बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बुलेट ट्रेन

भाजपा सरकारने मतदारांनी निवडून देण्यासाठी प्रचारसभा आणि अनेक घोषणांमध्ये इथल्या गरीब,मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लब्धप्रतिष्ठीत अशा सर्वांनाच अनेक भुरळ पाडणारी आश्वासने दिली.आमचे सरकार निवडून दिलेत तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.लाखो तरुणांना रोजगार नोकरी उपलब्ध करून दिला जाईल.वगैरे हि केवळ आश्वासनेच राहिली हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीच अमलांत आलेलं नाही.
यापैकी एक आश्वासन म्हणजे बुलेटट्रेन हि सरकारची बहुचर्चित महत्वाकांक्षी योजना आहे.यासाठी भारत सरकारने (भारतीय रेल्वे) जापान इंटरनेशनल कॉर्पोरेशन एजेंसी (जेआईसीए) यांच्यात करार केला आहे.यासाठी जपान सर्व मदत करण्यास तयार आहे.ट्रेन्स बोग्या, ट्रेक्स आणि संचालनपद्धती आणि  इतर आवश्यक उपकरणे जपान उपलब्ध करून देणार आहे.सदर योजनेचा सध्याचा अंदाजे खर्च ९८ हजार करोड रुपये अपेक्षित आहे. देशातील हि पहिली बुलेटट्रेन मुंबई ते अहमदाबाद (गुजरात) अशी धावणार आहे.

भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेवर आली आहे त्यांनी व्यापक लोकहिताचे निर्णय न घेता अनेक चुकीचेच निर्णय घेतले असल्याचे जाणवते.
अनेक प्रकारच्या बंद्या आहेत.अनेक नविन कर आहेत.यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.
केंद्राचे स्वत:चे म्हणजे दिल्ली राज्याचे या वर्षीचे २०१५-२०१६ चे बजेट ४१५०० करोड रुपये.महाराष्ट्र राज्याचे २०१५-१६ चे वार्षिक बजेट ५४ हजार ९९९ कोटी रुपये आहे.हि दोन प्रमुख राज्ये म्हणून महत्वाची आहेत, यासाठी त्यांचे  उदाहरण वानगीदाखल दिले आहे.या दोन राज्याच्या एका वर्षाचा आर्थिक बजेट पाहिला आणि बुलेटट्रेनच्या अंदाजित खर्चाचा आकडा पाहिला तर तफावत स्पष्ट दिसते.
बुलेटट्रेनचा खर्च दोन मोठ्या राज्यांचा एक वर्षच्या आर्थिक अर्थ संकल्पाच्या कितीतरी पट जास्त आहे.

मुळात भारत हा विकसनशील देश आहे.इथे कित्येक वर्षे नागरिकांना अजूनही पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.
मागे दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी एका भाषणात म्हणाले होते कि भारतातील पन्नास हजार गावात आजही रस्ते पाणी नाहीत वीज नाही.भारतातील अर्धी अधिक जनता आजही भयानक गरीबी उपासमार कुपोषण बेरोजगारीने त्रस्त आहे.अर्धा भारत उपाशी पोटी निजणारा आहे जो बेघर आहे.फुटपाथ हाच त्याचा आसरा आहे.
आधुनिकता आणि तिचे फायदे हे सर्वांनाच हवेसे असतात.अगदी टोलेजंग टॉवरमध्ये राहणारे असोत कि झोपड्या फुटपाथवर राहणारे असोत, आधुनिक सुख सुविधांचे आकर्षण सर्वांनाच आहे.
मात्र आपण प्राधान्यक्रम कशाला द्यायचा हे सरकारने ठरवायचे असते.मेट्रो ट्रेन आली.खूप गाजावाजा झाला.सुरुवातीला काही दिवस तिचे २० रुपये रिटर्न तिकीट होते.त्यामुळे तिला भरघोस प्रतिसाद मिळत होता.अनेक गरिबांनी मध्यमवर्गीयांनी त्यावेळी मेट्रोने प्रवास केला.आज त्याच गरिबांना ती मेट्रो परवडत नाही.त्यांना बेस्टच्या बसनेच पूर्वीसारखा प्रवास करावा लागत आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.जे उच्चपदस्थ आहेत असाच सधन वर्ग अशा सोयी-सुविधांचा लाभ घेताना दिसतो आहे.रिलायन्स दर सहा महिन्यात भाववाढ करा म्हणून न्यायालयात जातेय.सदर सुविधा फक्त धनाढ्य लोकांसाठीच बनविण्यात आली आहे काय? गरिबांना या सुविधेचा फायदा का घेता येत नाही याची समीक्षा होणार कि नाही?
बुलेटट्रेनचा सध्याचा अंदाजे खर्च जो कि ९८ हजार करोड रुपये आहे. त्याच्या दररोजच्या व्याजापोटीच १.३७० करोड रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. सदर बुलेटट्रेनचे काम हे २०१७ ते २०२३ या सहा वर्षात पूर्णत्वास येईल असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अर्थात आपल्या देशातील अनेक प्रकल्प हे कसे आणि किती वर्षे रेंगाळत पूर्ण होतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.त्यामुळे हा अंदाजे खर्चाचा आकडा आणखी फुगण्याची शक्यता जास्त आहे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद या प्रवासाठी ट्रेनचे सर्वाधिक दर प्रथमश्रेणी भाडे शताब्दी एक्स्प्रेससाठी १९२० रुपये आहे. तोच विमानप्रवास भाड्यापोटी १७२० रुपये मोजावे लागतात.
बुलेटट्रेनचे सुरुवातीचे भाडे किती असेल हे अजून ठरलेले नाही.मात्र ते यापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.
शिवाय तो खर्च भरून काढण्यासाठी तेवढी प्रवासी संख्याही असायला हवी. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर एवढे प्रवासी उपलब्ध होतील काय? हा खरा प्रश्न आहे. 
आणि तो गरीबमध्यम वर्गीयांना परवडणार आहे काय?
हिरा व्यापारी आणि कापड व्यापारी यांची संख्या विचारत घेतली तरी ती समाधानकारक भरत नाही.त्यामुळे बुलेटट्रेन हा सफेद हत्ती ठरेल कि काय अशी दाट शंका इथे निर्माण होते.
 एकीकडे आजारी बंद पडलेले सरकारी उद्योगसमूहादी प्रकल्प सरकार बंधन मुक्त करत त्याचे खाजगीकरण करत आहे 
तर दुसरीकडे असे अवाढव्य प्रकल्प राबवून आपल्याच निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
आहे त्या सरकारी उद्योगांना प्रकल्पांना चालना देवून त्यांचे पुनरुज्जीवन करायचे सोडून सरकार हातचे सोडून पळत्याच्या मागे लागले आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे. या निर्णयामुळे सरकारने गरीबीची क्रूर थट्टा चालवली आहे असे वाटते. फ्रांसची राणी "ब्रेड मिळत नाहीत तर केक खा" असे म्हणाली होती हे जगप्रसिद्ध वाक्य आपल्या देशात अनेक गोष्टीत लागू होते. मध्यमवर्गीय गरीबांच्या डोळ्यातील स्वप्ने चकनाचूर करत धडधडत सुसाट धावणारी बुलेटट्रेन किती शेतकर्यांना आत्महत्या करण्यासाठी फायदेशीर ठरेल हे येणारा काळ ठरवेल.सामान्य माणसाने केवळ आपल्या अस्तित्व संपत जाणाऱ्या या आणि अशा अनेक अंकी नाटकाचे प्रेक्षक बनून साक्षीदार व्हायचे. मेक इन इंडियाच्या गोंडस नावाखाली. स्मार्ट सीटीच्या रेट्याखाली अनेक मध्यमवर्गीय शहरी ग्रामीण आदिवासी कुटुंबे प्रभावित होत संपून जातील.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी सरकारकडे पैसा नसतो तेच सरकार कधी परदेशात निधी सढळ हाताने देते.
तर कधी धनदांडग्यांच्या पंचतारांकित सोयीसाठी अशी कर्जे  काढते. 
सोन्याची सुरी ऊरी मारून घेण्याचा हा प्रकार आहे.
कर्ज काढून वेगाची मजा घेण्याचे सोहळे साजरे करण्याची हौस नक्की कशासाठी आणि कुणासाठी?

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी विशेष २०१५

६ डिसेंबर १९५६ रोजी एक धगधगता ज्वालामुखी अरबी समुद्राच्या काठावर शांत झाला.
दिल्ली २६ अलीपुर रोड या निवासस्थानावरून त्यांचे पार्थिव विमानाने रात्री सव्वा तीन वाजता मुंबईला आणण्यात आले. विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो स्त्रि-पुरुषांना रडू कोसळले दु:ख अनावर झाले.वातावरण अतिशय शोकाकुल आणि गंभीर असल्यामुळे उपस्थितांपैकी कुणीतरी सूचना केली कुणीही कोणत्याही घोषणा देवू नयेत.आणि सांताक्रूझ येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली.
बाबासाहेबांचा चेहरा दिसावा म्हणून अम्बुलंसमध्ये खास प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात आली होती.सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलांचे अंतर हजारो मैलाचे वाटू लागले होते.इकडे राजगृहाजवळ लाखो लोक रात्रीच जमायला सुरुवात झाली होती.त्यावेळी मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हते टेलिफोनही नव्हते आणि तरीही बाबासाहेबांच्या मृत्यूची खबर देशभर वाऱ्याच्या वेगाने पसरली.देशभरातून आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून लोक मिळेल त्या वाहन साधनाने दादर गाठत होते.एकमेकांना धीर देत होते. हे एक अभूतपूर्व कोडेच. जमलेले लोक सतत बुद्धम शरण गच्छामि म्हणत हात जोडून प्रार्थना करत होते.अन्नपाण्यावाचून बसलेल्या लोकांच्या डोळ्यातून धारा मात्र थांबत नव्हत्या.
ज्याने हजारो वर्षे गुलामगीरीच्या अमानवीय अस्पृश्यतेच्या शोषणाच्या आणि माणुसकी नाकारणाऱ्या धर्म व सामाजीक अशा व्यवस्थेला सुरुंग लावत पशुवत आयुष्य कंठनाऱ्या शुद्राती शूद्रांना माणसात आणले.आज तो लाखोंचा पोशिंदा मार्गदाता शांत झाला होता.चिरनिद्रा घेत होता.
खरेतर ज्यांच्या स्पर्शाने सावलीने विटाळ होतो अशा खुळचट आणि बालिश रूढी प्रथा पाळणाऱ्यांच्या धर्माचा आणि सामाजीक व्यवस्थेलाच मोठ्या करुणामय अंतकरणाने शुद्ध केले. अशा महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महापरिनिर्वाण दिन.करोडो भारतीयांच्या आयुष्यातील एक दु;खद दिवस.
एका युगपुरुषाच्या युगाचा अंत झाला .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त.म्हणून जेव्हा घटना लिहायला इथल्या विद्वान आणि गुणी अशा बुद्धिमत्तेच्या कुलुपाच्या चाव्या ज्यांच्या कमरेला लटकलेल्या असायच्या अशा लोकांनी जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायला नकार दिला.परदेशी घटनातज्ञ व्यक्तीने कंत्राटी पद्धतीने घटना लिहिली असती तर देशावर नामुष्की ओढवली असती. असे घडू नये म्हणूनच देशाची बदनामी टाळण्यासाठी त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली.
प्रचंड बुद्धिमत्ता फर्डे वक्ते आणि सर्वसमावेशक अशी दूरदृष्टी असलेला नेता भारताला लाभला हा भारताचा बहुमान.
बाबासाहेबांच्या ज्ञानाच्या कक्षा परीपेक्ष हे फार उत्तुंग आणि मोठे होते.
आज महाराष्ट्र आणि देशही दुष्काळाच्या चिंतेने व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येने हळहळतो आहे. बाबासाहेबांनी १९३८ सालीच यावर उपाययोजना सुचवल्या होत्या. स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी “खोती” पद्धत बंद करणारे बिल कायदेमंडळात दाखल करून ती पूर्णतः बंद केली.त्या वर्षीच्या “जनता”च्या अंकात बाबासाहेबांनी यावर संदर्भात एक लेखच लिहिला होता.”शेतकरी बंधुनो तुमची दु:खे अनेक आहेत.ती दूर करण्यासाठी तुम्हीच कंबर कसली पाहिजे.शेतकर्याच्या मानेभोवतालचे सावकारी पाश दूर करण्याकरिता आणि सावकारशाहीस आळा घालणारेदुसरे बिल आम्ही मंत्री मंडळात सादर करणार आहोत.तुमच्या सामाजीक भेदाचा फायदा घेऊन तुंचे शत्रू तुमची एकी होऊ देणार नाहीत.तरी याबाबतीत कुणबी,मराठे,महार,चांभार, वगैरे सर्वांनी शेतकरी तेवढा एक आहे,असे समजून आपल्या हिताच्या आड कुणाला येवू देवू नका.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीहि उपाय सुचविताना बाबासाहेबांनी सांगितले कि “शेती हा राष्ट्रीय उद्योग असेल,सामुहिक शेती (कलेक्टीव्ह फार्मिंग)करावी लागेल.शेती विमा,नदीजोड प्रकल्प,दामोदर व्ह्याली योजनेच्या माध्यमातूनच पुढे त्यांनी भाक्रानांगल योजना तयार केली.बाबासाहेबांच्या या कृषीविषयक योजनांची इमानदारीने अमलबजावणी केली तर शेतकर्याच्या आत्महत्येचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
राजकीय दुष्टीकोनातून त्यांनी इंग्लंडमध्ये १९३१ साली गोलमेज परिषदेत अस्पृश्य समाजाच्या स्वतंत्र मतदार संघाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला.आणि मतदार संघ पासहि करून घेतला,मात्र त्यावेळीमहात्मा गांधीना हि कृती समजली नाही त्यामुळे त्यांना हे हिंदू धर्माचे विभाजन वाटले त्या चुकीच्या अर्थातून त्यांनी त्या विरोधात आमरण उपोषण केले.गांधीजींच्या या उपोषण दबावामुळे एक समझोता झाला.आणि स्वतंत्र मतदार संघाऐवजी अस्पृश्यांना आरक्षित जागा देण्यात आल्या.त्यालाच “पुणे करार” असे म्हणतात.या कराराप्रमाणे अस्पृश्यांना आपला उमदेवार निवडण्याचा अधिकार संपुष्टात आला.सर्वच मतदारआरक्षित जागेसाठी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडू लागले.
यामुळे अस्पृश्य समजाच्या आयुष्यात जी संभाव्य सर्वांगीण क्रांती निर्माण होणार होती ती झाली नाही.
परंतु बाबासाहेब हार माननार्यापैकी नव्हतेच त्यांनी आरक्षणाची तरतूद करून मागासवर्गीय समूहांच्या हक्कअधिकाराचे रक्षण केले.आज आरक्षणाचा विषय अनेकदा चर्चेला येत असतो,गंमत म्हणजे जे आरक्षण लाभार्थी समूह आहेत तेही अज्ञानातून आरक्षण संकल्पनेला विरोध करत असतात.वास्तविक सर्वात जास्त आरक्षण मिळविणारा वर्ग हा ओबीसी आहे.आणि तरीही हा वर्ग कधी त्याच्या विरोधात असतो तर कधी उदासीनतेमुळे आणि जातीय दृष्टिकोनातून आरक्षण लढ्यात उतरत नाही.आणि ज्यांना केवळ साडेतीन पूर्णाक टक्के आरक्षण आहे तो आंबेडकरी समाजाच सर्वात जास्त संवेदनशील आणि जागरूक होवून रस्त्यावर उतरताना दिसतो आहे.
बाबासाहेब धर्माराच्या मुद्याबाबत अत्यंत संवेदनशील होते गंभीर होते.धर्मांतरासंबंधी त्यांनी केलेली मीमांसा लक्षणीय आहे.ते मुक्ती कोन पथे या अग्रलेखात म्हणतात “धर्मांतर हा मौजेचा विषय नाही.हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे.जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात नेण्याकरीता नावाड्याला जेवढी पूर्व तयारी करावी लागते तेवढीच पूर्व तयारी धर्मातरा करिता करावी लागणार आहे.” धर्म आणि धम्म याची तुलना करताना ,जिथे धर्म संपतो तिथून धम्म सुरु होतो.धर्माचा संबंध देवाशी आहे तर धम्माचा संबंध मानवाशी आहे.दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर धर्मात देवाला स्थान आहे तर धम्मात मानवाला केंद्रबिंदू मानले आहे.धर्माची संकल्पना देवाशिवाय पूर्ण होत नाही तर धम्माच्या संकल्पनेत त्या व्यवस्थेला स्थानच नाहीं.धर्माच्या संकल्पनेत “ईश्वर” आणि “आत्मा” अटळ आहेत.
याशिवाय धर्म संकल्पना पूर्ण होत नाही,मात्र धम्मामध्ये “ईश्वर” आणि “आत्मा” यांचे अस्तित्वच नाकारलेले आहे.यासंदर्भात “धम्मचक्क प्रवर्तनसुत्त”म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या पहिल्याच उपदेशात बुद्ध म्हणतात.”आपला जो मार्ग आहे जो धम्म आहे,त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्त्यव्य नाही,त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही,तसेच धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही” बुद्धाचा हा विचार अथवा त्याचा धम्म हा केवळ हिंदू धर्मावर इलाज नाही तर जगातील सर्वच “धर्म” म्हणून ज्या सन्कल्पना आहेत त्या समग्र संस्थेवरील अंतिम इलाज आहे.ज्यामध्ये केवळ मानावाचे हित पाहिले गेले आहे.यामुळे खुप अभ्यास आणि विचारांती तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर टिकणारा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि त्यांच्या अनुयायांनाही त्याची १९५६ साली दीक्षा दिली.त्यानंतर लगेचच बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले.बाबासाहेबांना जावून आज ५९ वर्षे झाली.त्यानंतर त्यांचा पोरका झालेला समाज व्यक्तिगत पातळीवर संघर्ष करून प्रगती साधतो आहे.राजकीयदृष्ट्या अतिशय वाईट अवस्था असताना अतिशय चिवटपने स्पर्धेत टिकून राहणे हे तो शिकला आहे.परंतु काही गोष्टी या सरकार पातळीवरच शक्य होत असल्यामुळे आणि  राजकीय नेतृत्व सक्षम नसल्यामुळे अनेक गोष्टीत काही ठिकाणी या समजाला अडवणूक सहन करावी लागते आहे.प्रसारमाध्यमे आणि इथली प्रस्थापितव्यवस्था मुद्दाम असे नेतृत्व सतत पुढे करतो कि ते समजाला न्याय देवू शकणार नाही.संसदेत जेव्हा आपले म्हणने समाजाचे प्रश्न आणि व्यथा मांडायची वेळ येते तेव्हा समाजाचे नेतृत्व म्हणून तिथे गेलेले लोक विधायक गोष्टीवर बोलण्यापेक्षा कविता बोलून उपस्थितांचे मनोरंजन करत असतात,हे अत्यंत घातक आणि लाजिरवाणे आहे.आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग अशा पद्धतीने वाया घालवला तर आपल्याला पुन्हा समाजात जावून कोणत्या तोंडाने मत मागण्याचा पाठिंबा मागण्याचा अधिकार उरतो याचा संबंधित नेतृत्वाने विचार करायला हवा.बाबासाहेबांचे इंदुमील मधील स्मारक ,इंग्लंड मधील स्मारक यांचे भावनिक भांडवल करत दोन्ही आघाड्यांनी आंबेडकरी जनतेला खेळवले आहे.वास्तविक आता आंबेडकरी जनतेनेच सांगायची गरज निर्माण झालेली आहे कि आम्हाला जगातील सर्वात मोठे पुतळे आणि स्मारके बागा प्रेक्षणीय स्थळे नको आहेत.आम्ही भावनिक बनून भक्त म्हणून जगत नाही.. आंबेडकरी जनता विवेकवादी आहे,विचारी आहे.
बाबासाहेब हे विश्व वंदनीय आहेत सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत तशा अनेक पदव्या त्यांना विदेशातून मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत,परदेशातही त्यांचे पुतळे आहेत.त्यांच्या उत्तुंग कामाची देश-विदेशात दखल घेतली जात आहे.आता गरज आहे ती मुलभूत हक्क अधिकारांची.सरकार त्यावर खर्च करत नाही मात्र स्मारक पुतळे उभारून भक्तसंप्रदाय वाढवत आहे.
एकीकडे आरक्षण संपविण्याचे कारस्थान चालू आहे तर दुसरीकडे सरकारी शाळा-कॉलेज मोठ्याप्रमाणावर बंद केले जात आहेत.खाजगी शिक्षणसम्राटाना शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करून शिक्षण महाग केले जात आहे.
केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण हे खरे तर मोफत दिले गेले पाहिजे.परंतु असे होताना दिसत नाही,
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि औषध-उपचारावर होणारा भरमसाठ खर्च हे सर्व पाहता इंदुमिलच्या ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असे गरिबांसाठी सरकारी सुसज्जहॉस्पिटल किंवा केंब्रीज ऑक्सफोर्डच्या धर्तीवरील मोठे सर्व शाखांचे असे सरकारी महाविद्यालय निर्माण केले पाहिजे.याद्वारे बाबासाहेबांच्या उर्वरित कार्यासही हातभार लागेल आणि या माध्यमातून त्यांची स्मृती निरंतर राखली जाईल.
क्रांतीसुर्याच्या चिरतरूण वैचारिक चळवळीस विनम्र अभिवादन !! जयभीम !!

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

पुरोगामी VS प्रतिगामी आणि मुस्लीम समाजाची मानसिकता

पुरोगाम्यांवर प्रतिगामी वर्तुळातून नेहमीची होणारी टीका म्हणजे पुरोगामी केवळ हिंदू धर्मावर टीका करतात,मुस्लिम धर्मावर टीका करत नाहीत.हे खरे नसते हे सर्वांना माहित आहे अगदी असे मत मांडणाऱ्यांना देखील.त्यामुळे आता बोला.आता बोला.असा धोशा प्रतिगामी वर्तुळातून लावला जातो आहे.तोपर्यंत यावर पुरोगामी वर्तुळातून टीकेची झोड उठली देखील होती.
आपण इतरांच्या चुकाच दाखविण्यात आघाडीवर असतो त्यामुळे हे लक्षात कोण घेतो?
लोकमत वृत्तपत्राच्या मंथन पुरवणीत इसीसचा पैसा आणि त्या संबधित लेखात वादग्रस्त पिगी बँक कार्टुनचा उपयोग ग्राफीक्स डिझायनरने केला. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असे म्हणत मुस्लिम धर्मियांनी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करत निषेध व्यक्त केला. या हिंसक निषेध करणाऱ्या जमावाचा कडक शब्दांत निषेध पुरोगाम्यांनी केलेला आहे.हे कृत्य बिलकुल पटलेले नाहीभावना दुखावल्या ठीक आहे.कशासाठी?त्यावर ‘अल्लाह रसूल मोहम्मद’ नाव होते म्हणून.ती भावना खरी असेल तर निषेधाचा संविधानिक मार्ग आहे.कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा कोणत्या निषेधाचा मार्ग आहेअसा कायदा हातात घेणे योग्य आहे काय लोकमतनेही तातडीने माफी मागत सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो ही संशयास्पद आहे.त्यातही आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे वाईट आहे.तुम्हाला जर पूर्वकल्पना होती तर असा प्रकार करायची गरज नव्हती.अन्यथा आपल्या कृत्यावर शेवटपर्यंत ठाम रहायला हवे होते.
मुळात एक गोष्ट मुस्लिम समुदायाने लक्षात घ्यायला हवी देशातील वातावरण खराब आहे याप्रसंगी आपण सर्वांनी फार गांभिर्याने वागले-बोलले पाहिजे.असहिष्णुतेचे वातावरण असताना राष्ट्रगीताला उभे राहण्यास नकार देणे हे आगीत तेल ओतण्यासारखे आहे.ज्यांना शारीरिकदृष्ट्या जमणारे नव्हते त्यांना सोडून इतरांनी तरी उभे राहणे हे त्याप्रसंगी गरजेचे होते.अर्थात त्यांना तेव्हा राष्ट्रगीत चालू असताना आग्रह करणारे.त्याचा व्हिडिओ बनविणारे हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत.त्यांना बाहेर हुसकावून लावणाऱ्यांचा देखील निषेध केला पाहिजे.राष्ट्रगीताला उभे रहावे असा कायदा नाही.तर ती नैतिकता आहे.ती पाळणे हा सभ्यपणा आहे ती पाळायची कि नाही हा आपला प्रश्न.मात्र अशा वातावरणात उगाच आणखी पेच निर्माण करून वातावरण खराब करणे टाळले पाहिजे.
इस्लामिक स्टेटचा क्रूर दहशतवाद जगप्रसिद्ध असताना आपण त्या संबंधातील बातमीसाठी असे पाऊल उलणे हे आपल्याला अडचणीत आणनारे ठरेल असे वाटले नाही कायअनेक वृत्तपत्रांनी इस्लामिक स्टेटच्या समर्थनार्थ मुस्लिम रस्त्यावर’ असे बातमीचे वार्तांकन केले आहे.याचे भान किती मुस्लिमांना आहेया आंदोलनाने भारतीय समाजात चुकीचा मॅसेज गेला.पिगी बँक म्हणजे पैसे साठविण्याच्या उपयोगी येणारे साहित्य आहे.ते जगभरात उपलब्ध आहे.त्याचे काय करायचे?आजच्या आधुनिक युगात त्यावर नाव आल्याने भावना भडकण्याची खरेतर गरज होती असे मला वाटत नाही.आपल्या धार्मिक भावना इतक्या ठिसूळ कावर्तमान पत्र आणि त्यातील चित्राचा जीव काही तासांपुरता असतो संध्याकाळ झाली कि वर्तमानपत्र रद्दी होते.त्याचे आयुष्य,अस्तित्व संपून जाते.ते दुर्लक्षित केले असते तर कुणाला काहीच कळले नसते.आपला धर्म आणि धार्मिक प्रतीके इतकी टोकदार का आहेत?
दुसरे म्हणजे इस्लामिक स्टेटच्या झेंड्यावर तीच नावे आहेत.कुणाची अमानुषपणे कत्तल करण्याआधी ते जोरजोरात अल्लाह हु अकबर” म्हणत असतात.
याचा आपण कधी रस्त्यावर उतरून निषेध केलाय कामी आजवर पाहिलेले नाही.
इस्लामिक स्टेट आणि इस्लामचा संबंध आहे कि नाहीभारतीय मुस्लिमांची त्याबाबत अधिकृत आणि सर्वमान्य भूमिका काय आहेआपली मुले तिकडे आकर्षित का होतातआणि मला अनेकदा पडलेला प्रश्न जगभरातील मुस्लिम समाजाचे भारतीय मुस्लिम समाजाला काय पडले आहे? काय संबंध आहे तुमचाजगातील इतर मुस्लिम देशात कुणावर अन्याय अत्याचार झाला तर त्याचा निषेध भारतात काहे आता कळेनासे झाले आहे. यात मानवतावादी दृष्टीकोन मानायचा तर नुकत्याच पेरीसवर झालेल्या हल्ल्यासाठी कुठेही मानवतावादी दृष्टीकोन पहायला मिळाला नाही. रझा अकादमीने केलेल्या उन्मादाचा बट्टा ठळकपणे उमटलेला आहे.सिरीयात तिकडच्या मुस्लिमांना त्रास त्यासाठी तुम्ही इस्लामिक स्टेटच्या युद्धात सहभागी व्हायला जाणार आहात?
तुमची ओळख भारतीय म्हणून आहे कि जागतिक मुस्लिम म्हणून आहेउद्या त्याचे लोण इथे आले तर काय करायचेयाची किमंत सर्वांनाच आणि पर्यायाने देशाला फार मोठी चुकवावी लागेल.यातून जे प्रश्न विचारले गेले आहेत ते शिकलेल्या पुरोगामी आणि प्रगल्भ मुस्लिम मित्रांना त्यांनी यावर गंभीरपणे चर्चा करायला हवी.निर्णय घ्यायला हवा.जसे सर्वच हिंदू वाईट नसतात तसे सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.कट्टरपंथीय आणि पुरोगामी यात फरक केलाच पाहिजे.
आज समाजाला धर्माची गरज नाही तर चांगले शिक्षण आरोग्य आणि जगण्यासाठी नोकरी व्यवसाय या मुलभूत हक्क अधिकारांची गरज आहे. त्यासाठी लढले पाहिजे.
धर्म-जात या खुळचट संकल्पनाच हळूहळू बाद करत गेले पाहिजे. अर्थात सगळेच धर्म.
वेगळे धर्म वेगळे पंथ वेगळी ओळख हे सर्व कुठवर जोपासायचेसर्वाचा एकच धर्म एकच पंथ "भारतीय" म्हणून आपण विकसित नाही का करू शकतनिदान भारतापुरते तरी?
इस्लामिक स्टेटबद्दल भारतीय मुस्लिमांचे वाढणारे आकर्षण चिंताजनक आहे.




Translate