चार सूत्रावर आधारभूत आहे.त्यासाठी आपण झटले पाहिजे.देशातिल सर्व समाज घटकांना न्याय देण्याची आणि सुखी समृद्ध करण्याची ताकद आंबेडकरी तत्वज्ञानात आहे.त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे.तीच खरी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती असेल.


- मिलिंद धुमाळे 
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

महात्मा ज्योतिबा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (b)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य ज्योतीबा फुलेंच्या वैचारिक चळवळीस सैद्धांतिकरित्या मूर्त रूप दिलं.केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषच दूर करण्यावर या दोघांनी भर दिला नाही तर समाजाच्या अनुषंगाने इतर क्षेत्रातही आपले भक्कम योगदान दिलेलं आहे.आज शेती प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत,दुष्काळ आक्राळविक्राळ रूप अनेकांचा घास घेतोय. 

शेतकऱ्यांच्या तळमळीतून ज्योतीबांनी १८८3 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” नावाचा ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ वाचला असता असे लक्षात येते कि इथल्या समूहांना जसे इंग्रजांनी छळले त्याहीपेक्षा किंबहुना जास्त शोषण आणि छळवणूक हि त्यावेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने केली होती. या ग्रंथात शेतीविषयक व्यावसाभिमुख शेतीचे संकल्प चित्र आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ज्योतीबांनी सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि व्यावसायिक अनुषंगाने समस्या आणि उपाय सुचविले होते.शेतकऱ्यांचे कर्ज,दुष्काळ समस्या आणि नियोजन,नापीकी,पीक पद्धती,शेती संरचना, शेतमालाची लुट करणारे दलाल आणि व्यापारी सावकार आणि एकूणच या सर्वातून नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर उपाययोजना सुचवल्या होत्या.शेतीच्या व्यवसायाला इतर उद्योगांची जोड दिली पाहिजे असे त्यांचे मत होते.शेतीसाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी,पाण्याचे दुर्भिक्ष आज प्रचंड प्रमाणात आहे.

त्यावेळी फुल्यांनी शेतीच्या पाण्यासाठी धरणे,विहिरी,तलाव कॅनॉल बांधले पाहिजेत असे सुचवले होते.पावसाचे पाणी अडवून त्या पाणीसाठ्याद्वारे कायमस्वरूपी सिंचन सुविधा निर्माण करण्याविषयी सांगितले.जवळ जवळ १३२-३३ वर्षे अगोदर त्यांनी शेतमालाला योग्य भाव देण्याविषयी मत मांडले होते,
हा ग्रंथ शेतीसाठी किती उपयुक्त आहे याचे अनुमान यावरून करता येवू शकते.दुर्दैवाने आजही यातील एकही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही असे म्हणता येईल.

बाबासाहेबांनी याच दृष्टीकोनातून पुढे आपल्या विचारांची दिशा दृढ केली.शेतजमीनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे असा विचार त्यांनी मांडला.तसेच सर्व शेती हि सामुदायिक पद्धतीने म्हणजे कलेक्टिव्ह पद्धतीने करावी असे सुचवले होते.ज्योतीबांनी सावकार दलाल यांवर आसूड ओढला बाबासाहेबांनी तोच विचार पुढे नेत खोती पद्धती विरोधी बील मंत्रीमंडळात सादर करून ती जुलमी शोषण पद्धती कायमची बंद केली.
शेतीकरिता जमीन  आणि पाणी हे दोन मुख्य घटक आहेत.शेतजमीन आहे परंतु पाणी नाही अशी परिस्थिती यासाठी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प सुचवला.दुष्काळावर मात  करायाची असेल तर पाण्याचे नियोजन अत्यावश्यक ठरते. यातून साकार झाला “दामोदर खोरे परियोजना प्रकल्प”

भारतातील थोर शास्त्रज्ञ डॉ होमी जहांगीर भाभा बाबासाहेबांचे खूप जवळचे मित्र होते.
बाबासाहेब कामगार मंत्री असताना त्यांच्याकडे जास्तीचे सिंचन / पाटबंधारे खाते सुद्धा होते,
एकदा बाबासाहेबांनी स्थापत्य अभियांत्रिक (सिविल)सी.एस.पिलाई यांचा "अणुउर्जेने पुरावर नियंत्रण" हा लेख वाचलायापूर्वी बाबासाहेब अणु उर्जेच्या वापराच्या संशोधनात होतेच. 

आपल्या काही लेक्चर्समध्ये त्यांनी हा पर्याय सुचविला सुद्धा होता. महापूर किंवा पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंत अमलात आणलेले सर्व पर्याय फसलेले असताना या सर्व धर्तीवर भारतीय इंजिनिअर्स अणूउर्जेच्या पर्यायाकडे का पाहत नाहीतअसे विचारताना त्यांनी १० सप्टेंबर १९५४ च्या Bombay Contemporary

या वृत्त पत्राचा दाखला दिलातसेच " Atomic science to  the  rescue " या मथळ्याखाली आलेल्या माहितीपर लेखाबद्दल उपस्थितांना प्रबोधित केले बाबासाहेब नेहमीच नवीन तंत्रज्ञाननवीन शोध आणि त्याचा मानवी आयुष्यातील उपयोग आणि फायदे यांचा खुल्या मानाने स्वीकार करत असतत्यांचा सतत नवनवीन शोध आणि पर्यायांचा अभ्यास सुरु असायचा या विषयाला फक्त चर्चेत न सोडता बाबासाहेबांनी यावर संशोधन करत असलेल्या पिलाई यांच्या कडून अणु ऊर्जेबद्दल आणि तिचा पूरनियंत्रण करण्यास कसा उपयोग करता येईल यावर सखोल चर्चा करून माहिती मिळवून घेतली.

अणुऊर्जेद्वारे आपण पूरसंकटांवर कायमचे उपाय तयार करू शकतो असे त्यांना समजल्यावर त्यांनी तशी मांडणी सुरु केलीआपल्या एका व्याख्यानात ते म्हणतात, " अणुउर्जा आणि तिचा वापर समजून घेणे खूप सोपे आहेज्यांना विद्युत उर्जेच्या विघटना वरील ओहमचा नियम माहित आहे त्यांना हे समजून घेणे अगदीच सोपे आहे" आण्विक भट्टीमधून अतिवेगवान न्यूट्रोन्सच्या मदतीने आपण नदीच्या पाण्याचा प्रवाह तसेच पाण्याचा स्तर मर्यादित ठेऊ
शकतो आणि त्या अनुषंगाने पुराच्या पाण्याला आपल्याला हवं तसं नियंत्रित करता येऊ शकेल तसेच नको असलेले जास्तीचे पाणी तिथल्या तिथे वाफेत रुपांतरीत करता येऊ शकते" एखाद्या प्रख्यात वैज्ञानिकाप्रमाणे ते अगदी सोप्या भाषेत सांगत होते. नदीचा पूर हा सतत भेडसावणारा प्रश्न आहे तेव्हा सरकारने फक्त जुन्या पद्धतींवर निर्भर न राहताशक्य तितक्या नवीन पर्याय आणि सूचनांचा त्यांनी स्वीकार करायला हवा असा इशारा सुद्धा बाबासाहेब देतात.

आपल्या अनुयायांना सुद्धा बाबासाहेब हेच सांगत कि आपण एका पारंपारिक अशा ठराविक चौकटीत राहून विचार करत राहतो आणि आपल्या फायद्याच्या बऱ्याचशा नवीन गोष्टींचा पारंपारिकतेच्या न्यूनगंडामुळे स्वीकार करत नाही हे बदलले पाहिजे.साधारणात: आपण पूर आला कि बचावकार्य करणे आणि केवळ पूर ओसरण्याची वाट पाण्याशिवाय आजतरी इतर कोणती उपाययोजना राबविताना दिसत नाही.बाबासाहेबांनी सुचविलेल्या उपायांवर विचार केल्यास पुराच्या पाण्याचा आणि पाणी टंचाईचा काही प्रमाणत नक्कीच सुटू शकेल यात शंका नाही. दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगलमहानदीसोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर "उर्जा खाते " बनवण्यात आले ,भारताने फक्त उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कंपनीचा पाया ठरला.बाबासाहेबांमुळे सिंचनजल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या मेहनतीमुळेबाबासाहेबांच्या या प्रकल्पामधील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे.

यावरून बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी कसे काय असू शकतात? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
बुलढाणा अलमपूर येथे गेल्या २५ वर्षापासून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.सदर मतदार संघ हा भाजपाचा असून त्या पक्षाचे आमदार चैनसुख संचेती यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे.गावात बहुसंख्येने असणारा समाज कुणबी माळी म्हणजेच
आरक्षण गटातील ओबीसी तथाकथित वर्णव्यवस्थेत शुद्र गणला गेलेला समाज.

ज्या समाजातूनच क्रांतिसूर्य ज्योतीबा फुलेंनी विद्रोह केला ब्राह्मणी विचार व्यवस्था नाकारली.तोच समाज मनात ब्राह्मण्य जपत आहे, हे धक्कादायक आहे.ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलं आता ते ब्राह्मणेतरांनी अंगिकारलेय कि काय अशी विचित्र परीस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे भाजपा सरकार देशभरात आंबेडकरांची १२५ वे जन्मशताब्दी वर्षे म्हणून जयंती साजरी करत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते त्या उपक्रमास असे डांबर फासण्याचे काम करत आहेत.विशेष म्हणजे स्थानिक पोलीस प्रशासन हि यात सामील आहे.हे दुर्दैवी म्हणावे लागेल.  


-       मिलिंद धुमाळे

- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 






सोमवार, ११ एप्रिल, २०१६

महात्मा ज्योतिबा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (A)

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.
कारण महाराष्ट्राला या तीन थोर समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे.विषमतेत बरबटलेल्या महाराष्ट्राची विस्कटलेली सामाजिक घडी बसवली ती या तिघांनी.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं आहे.बाबासाहेबांनी तीन गुरु केले तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा जोतीबा फुले.या तिघांचे वैशिष्ट्य हे कि तिघांनीही दैवावाद नाकारला.ब्राह्मणवादाचा कडाडून विरोध केला.
बाबासाहेबांनी त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविला.
महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवर्गाविषयी अतिशय संवेदनशील होते.हि संवेदनशीलता केवळ मानवीय दृष्टीकोनातून आलेली नसून त्यात पितृत्वाची छाया आहे.
पेशवाईचा काळ १८१८ ला संपलेला असला तरी पेशवाईने दिलेली वैशिष्ट्ये समाजात तशीच रुजलेली होती.
फुले दांपत्यांचे आगमन पेशवाईनंतरचे, परंपरेने चालत असलेल्या रुढीप्रिय बुरसटलेल्या सामाजिक व्यवस्थेत ब्राह्मणातील विधवा स्त्रियांचे केशवपन ,विधवा विवाह ,जरठ कुमारिका विवाह ,सती प्रथा, बेकायदेशीर संतती व तिची भ्रुणहत्या इत्यादी चालूच होते त्याविरुद्ध जोतीबांनी अविरत संघर्ष केला.आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा असलेला जरठ नवरा वृद्धपकाळाने वारल्यानंतर घरातीलच कुणाकडून तरी दिवस गेलेल्या बाल विधवेचे बाळंतपण करण्यासाठी त्यांनी त्यावेळी भारतातील पहिले प्रसूतीगृह काढले.त्याचबरोबर अनाथ आश्रम देखील काढले ज्यात विधवा बाळंतीण आणि तिचे मूल देखील रहात असे.भारतातील पहिली मुलींची शाळा आणि अस्पृश्य समाजासाठी शाळा काढली.आयुष्यभर ब्राह्मणवादाशी संघर्ष करणाऱ्या फुले दांपत्यानी आत्महत्या करायला निघालेल्या आणि ब्राह्मण असलेल्या विधवा काशीबाई यांना त्यापासून परावृत्त करून बाळंतपणानंतर त्यांच्या मुलाला ”यशवंत”ला दत्तक घेतले.यावरून त्यांची सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि नेणीव किती उच्चकोटीची होती याचा प्रत्यय येतो.त्याकाळच्या सनातनी लोकांनी फुले दांपत्याचा अनन्वित छळ केला होता.एकदा तर चिडून त्यांनी मारेकरीसुद्धा पाठवले होते.आजच्या काळात जसे मॉर्निंगवॉकला मारतात किंवा  जायला सांगतात तसे, तर आश्चर्य म्हणजे माणूसकी दाटून आली ती सुपारी दिलेल्या मारेकऱ्यासच त्याने जोतीबांचे कार्य पाहिले त्यांचा नम्र विनयशील स्वभाव अनुभवला  आपण एका सज्जन भल्या माणसाला विनाकरण मारणार होतो याचा त्याला पश्चताप झाला.पुढे हाच मारेकरी धोंडीराम कुंभार जोतीबांच्या मार्गदर्शना खाली पंडीत झाला.
जोतिबांनी सावित्रीमाईना बरोबर घेऊन १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा काढली.बहुजन समाजातील अस्पृश्यांना आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.याच शाळेत ज्ञानाचे बाळकडू घेत शिकत असलेल्या अवघ्या अकरा वर्षाच्या मुक्ताबाई साळवे या विद्यार्थ्यीनीने एक निबंध लिहिला होता.निबंधाचे शिर्षक “महारा-मांगाच्या दु:ख विषयी “ असे असून त्यात मुक्ताबाई लिहिते “वेद तर ब्राह्मणांचा मक्ता आहे.ब्राह्मणांनीच त्याचे अवलोकन करावे.यावरून उघड दिसते कि महारा-मांगांना धर्म पुस्तक नाही.वेद जर ब्राह्मणांसाठी आहेत तर त्यांच्याप्रमाणे बरहुकूम वर्तवणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे.आम्हाला जर धर्म पुस्तक नाही ते पाहण्याचा अधिकार नाही तर आम्ही धर्मरहित लोक आहोत असे साफ दिसते कि  नाही बरे?” स्त्री शिकली कि तीला आत्मभान येते.गुलामीविरुद्ध ती बंडखोरी करते.मुक्ताबाई साळवे हे त्याचे ज्वलंत उदाहरण.
बाबासाहेब आयुष्यभर समाजातील दुर्बल वंचित शोषित घटकांच्या शिक्षणासाठी न्याय हक्कांसाठी संघर्षरत राहिले.जोतीबांचा वैचारिक वारसा पुढे चालवत त्यांनी भारतीय स्त्रीला घटनेत स्थान दिले.समानतेचा दर्जा  बहाल केला.तिच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. ”न स्त्री स्वातंत्र्यम महर्ती” म्हणत मनूने स्त्रीवर्गास हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत लोटले होते.या अंधारयात्रेत भारतीय स्त्री आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बाबीमध्ये परावलंबतेशिवाय काहीही प्राप्त करू शकली नाही.बाबासाहेबांनी “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती” हा निबंध लिहिला.त्याचे पुढे पुस्तक प्रकाशन केले.हा निबंध म्हणजे स्त्री मुक्तीचा जाहीरनामा जो पुढे हिंदू कोडबिल रूपाने अवतरला.क्रातीबा जोतीबा फुलेंचा वैचारिक वारसा पुढे रुजवत त्यांनी स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून हक्क अधिकार दिले.पुरुषप्रधान मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारलेले अधिकार भीमस्मृतीने प्राप्त करून दिले.आजची स्त्री हि अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते आहे.आपला ठसा उमटवते आहे.आज असे कोणतेही क्षेत्र नाही काम नाही कि ते करण्यास स्त्रिया असमर्थ ठरतील.आज आधुनिक स्त्री हि यशाच्या शिखरावर आहे.स्त्री शिकली कि संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हणतात.अर्थात या सर्व यशामागे प्रगती मागे या दोन महान समाजसुधारकांचे कष्ट आहेत.हेही विसरून चालणार नाही.

-       मिलिंद धुमाळे
- पूर्वप्रकाशित दैनिक सकाळ २०१६ 


Translate