3 जानेवारी रोजी पुण्यातील मारुंजी,जांभे व नेरे अशा तीन गावच्या सीमेलगतचा साडेतीनशे एकरचा परिसरात एका संघटनेच्या शक्तीप्रदर्शनाद्वारे पुरोगामी महाराष्ट्राच्या भवितव्याला आव्हान देणारा मेळावा भरवला गेला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) म्हणजे संघ हि कट्टरपंथीय हिंदुत्ववादी धार्मिक संघटना म्हणून प्रसिद्ध आहे.संघाने असे शक्तीप्रदर्शन करणे हे काही नविन नाही,या अगोदरही संघ देशात असे प्रदर्शन करत आलेला आहे.यावेळी बात थोडी निराळी आहे.यावेळी त्यांनी निवडून आणलेलं त्यांच्याच विचारांचे सरकार सत्तेत आहे.या अगोदरही संघाने असे शक्तिप्रदर्शन केलेले आहे. परंतु तेव्हा केवळ “हिंदू शक्ती संगम” अशा नावाने ते होत असे.यावेळी मात्र “शिवशक्ती संगम” असे नाव देत शक्तिप्रदर्शन झाले.यास अनेक वेगळे संदर्भ आहेत.पुणे मावळ भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वाने घडलेला प्रदेश इथल्या मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला.सह्याद्रीपर्वताच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ" आणि खोर्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.स्वातंत्र्योत्तर अलिकडील काळात ढोबळमानाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्या विचारांच्या लोकांचा असणारा बहुजनबहुल भाग म्हणून या प्रदेशाची ओळख आहे.”छत्रपतींचा आशीर्वाद चला देवू मोदींना साथ” असा निवडणुक प्रचार करत भाजपा सत्तेत आली.यात संघांचा वाटा मोठा अन महत्वाचा होता.सदर कार्यक्रमात आजवर कधीही न पाहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची साईबाबास्टाईल आशीर्वाद देणारी प्रतिमा म्हणजे जाणीवपूर्वक त्यांचे केले जाणारे हिंदुत्ववादी दैवतीकरण आहे.“गोब्राह्मणप्रतिपालक कि बहुजन प्रतिपालक” असा महाराष्ट्रात उभा वाद आहे.ब्राह्मण व्यक्तीने सुरु केलेल्या या संघटनेत सुरुवातीला महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही मोजक्या व्यक्तीच सहभागी होत्या. आणि हे बराच काळ असेच राहिले त्यामुळे संघाची भटाबामणांची संघटना म्हणून ओळख निर्माण झाली. पुढच्या काळात यात ब्राह्मणेतर वर्गातील लोकाना प्रवेश दिला जावू लागला. हि ओळखपुसण्यासाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे वाढलेले प्रस्थ आणि संघावर सतत होणारी ब्राह्मण्यवादी असण्याची टिका या गोष्टी दडपण्यासाठी संघाला हे नाव घेऊन शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करत बहुजन तरुण आकर्षित करणे भाग होते यात भविष्यातील राजकीय गणिताचा सुद्धा एक भाग आहे.संघाचा स्वयंसेवक हा अल्टीमेटली भाजपाचा सभासद,कार्यकर्ता,पदाधिकारी किंवा उमेदवार असतो.हे सर्व लक्षात घेता भविष्यात सामाजिक आणि राजकीय प्रतलावर फार मोठी उलथापालथ होणार आहे हे नक्की.वास्तविक आरएसएस (संघ) हे कट्टरपंथीय हिंदुत्ववादी संघटन आहे.त्यांना पुरातन हिंदू संस्कृती वेदशास्त्रे आणि त्याअनुषंगाने आलेली परंपरा थोडक्यात पूर्वीची वर्णव्यवस्था इथे हवी आहे.यासाठी संघाने अनेक विंग्स काढल्या आहेत.त्यापैकी प्रमुख म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासी कल्याण आश्रम राष्ट्र सेविका समिती या माध्यमातून संघ समाजातील विविध स्तरातील तरुणांना आकर्षित करून संघात सामील करून घेत आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मताप्रमाणे संघात विविध सामाजिक स्तरातून येणाऱ्या स्वयंसेवकांना हिंदू म्हणून पाहिले जाते,त्याचबरोबर त्यांची मूळ ओळख कायम जपली जाते.याचा अर्थ स्वयंसेवक हिंदू असला तरी त्याची पोटजात त्याच्याबरोबर कायम असणार आहे.आणि त्याअर्थाने समाजात जी विषमता आहे ती पुन्हा संघात कायम असणार आहे,समाजात जसे हिंदू धर्म म्हणून एक आणि पुन्हा जात म्हणून निराळी ओळख अशीच इथेही परिस्थिती आहे,
पूर्वी केवळ हिंदू समाजापुरते मर्यादित असणारा संघ आता आणखी व्यापक झाला आहे,विविध सामाजिक पुरोगामी चळवळ संघटना यांच्यातील समन्वयाचा अभाव,एकमेकांविषयी असणारे संशय,वैचारिक मतभिन्नता,मरगळ निरुत्साह यामुळे जी सामाजिक वैचारिक पोकळी निर्माण झाली,आणि सांघिक स्तरावरील एकात्म भावनेचा अभाव निर्माण झाला नेमका तोच मुद्दा पकडून संघशक्तीने हि पोकळी भरून काढायचा प्रयत्न सुरु केला आहे.याचबरोबर हिंदू म्हणून एक नविन व्यापक थिअरी मांडायला सुरुवात केली.मोहन भागवत अलीकडे हि अचाट थिअरी मांडतात कि मुस्लिम ख्रिश्चन हे सुद्धा हिंदूच आहेत,मुस्लिम समाज स्वभावाने हिंदू आहे, त्यांना भजन आवडते म्हणून त्यांनी कव्वाली सुरु केली, मूर्तीपूजा आवडते म्हणून मजार-कबर पूजन सुरु केले त्या अर्थाने ते हिंदूच आहेत.खरेतर वरवर हे सार्धम्य दिसत असले तरी तसे ते मुळातच नाही.हा केवळ एक अतिशय चपखल असा बुद्धिभेद आहे.याच हेतूने २००४ साली संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंचची स्थापना करून आणखी एक विंग निर्माण केली.आणि आता ख्रिश्चन विंग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हि सगळी एक गंमतच आहे,संघाचा मुस्लिम धर्माला विरोध आहे, ख्रिश्चन धर्माला विरोध आहे, आणि म्हणून धर्मांतरास विरोध.यासाठी धर्मांतर विरोधी कायदा करण्यास संघ आग्रही आहे.बाबरी पतन याच विरोधातून घडले, देशभरात दंगली घडल्या त्या याच विरोधातून.हिंदुत्ववाद्याकडून दिल्ली-गोवा येथील चर्चवर हल्ले केले गेले, मिशिनरी लोकांच्या हत्या झाल्या त्या याच विरोधातून.मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी शिफारशी केलेल्या सच्चर कमिटीला संघाने पत्र लिहून कडवा विरोध केलेला आहे.संघाच्या धर्म जागरण मंचाने ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या मुळच्या हिंदू धर्मियांचे पुन्हा फेर धर्मांतर आग्रा येथे आयोजित केले होते.परंतु राजकीयदृष्ट्या ते नुकसानीचे ठरल्यामुळे मोदी सरकारच्या सांगण्यावरून सदर कार्यक्रम रद्द केला गेला, मुस्लिम धर्मियांची हिंदू धर्मात घरवापसी मध्यंतरी गाजली होतीच.यावरून संघाचा खरा अजेंडा आणि छुपा अजेंडा लक्षात यायला वेळ लागत नाही.
संघ जे दाखवतो आहे दर्शन घडवतो आहे ते वरवरचे असून जमिनी हकीकत हि आहे.संघाचा विचार सर्व स्तरात पसरविणे आणि आपले विरोधक आपल्याच अजेंड्याखाली सामावून घेणे हे धोरण संघाने अलीकडे राबविण्यास सुरुवात केली आहे.या अगोदर मात्र संघात हिंदू नसणाऱ्या समाजाला प्रवेश नव्हता.मुस्लिम जर हिंदूच आहेत आणि ईश्वर हा सर्वव्यापी आहे.चराचरात सामावलेला आहे तर बाबरीमध्ये राम मंदिरच असावे असा अट्टाहास संघ कशाला करत आहे? याचा अर्थ परस्परविरोधी विधाने करून गोंधळ उडवून देणे आणि आपले अजेंडे रेटने हेच संघ आजवर करत आलेला आहे.भाजपात असणारे मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांचे भाजपामध्ये काय स्थान आहे हे सर्वांना माहित आहे, दादरी किंवा इतर अशा घटना घडल्या कि हे नेते अज्ञातवासात जाणेच पसंत करतात. त्यामुळे अशाच प्रकारे एकदा का संघात मुस्लिम आणि ख्रिश्चन विंग उभ्या राहिल्या कि त्या आपल्या धर्मातील विरोधकांना अडचण निर्माण करणाऱ्या ठरणार हे ओघाने आलेच.संघाच्या भगव्या छत्रीखाली सगळेच धर्म एकवटले कि हिंदू हा एक व्यापक वर्ग निर्माण होईल आणि तोच एकमेव धर्म बाकी त्याच्या विविध शाखा पंथ म्हणून गणल्या जातील,यामुळे विविधता संपुष्टात येईलच,त्यापेक्षा जास्त घातक इथे पुन्हा काही विशिष्ट मुठभर लोकांचे निरंकुश राज्य निर्माण होईल.कोणत्याही गोष्टीला एकदा समाजाने स्वीकारले सामाजिक मान्यता दिली कि ती प्रथा होवून जाते.इथल्या वर्णव्यवस्था त्यानंतरची जातीप्रथा आजही टिकून आहे ती यामुळेच.
मोहन भागवत एका भाषणात म्हणाले होते कि संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही. संघ राजकारण करत नाही, संघ जाणूनबुझून पक्षीय राजकारण निवडणुका यापासून लांब राहतो हे भाषण निवडणुका जाहीर होण्याआगोदरचे आहे.त्यानंतर संघाने भाजपसाठी कसा देश पिंजून काढला आणि स्वयंसेवक कसे अहोरात्र मेहनत घेत होते याचे कवीत्व निवडून आल्यानंतर सुरु झाले होते.निवडणुकांच्या अगोदर संघाशी थेट संबंध टाळणारे नेते किंबहुना संघाच्या कार्यक्रमास उपस्थित न राहणारे निवडून आल्यानंतर मात्र संघाच्या बैठकींना पूर्ण गणवेशात हजेरी लावू लागले.राजकारण करत नाही असे म्हणणाऱ्या संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्य’शाळा’ घेऊन सरकारच्या कामगिरीचा अहवाल मागवला होता.यावरून संघ जे दाखवतो त्यापेक्षा संघाची ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे फार निराळी असतात, धक्कादायक असतात हे स्पष्ट होते. सामाजिक समरसता हा संघाचा आवडीचा अजेंडा.हिंदू धर्मातील विषमता हि जातीमुळे आलेली आहे.त्यामुळे हिंदू धर्म आजही परस्पर भेदभाव पाळत असतो.जातियवाद जोपासत असतो.ते मिटविण्यासाठी संघ आग्रही आहे असे दाखवत असला तरी त्यांना जात निर्मुलन करायचे नसून केवळ जाती तशाच ठेवून सर्व जातींना समान पातळीवर पहा असे सुचवायचे असते.आणि समानता हि सुद्धा वरवरची असून समरसतेच्या नावाखाली व्यक्तींचे वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारत ते धार्मिकअधिपत्याखाली आणावयाचे आहे.स्वतंत्र आचार-विचार न करता धर्मात जे नियम आहेत जी शिकवण आहे ती पाळली गेली पाहिजे असे संघाचे म्हणने आहे.त्यामुळे हि सामाजिक समरसता तकलादू आणि ब्राह्मण्यवादच जोपासणार हे उघड आहे.आणि म्हणून त्याचा समाजाला काहीएक उपयोग नाही.खरेतर आता जातींना विसर्जित करत त्यांचे समूळ निर्मुलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे काम मोहन भागवत व त्यांचा संघ चांगल्याप्रकारे करू शकतो.जर त्यांना याविषयी प्रामाणिक कळकळ असेल तर. कारण ज्यांनी निर्माण केले आहे त्यांनीच हे नष्ट केले पाहिजे त्याविरुद्ध बोलले पाहिजे.समाजातील जात निहाय घटक जसे कि ब्राह्मण मातंग चांभार मराठा माळी धनगर कोळी इत्यादी या सर्वानीच आपआपल्या जाती विसर्जित करून केवळ आपण हिंदू आहोत हीच एक व्यापक ओळख ठेवावी असे आवाहन मोहन भागवत का करत नाहीत? असे केले तर खरी समरसता जी त्यांना अभिप्रेत आहे ती रुजण्यास मदतच होईल. एकीकडे भेदाभेद पाळू नका म्हणायचे आणि दुसरीकडे सर्वात जास्त आरक्षण उपभोगणारा हिंदूधर्मातीलच मागास वर्गाच्या आरक्षणाची समीक्षा करायचा आग्रह धरायचा.हा बुद्धिभेद संघच करू जाणो.आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तीन उदात्तमुल्ये या अगोदरच स्विकारली आहेत संघाला हेच नको आहे.त्यामुळे संघाला आणखी वेगळी समरसता कशाला हवी आहे? संघ राजकीयदृष्ट्या राज्यघटना मानत असला तरी धार्मिकदृष्ट्या मानत नाही.याचा अनेकदा प्रत्यय आलेला आहे.जो भाजपा आज सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळा उभारतो आहे त्याच सरदार पटेलांनी इ.स.१९४८ मध्ये संघावर गांधी हत्येमुळे बंदी घातली होती. संघात महिलांनाही प्रवेशबंदी आहे.महिलांसाठी संघाने वेगळी राष्ट्र सेविका समिती काढलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरुष स्वयंसेवक असतात म्हणजे स्वइच्छेने काम करतात तर महिलांना सेविकेचा धर्म निभवावा लागतो. संघाचे संचालन असले कि या सेविका रस्त्याच्या कडेने रांगोळ्या काढण्याचे काम करतात. महिलांवरील बलात्काराच्या घटना इंडियामध्ये जास्त होतात, भारतात नव्हे, असे वादग्रस्त विधान आसाममधील सिल्चर येथे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होतेच.हि पुरुषसत्ताक मानसिकता संघासाठी चुकीची नाही कारण संघ हिंदुत्ववादी पुरातन रूढी परंपराच समाजात रुजविण्याचे काम करतो आहे.
संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत. या टीकेला समाधानकारक उत्तर देणे संघाला आजही जमलेले नाही. संघाला स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वजही मान्य नाही.त्यांच्या शाखेत केवळ भगवा ध्वजच फडकावण्याची परंपरा आहे.कालही शिवशक्ती संगम कार्यक्रमात केवळ भगवा ध्वज फडकवला गेला.
यासर्व बाबी लक्षात घेता संघाची वाढत जाणारी ताकद हि पुरोगाम्यांना आव्हान देत अडचणीची ठरणार आहे.त्याच बरोबर इथल्या सोशल फॅब्रिकला पुन्हा वार करत उसविणारी ठरेल,सामाजीक आणि राजकीय घुसळण एका आणखी वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीत परावर्तीत होण्याची शक्यता जास्त आहे.
यामुळे इथल्या पुरोगाम्यांची अवस्था निर्णायक वळणावर येवून ठेपली आहे.पुरोगामी म्हणले कि फुले-शाहू-आंबेडकरवादी, लोकशाही वादी, समाजवादी, गांधीवादी, कम् युनिस्ट या प्रवाहांतील संघटना, व्यक्ती, पक्ष यांचा समावेश होतो. पुरोगामी चळवळ संघटना यांच्यातील समन्वयाचा अभाव,एकमेकांविषयी असणारे संशय,वैचारिक मतभिन्नता,मरगळ निरुत्साह यामुळे जी सामाजिक वैचारिक पोकळी निर्माण झाली,आणि सांघिक स्तरावरील एकात्म भावनेचा अभाव निर्माण झाला नेमका तोच मुद्दा पकडून संघशक्तीने हि पोकळी भरून काढायचा प्रयत्न सुरु केला आहे. पुरोगामीसमूह एकमेकांवर कुरघोड्या करणे टिका करणे कधी इतरांपेक्षा गांधीना महान संबोधणे मार्क्सला ग्रेट म्हणने आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांना केवळ गरजेपुरते वापरून घेण्याचे काम करत आले आहेत. परस्परांशी सलोखा न ठेवल्यामुळे वैचारिक मतभेद तीव्र होत दरी वाढत चालली आहे.याचा पुरेपूर उपयोग संघाने केलेला दिसतो. संघाचे जे काही अजेंडे राबविणे चालू आहे ते देशाच्या एकात्मतेला हादरा देणारे ठरणार आहेत.धर्मधीष्ठीत समाजरचना निर्माण करून पुन्हा इथे चातुर्वर्ण्यव्यवस्था लागू करणे हि सत्ताधारी व ब्राह्मण्यवादी घटकांची धडपड आहे.यात विविध पुरोगामी पक्ष,समुहात घुसखोरी केलेले लोकही आहेत.घटनाप्रणीत समता,न्याय,बंधुता या मुल्यधीष्ठीत असलेला आधुनिक समाज यांना नको असतो तर विषमतेवर आधारलेला सनातन समाज त्यांना पुन्हा हवा आहे.यासाठी वेळीच सावध होत पुरोगामी चळवळीनी आळस झटकून पुन्हा एकदा जोमाने काम सुरु केले पाहिजे.
- मिलिंद धुमाळे