गुरुवार, ३१ मार्च, २०१६

मोहन भागवत - सत्ताबाह्य केंद्र

देशातील काही प्रसारमाध्यमे विशिष्ट विचारसरणी असलेल्या लोकांच्या हातात आहेत.माध्यमांचा बेजबाबदारपणा देशाचे वातावरण कसे बिघडवू शकतो याचा अनुभव जेएनयु प्रकरणात झिवाहिनीने चालविलेल्या बनावट व्हिडिओ फुटेजमुळे आपण घेतला आहेच. देशात अराजक माजविणारांना उत्तेजन देण्याचे काम देशातील प्रसारमाध्यमे करत आहेत.हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

तुमच्या एरियात एखादे मंडळ असेल जसे जयंती मंडळ / गणेशोत्सव मंडळ / किटीपार्टी/हळदीकुंकू मंडळ वगैरे,
एखादी स्वयंसेवी संघटना असू शकेल हे लोक स्थानिक पातळीवर काम करत असतील,काही केवळ इव्हेंट साजरे करत असतील,म्हणेज केवळ धार्मिक सण उत्सव.यात कुणीतरी अध्यक्ष असू शकतो आणि त्याअनुषंगाने इतर पदे असू शकतात.या मंडळातील काही लोकांनी ठरवले तर ते त्यांच्या शाखा इतर एरियात लोकांना हाताशी धरून वाढवू शकतील आणि त्याचा विस्तार तालुका जिल्हा राज्य अन देशात काही ठिकाणी अशी मंडळे काढून करू शकतील.या स्वयंसेवी संघटना मंडळातील पदाधिकाऱ्यांना स्वत:ची काही मते असू शकतात.आणि तशी ती असण्याला किंवा जाहीर करण्याला लोकशाहीच्या अनुषंगाने त्यांना मुभा आहे.हि मते धार्मिक सामाजिक जातीय सुधारणेची असू शकतात. ती इतर सामाजिक उपक्रम किंवा त्यांच्या मंडळ स्वयंसेवी संघटना यांच्या विशिष्ट अजेंड्याला पूरक असू शकतात.म्हणजे सुधारणेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडे सुद्धा असू शकतात.शिवाय वरील मंडळे सर्व जात-धर्म-पंथीय असू शकतात.आणि यात अनेक मंडळानी आपला ड्रेसकोड देखील निश्चित केलेला असू शकतो.जसे कि टी-शर्टस शॉर्टस त्यावर मंडळाची नावे किंवा आदर्शांची नावे असू शकतात यांचा एक विशिष्ट ध्वज असू शकतो.विशिष्ट प्रार्थना घोषणा असु शकते.इथपर्यंत ठीक आहे.हे जोपर्यंत कायद्याच्या कक्षेत राहून सामाजिक उप्रकम करत आहेत, तोपर्यंत हे सर्व करण्याचा त्यांना अधिकार आहे.या सर्व संघटनाना देशातील कायदे संविधान देशाचा ध्वज यांचा उचित मानसन्मान करणे बंधनकारक असते.प्रतीके सोडली तरी किमान संविधान अन कायदे तर पाळावेच लागतात.
आता हे सगळे तुम्हाला तसे माहित असणारच,असायला हवे.आपला प्रत्येकाचा अशा मंडळाशी कधी ना कधी संपर्क आलेला आसतो किंवा आपला त्यात सक्रीय सहभाग असतो.
तुम्ही कधी असे पाहिले आहे का कि अशा एखाद्या मंडळातील अध्यक्षाने कधी एखादे वक्तव्य केले आणि त्याची राष्ट्रीयपातळीवर बातमी केली गेली? शिवाय त्यावर चर्चाही घडवून आणली गेली?
त्याचबरोबर अशा अध्यक्षाला थेट झेडप्लस सुरक्षा सुद्धा सरकारच्या वतीने प्रदान केली गेली?
आश्चर्य आहे ना.धक्कादायक आहे.परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष ज्यांना संघाच्या भाषेत सरसंघचालक म्हणतात त्यांच्याबाबत हे घडवून आणले जाते.
देशातील मिडिया हे पद्धतशीरपणे करत असते.त्यात सरकारही त्यांचेच म्हणून झेडप्लस सुरक्षा सुद्धा.
तसे पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि एक सामाजिक संघटना आहे असे बोलले जाते.जर हे खरे असेल तर इतर  संघटनाप्रमाणे त्यांना वागणूक न देता प्रसिद्धीची हि स्पेशल ट्रीटमेंट कशीकाय दिली जाते?

आपल्याकडे आपण लोकाभिमुख कामे लोकांची प्रगती विकास यासाठी शासन प्रणाली व्यवस्था निर्माण केली आहे .सर्व गोष्टींसाठी एक व्यवस्था आहे आणि कार्यक्रम धोरण राबविणारी सक्षम यंत्रणा आहे. सदर व्यवस्था हि लोकशाहीनुसार चालते.
आपल्याकडे सामाजिककार्यातून काही बदल घडवायचे असतील किंवा त्यासंबंधीचे निर्णय घ्यायचे असतील तर ते लोकांना कन्व्हिन्स करून त्यापातळीवर आपण करू शकतो अर्थात ते सर्व निर्णय हे  देशात सद्यस्थितीत प्रचलित असलेल्या कायद्याच्या अधिनच असावे लागतील.याशिवाय नागरिकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करू शकणारे निर्णय संसदेतच बहुमताने घेतले जातात.
आरक्षणाचा प्रश्न हा असाच नागरिकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारा आहे. आरक्षण कुणाला किती  द्यायचे यासाठी सरकारने रीतसर आयोग नेमलेला आहे. सदर आयोग आरक्षण संबंधात निर्णय घेतो.आणि तशा  शिफारशी वेळोवेळी संसदेला करतो.संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी बिहार निवडणुकांच्या काळात  आरक्षण संदर्भात एक वक्तव्य केले होते. भाजपासरकार त्यांचेच आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा परिणाम सरकारवर जरूर होणार आहे.त्यामुळे तत्परतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांची म्हणजे पक्षाची आरक्षण  धोरणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी लागली होती,खरेतर मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आनण्यासाठी असे वक्तव्य मुद्दाम केले असल्याचे चर्चाही होती.उद्देश काहीही असो.त्यानंतरही  त्यांनी त्याची पुनरूक्ती केली.ज्यांना खरेच गरज आहे अशा लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.ती अयोग्य नाही.परंतु निकष काय तर आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांना आरक्षण मिळू नये  असा त्याचा अर्थ आहे.जो कि फसवा आहे.हे उघड आहे.आता यासाठी भागवत एक सरकारबाह्य समिती नेमा असेही  सुचवतात.हे सत्ताबाह्य केंद्र कशासाठी थोपवले जातेय याचा विचार झाला पाहिजे.

भागवतांच्या वक्तव्यांना राष्ट्रीय स्तरावर घेतले जाते.त्यामुळे त्याचा परिणाम इथल्या जनमानसावर होतो. मध्यंतरी भागवतांनी “भारत माता कि जय” या घोषणे संदर्भात वक्तव्य केले अपेक्षेप्रमाणे इथल्या  प्रसारमाध्यमांनी ते उचलून धरले,त्याचा परिणाम भारतीय संसदेवर झालाच परंतु देशात नागरिकांमध्ये संशयी वातवरण निर्माण करणारा ठरला.उन्माद वाढवणारा ठरला. देशात अराजक निर्माण होते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. एमआयएमच्या अक्बरुद्दीन ओवेसी यांनी “माझ्या गळ्यावर सुरा ठेवला तरी मी भारत माता  कि जय बोलणार नाही” असे उत्तर दिले अर्थात हे कुणाही सामान्य देशप्रेमी व्यक्तीला आवडणारे नव्हते.लोकांना बातमी मागचे कारण माहित नव्हते.ओवेसी आपल्या प्रत्येक सभेत जय हिंदुस्थान म्हणत असतात हे विशेष.
महाराष्ट्रातहि याचे पडसाद उमटले आणि एमआयएमच्या आमदारास निलंबन झेलावे लागले.
वास्तविक एमआयएमचे  निलंबित आमदार वारीस पठाण यांनी मी जयहिंद,वंदे मातरम म्हणेल असे म्हणले  होते.परंतु “भारत माता कि जय’च”  म्हणले पाहिजे या घोषणेवर सगळे  अडून राहिले.आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्यांनी भावनिकतेला झुकते माप देत सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने निलंबनाचा ठराव पास केला.ज्या विधानामुळे देशात असंतोष निर्माण होतो ते विधान वेगवेगळ्या ठिकाणी किती वेळा भागवत बदलतात पहा, त्यांनी  पहिले  विधान केले 3 मार्चला
Mar 3, 2016 - नव्या पिढीला 'भारत माता की जयबोला हे शिकवायला लागते 
Mar 27, 2016   कलकत्ता येथे दुसरे विधान “ जगाला भारत माता की जय बोलायला लावायचं आहे”  
Mar 28 , 2016   लखनौ - "भारतमाता की जयबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाल्याप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजअसा जयघोष करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करण्याची गरज नसल्याचे सांगितले.
याचा अर्थ देशात केवळ गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचे काम मोहन भागवत करत आहेत.आणि  प्रसारमाध्यमे त्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणत आहेत.
प्रसारमाध्यमाना मोहन भागवत यांची वक्तव्य महत्वाची वाटतात मात्र हैद्राबाद विद्यापीठात पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी यांच्यावर केलेला अमानुष लाठीचार्ज ,अनर्गल भाषा व बलात्काराच्या धमक्या विद्यार्थीनींना दिल्या असल्याचे स्वतंत्ररित्या नेमलेल्या चौकशी समितीच्या निदर्शनास आले.त्याची बातमी द्यावीशी वाटत नाही त्याची चर्चा होत नाही,कन्हैयाकुमारच्या भेटीची बातमी  होते  मात्र विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी होत नाही.रोहितच्या मृत्यूचे काय झाले?
दलितांचे खून असेच वातावरण थंड करून दुसरेच मुद्दे काढून थंड केले जाते.रोहित बाबतही असेच काहीसे घडताना दिसत आहे. रोहितचा मुद्दा दडपण्यासाठी कन्हैयाकुमारला सतत लाईमलाईटमध्ये ठेवणे चालू  आहे.
कन्हैयाकुमार १४ एप्रिलला पुण्यात सभा घेणार आहे.हिंदुत्ववादी  संघटना तसेच हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटना यांचा त्यास विरोध आहे.हा नवीन अवतार दलितांसाठी निर्माण केला जातोय कि काय अशी शंका येतेय.
मात्र या व्यवस्थेत असेच अनेक दलित रोहित मारले जाणार त्यांच्या जीवाची इथे किंमत नसणार
२१ व्या शतकात आधुनिक युगात आपण त्याचे साक्षीदार आहोत.हे आपले दुर्दैव.

- पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE 

सोमवार, २८ मार्च, २०१६

गुढीपाडवा आणि बौद्ध समाजाची भूमिका (A)

गुढीपाडवा हा उपद्रवमूल्य नसलेला सण आहे.
ना लाऊडस्पिकर ना ढोलताशे,ज्यांना साजरा करावासा वाटतो ते घरात गोडधोड करतात दारात बांबू रोवून गुढी उभारतात.
मात्र अलिकडे काही ठिकाणी शोभायात्रा काढण्याचे आणि त्यात ढोलताशा वाजविण्याचे प्रकार वाढले आहेत.
स्त्रिया-मुली नऊवारी आणि वर भगवा फेटा बांधून थोर प्रथा संस्कृती की काय ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जपायचा प्रयत्न करताना दिसतात.
नटायला मुरडायला मिरवून घ्यायला मिळणे ही नैसर्गिक आवड आहे.यानिमित्ताने ती हौस भागवली जाते म्हणून तरुणाई यात आघाडीवर आहे.यामागे एवढाच विचार आहे.हे लक्षात घेतलं पाहिजे.
गुढीपाडवा साजरा करण्यामागचे कारण-
या दिवशी संभाजी महाराजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली,
आणि त्यांचं धड वेगळं करून मुंडके भाल्यावर की उंच बांबूवर रोवून मिरवणूक काढल्या गेली.शेवटपर्यंत हा आपला स्वाभिमानी राजा बधला नाही.म्हणून त्यांच्या शरिराचे अक्षरश: तुकडे केले गेले होते.असे सांगितले जाते.संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनांचा इतिहास या पुस्तकात पान क्र.24 वर ही माहिती दिली आहे इतर काही मराठा संघटनाही ही माहिती देत असतात,पाडवा साजरा करू नये यासाठी यामागील हे कारण सांगितलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे संधीसाधू पक्ष संघटना आणि इतर काही लोकांना हे मिथ वाटतं.त्यामुळे मराठा समाजातच यात मतभेद आहेत.ब्राह्मणांनी गुढी उभारली की नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होत नसले आणि कुणी मान्य करत नसले तरी संभाजी राजांची अशी धिंड काढून त्यांचे शिर फिरवले गेले होते हे सत्य आहे.अशी पुष्टी सेतू माधवराव पगडी यांनी देखील केली आहे.त्याच्याशी कुणाला देणेघेणे नाही.नसते.कारण शेवटी सगळे राजकारण हे ब्राह्मणीसंस्कृती केंद्रित.यात विशेष बाब म्हणजे अब्राह्मणी म्हणजे बहुजन जाती सर्वात पुढे आघाडीवर असतात.
यात आणखी एक गोष्ट अशी की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या विखूरलेल्या शरीरअवयवांना गोळा करून ते शिवून त्यावर विधिवत अंत्यसंस्कार हे वढू येथील गोविंद महार नामक पहिलवानाने केले ही बाब सांगायला सर्वांना लाज वाटते कारण एका महाराच्या हातून राजांचा अंत्यविधी झाला हे लाजिरवाणे वाटत असावे म्हणून वढू येथील समाधी जवळ तसा उल्लेख असलेला बोर्डही हिंदुत्ववादी संघटनांनी काढून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आणि भलत्याचेच नाव त्यात लावले गेले.
इतिहास फक्त विशिष्ट समाजाच आपल्या सोयीने लिहितो अशातला भाग नाही सगळेच आपापल्या सोयीचा लिहितात.
दुसरा मुद्दा गुढीपाडवा रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून त्यादिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितलं जातं मात्र रामायण हेच एक मिथ आहे,काल्पनिक काव्य आहे त्यामुळे या संदर्भालाही तसा अर्थ उरत नाही.शिवाय जिथे जिथे रामायण घडलं असं संगितलं जातं त्या भागात गुढी उभारण्याची प्रथाच नाहीये.
तिसरा मुद्दा – इथून हिंदूंचे नविन वर्ष सुरु होते.आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.निसर्ग चक्र पाहता मला हे नविन वर्षे वाटत नाही.
म्हणजे उलट हे वर्ष संपतेय.पानगळ होतेय झाडे झडतायत झरे नदी नाले आटत आहेत उन्हाळा सर्वात भयंकर दमवणारा ऋतू आहे.भारतीय समाजहा ऋतूंच्या कालचक्रावर जास्त अवलंबून आहे.त्यामुळे हा ऋतू नववर्षाच्या आगमनासाठी अनुकूल वाटत नाही.याउलट पाऊस सुरु होतो.
तो सुरुवातीचा दिवसच नवीन वर्षे म्हणून साजरा केला गेला असता तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं.पाऊस सुरु झाला की धरणी नवीन साज चढवते.सगळं साचलेलं धुवून स्वच्छ होऊन जातं.नवीन पालवी फुटते.झाडे बहरू लागतात.पाण्याचं मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.
नवीन वर्षासाठी याचा विचार का केला गेला नाही? कळत नाही.असो.
आता वरिल कारणे सोडा,हे काहीही असले तरी हिंदू लोक हा सण साजरा करतात,यात आंबेडकरी समाजाने विरोधरुपी करणीचामोगा कशाला बनायला पाहिजे? कुणाच्या गुढीखाली किती अंधार हाय हे समद्या गावाला ठावं हाय..बरोबर ना?
परंतु, आम्ही बौद्ध आहोत आम्हाला अमूकढमूक सणाच्या शुभेच्छा देऊ नका असे फेसबुकवर पूर्वी कुणा छपरीने पसरवलं होतं.आज त्याचीच ही पुनरावृत्ती पहावयास मिळते,कुणी ना कुणी याची री ओढताना दिसतो.
उद्या असेच कुणा हिंदूने आम्ही हिंदू आहोत आम्हाला आंबेडकर जयंती बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देऊ नका म्हणून पोस्टीं टाकल्या तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? अंगाला मसाला चोळून सोशलमीडिया डोक्यावर घ्याल ना?
अशा अक्कलशुन्य लोकांमुळे ध्रुवीकरणाला हातभार लागतोय.
आंबेडकरी समाज वेगाने आयसोलेशनकडे ढकलला जातोय.मित्रता वाढायची सोडून आणखी शत्रू निर्माण होत आहेत.आपण हिंदूंचे सण साजरे करत नाही ठीक आहे.आपण 22 प्रतिज्ञा पाळतो मानतो तेही ठीक आहे.ती अपेक्षा पुरातन देवभोळ्या अंधश्रद्ध हिंदू समाजाकडून कशीकाय आणि कशासाठी?
हिंदू समाजाला सुधरवायचा ठेका आंबेडकरी बौद्धांनी घेतलाय काय?
पारशी जैन शीख लिंगायत मुस्लिम ख्रिस्ती हे समाज या देशात आहेत की नाही?
की फक्त कट्टरहिंदू आणि आंबेडकरी बौद्ध समाज आहे? आणि आम्ही बौद्ध झालो म्हणजे आम्हीच सर्वात ग्रेट आम्हीच बुद्धिमान हुशार बाकी सगळे मूर्ख या गंडातून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? बुद्धाने प्रेम करायला शिकवलं मंगलमैत्रीचा संदेश दिलाय.आपण नक्की कुठे चाललोय? यावर कधीतरी विचार करा.
ऐकीकडे देशाची वेगाने हिंदू राष्ट्राकडे घोडदौड सुरु आहे आणि आपण आपल्या शेजारी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी त्रास न होणाऱ्या सणांवर देखील टीका करून विरोध करून त्यांना आणखी कट्टर बनवत चाललो आहोत.आज मराठा समाजातील बहुतांश व्यक्तीना संभाजी राजांची हत्या झाल्याचे मान्य नाही हा सण आणि संभाजी राजांची हत्या या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे अनेकांचे मत आहे.शिवाय यात ब्राह्मण पुरोहित वगैरे यांचा हस्तक्षेप नाही.
हा वैयक्तिक,कौटुंबिक पातळीवर साजरा केला जाणारा सण आहे त्यामुळे तो साजरा केला तर कुणाच्या झोळीत दगड येणार आहे?अशी मानसिकता सण साजरा करणाऱ्या व्यक्तीची असेल तर ती चुकीची ठरत नाही.जे सण आपण साजरेच करत नाही ते इतरांनीही साजरे करू नये हा अट्टाहास सोडला पाहिजे.
आपल्याला वैयक्तिक सांघिक पातळीवर ज्याच्या त्रास होत नाही.त्या सण प्रथा काहीही असो त्याविषयी बोलून विरोध करून ते आणखी रुजवणे बंद केले पाहिजे.याउलट भायाचारा कसा वाढेल हे पाहणे जास्त गरजेचे आहे.येणारा काळ आंबेडकरी बौद्ध आणि समविचारी पुरोगामी नास्तिक लोकांसाठी कठीण असणार आहे.ते लक्षात ठेवून पाउले उचलणे गरजेचे आहे.
विरोध कशाला करायचा कुठे करायचा त्यातून निष्पन्न काय होणार आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या !!

गुरुवार, १० मार्च, २०१६

माध्यमांचा बेजबाबदारपणा ( जेएनयु कन्हैयाकुमार )

जेएनयु विद्यापीठात तथाकथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणात कन्हैया कुमारला सहा महिन्याचा  अंतरिम जामीन मंजूर होऊन तो विद्यापीठात परतला आहे.त्याच्यावर देशद्रोही म्हणून लावण्यात आलेला तथाकथित आरोप हा न्यायालयात सिद्ध करणे अशक्य आहे.हे अनेकदा कायद्याच्या जाणकारांनी स्पष्ट केले होते.तरीही सरकारने हटवादीपणा करत स्वत:चे अवलक्षण करून घेतले.मुळात ज्या देशविरोधी घोषणा दिल्या असं म्हणले जातेय त्यांना पकडण्याऐवजी जो हजरच नव्हता त्याच्यावर खटला गुदरून सरकारने हसे करून घेतले आहे. अलिकडे देशात अन पार्लमेंटमध्ये मजेशीर वातावरण आहे.विरोधी पक्ष नावाला उरला आहे.सूर हरवून बसला आहे.सरकारवर अंकुश ठेवणे हे त्याचे काम.ते काम आज सरकारच्या धोरणांनी त्रस्त जनता करते आहे.याचा अर्थ असा कि देशात विरोधी पक्ष म्हणून जनताच काम करते आहे. हे ऐतिहासिकच म्हणले पाहिजे.आणि यासाठी जागरूक जनतेचे कौतुक देखील केले पाहिजे.

विद्यापीठात परतल्यानंतर कन्हैया कुमारने कॅम्पसमध्ये जे भाषण केले ते जेएनयु कॅम्पसच्या इतिहासात ऐतिहासिक ठरले आहे.भाषणात कन्हैया कुमारने देशाच्या एकूणच भवितव्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र मोदी आरएसएस एबिविपी आणि भाजपा यांना लक्ष केले होते.खटला न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यावर त्याने भाष्य करणे टाळले मात्र देशविरोधी घोषणाबाजी बाबत वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण दिले. क्न्हैयाच्या या भाषणाने असहिष्णुतेच्या मुद्यावर पुरस्कार वापसी करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यानाही प्रभावित केले. देशातील पक्षविरहीत अन कोणतीही आयडॉलॉजिकल विरहीत असे अनेक तरूण अशा भाषणाने आकर्षित होणे स्वाभाविक आहे.कन्हैयाला देशातील मिडीयाने ज्याप्रमाणे प्रेझेंट केले आहे त्याप्रमाणे तो जबाबदारी पार पाडेल असे म्हणने आताच घाईचे ठरेल.तसे मानण्याचे काही कारणही नाही.कन्हैया नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करत माध्यमांनी एकप्रकारेमात्र कन्हैया ज्या प्रकारे मुलभूत प्रश्न उपस्थित करतो आणि त्यावर उपाय आणि मॅकॅनिझम सांगतो त्यावर इथल्या प्रत्येक तरुणाने राज्यकर्त्याने देशप्रेमी नागरिकाने विचार करणे गरजेचे आहे.तुम्ही कन्हैयावर आरोप असलेल्या काही गोष्टींवर जरूर आक्षेप घेऊ शकता विरोधी करू शकता परंतु त्याने जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत ते तुम्हाला टाळून पुढे जाता येणार नाही.कन्हैयाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते काही १६ मे नंतर उद्भवलेले नाहीत म्हणजे सरकार सत्तेवर आले म्हणून ते निर्माण झालेले नाहीत.ते इथे पूर्वपार होते व हेतूता भिजत दुर्लक्षित करून ठेवण्यात आलेले आहेत.शिक्षण घेण्याची आजादी,आतंकवाद,नक्षलवाद,मनुवाद,भूकबळी ,गरिबी,दारिद्र्य,असमानता,जातीयवाद धार्मिक द्वेष,रोजगार,हे ते प्रश्न आहेत आणि यापासून स्वातंत्र्यमिळाले पाहिजे सुटका झाली पाहिजें असे तो मांडतो हे भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकांचे मत आहे.याच्याशी कुणाची मतभिन्नता असू शकते काय?

गंमत आहे अशी कि हे प्रश्न उपस्थित करूनही माध्यमे सत्ताधारी नेते यांना या प्रश्नांवर चर्चा करावीशी वाटत नाही.सत्ताधारी बेफिकीरीने म्हणतात कन्हैया फुकटची प्रसिद्धी मिळवतो आहे.विरोधी पक्ष पाठ थोपटतो आहे.ज्यांची भावना आहे कि एका देशद्रोह्याला सोडले ते दुषणे देत आहेत.म्हणजे याअगोदर आपण कन्हैया आणि जेएनयु हे अफजल गुरुच्या कथित फाशीच्या मुद्यासाठी न्यायालयाचा अवमान करतात असे समजत होतो  आणि आता त्याच न्याय व्यवस्थेने कन्हैयाला जामीन दिलेला असताना आणि गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्याला आपणच निर्णय देवून देशद्रोही मानून मोकळे होतो हा विरोधाभास नाही काय? त्याच्यावर कुणी जीभ कापायला 5 लाख देत आहे. कुणी गोळी मारायला ११ लाख जाहीर करतो आहे.जणू काही स्पर्धा सुरु आहे.अशी पोस्टर्स राज्यात लावली जात आहेत.कन्हैयावर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला.पुन्हा कॅम्पसमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय.या गोष्टी पूर्वी तालिबान सिरीयामध्ये कट्टरपंथी आयसीसवाले करत,आता हे आपल्याकडे सुरु झालेय.अशा गोष्टी १६ मे च्या अगोदर घडल्या नव्हत्या हेही तितकेच खरे.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला यावर विचार करावासा वाटत नाही का? हे उद्या आपल्याच प्रियजणांच्या विरोधात घडणार नाही याची खात्री कुणी देवू शकेल काय?
देशद्रोह म्हणजे काय असतं? एखादी वृत्तवाहिनी एडीट केलेले व्हिडिओ आपल्याला दाखविणार आपण त्याची शाहनिशा न करताच जे दाखवले आहे त्यावर विश्वास ठेवणार,मत बनवणार आणि कायदा हातात घेणार?त्या व्यक्तीवरील आरोप न्यायालयात सिद्ध करण्याची वाट आपण पाहणार आहोत कि नाही?
निवृत्त जवानांच्या वन रेंक पेन्शनच्या मुद्यावर जवानांवर लाठीमार करत जखमी करणाऱ्या सरकारला आपण देशभक्त सरकार म्हणन्याचे धाडस करू  शकतो काय? तेच सरकार आध्यात्मिक व्यावसायिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी देशाच्या सीमेवरील जवानांना राबवून घेते हे कोणत्या देशभक्तीत बसते?
अभिनेते अनुपम खेर पहिल्यांदाच आदित्य योगिनाथ आणि साध्वीच्या विरोधात बोलले ,त्या दोघानी सुद्धा अनुपम खेरना चोख प्रत्युत्तर दिले आहे यावरून त्यांचा आतातरी सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून विश्वास उडाला असण्याची खात्री करायला हरकत नसावी.

वैचारिक प्रतिवाद आणि मुद्दे संपले कि माणूस वैयक्तिक चारित्र्यहनन करण्यात पुढाकार घेतो.सोशलमिडिया आणि प्रसारमाध्यामात कन्हैयाच्या विरोधात सध्या तेच चालू झाले आहे.जे अगोदर रोहितच्या मुद्यावर झाले होते.लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचे वेगाने अधपतन होते आहे.आजकाल तर प्रसारमाध्यमांतील तथाकथित उच्चभ्रू पत्रकार आपला पेशा विसरून बेधडक वक्तव्य करतात.कन्हैयाचा गरीबीची थट्टा करतात.यात मराठी वृत्तवाहिनीतील एबीपी माझावरील दोन महिला पत्रकार आघाडीवर होत्या.कन्हैयाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना इतरांनी केलेले आरोप हे सनसनाटी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली जाते.आपल्या व्यावसायिक टीआरपीच्या नादात आपण एका विद्यार्थ्याचे आयुष्य बरबाद करू शकतो याची किमान जाणीव कुणी ठेवताना दिसत नाही. कोणताही आरोप सिद्ध न झालेला व्यक्ती आज लोकांच्या नजरेत गुन्हेगार आहे देशद्रोही आहे.लोकांना तो जिवंत असलेला पहावत नाही.त्याला मारले पाहिजे एवढ्या टोकाची मानसिकता लोकांच्या मनात निर्माण केली गेलीय.रोहितच्या आत्महत्येचे काय झाले?
तपासकार्य कुठवर आले ? हे सरकारने सांगितले पाहिजे.देशात रोज नविन काहीतरी घडवून आणले जाते.आणि  हे प्रश्न मागे पाडतात.विरोधीपक्षाने जाब विचारला पाहिजे. महिषासुर आणि दुर्गा हे मिथक आजच्या घडीला चर्चेला घेणे महत्वाचे नाही.भाजपा शिवसेना आणि त्यांच्या परिघावरील हिंदुत्ववादी संघटना जसे राममंदिर आणि पुराणातील दाखले उकरून त्यावर चर्चा घडवून आणतात आणि इथल्या जनमानसात पुन्हा ते रुजवू पाहतात तसाच हा प्रकार आहे.२१ व्या शतकात बहुजनांचे आणि अभिजनांचे देव मिथकशास्त्र इत्यादीचे वर्गीकरण करत संशोधन करून वाटून घेण्यात हशील नाही.याने समाजाची उन्नती होणार नाही.मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.हे जेएनयु मधील विद्यार्थ्यांनी आणि इथल्या इतर चळवळ्या लोकांनीसुद्धा लक्षात घ्यावे.सामाजिक स्वास्थ्य राखणे हि सर्वांची जबाबदारी आहे.

शुक्रवार, ४ मार्च, २०१६

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्लक्षित पैलू

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मुल्यसूत्रांवर आधारित एक व्यक्ती एक मूल्य वोट असणाऱ्या लोकशाहीचा दस्तावेज म्हणजे आपली राज्यघटना लिहून देशावर अनंत उपकार केले आहेत.म्हणूनच त्यांना भारतरत्न या उपाधीने देशाने गौरवान्वित केले आहे.
ते केवळ भारतीय घटनेचे शिल्पकारच नसून आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक आहेत.
यंदाचे वर्षे हे  त्यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्षे म्हणून देशवासीय साजरे करत आहे. कमानी ट्युब्जच्या  कल्पना सरोज यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्रसंघातही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी होणारअसून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमासाठी १६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.त्यानिमित्ताने या लेखमालेतील हे पहिले पुष्प.बाबासाहेब केवळ अस्पृश्योद्धारक शोषित वंचित समाजाचे मार्गदाते कायदेपंडीत घटनाकार नव्हते तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक विषयांवर अभ्यास केला आणि असाध्य ते साध्य करत त्यावर प्रभुत्व मिळविले.त्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते.मानवी कल्याणाच्या उपयोगाकरिता असलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून त्यांनी त्याची पराकाष्ठा केली.त्यांच्या अशाच वाचनात न आलेल्या काही महत्वाच्या आणि वेगळ्या पैलूंवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
कलाप्रेमी बाबासाहेब-
एकीकडे देशासाठी समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजत असताना बाबासाहेब वैयक्तिक छंद सुद्धा जपत असत वाचन मनन आणि कलेची आवड यातून बाबासाहेबांनी वयाच्या ६० व्या वर्षी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. रेगे आणि त्यांचे मोठे बंधू दोघेही बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवायचे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शिकवणे कसे जमणार म्हणून अनिच्छेने आम्ही शिकवण्यास गेलो पण बाबासाहेबांच्या मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावामुळे आमचे दडपण दूर झाले असे साठे अभिमानाने सांगतात. साठे बाबासाहेबांना त्यांच्या वेळेनुसार राजगृह वर व्हायोलीन शिकवत असेबाबासाहेबांनी २ वर्ष हे तंतू वाद्य शिकून घेतले आणी आपल्या फावल्या वेळेत ते हे वाजवायचे. खूप दुखः भोगलेली माणसे व्हायोलीन उत्तम वाजवतात असे मी कुठेतरी वाचलेले आठवतंय. व्हायोलीनमधून निघणारा स्वर एक वेगळ्या प्रकारचे तरंग मनात निर्माण करतो. १९५१ ते १९५३ या कालावधीत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्याचा सन्मान मिळाला पहिल्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले कि व्हायोलीन हे तंतू वाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे,
बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, "व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट" हे पुस्तक स्वतःसाठे यांनी बाबासाहेबांना दिले होते संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हतेव्हायलीनचा बो खूप वेळ ते धरू शकत न्हवतेत्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत,थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजूउ लागले असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बाबासाहेब काही काळाने दिल्लीत स्थलांतरित झाले तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी मुखर्जी नावाच्या व्हायोलीन शिक्षकाला रुजू केले होते अशी माहिती आहे.
बाबासाहेबांच्या घरात कामात मदत व्हावी म्हणून एक १२ वर्षाची मुलगी येत असे तिचे नाव वनस्पती दुर्गतती बाबासाहेबांची आठवण सांगताना म्हणते कि, "बाबासाहेब व्हायोलीन चा सराव करायला लागले कि मी रमाई च्या खोलीत त्या सुरावर नाचत असेरमाईला फार गम्मत वाटे त्यांनी कधीच माझी तक्रार करत नसे उलट प्रेमाने मला जवळ घेत,बाबासाहेबांशी जास्त बोलणे होत नसे पण कशी आहेसजेवलीस का ? अशी विचारपूस करायचे,बाहेर निघताना माझ्या गालावर डोक्यावर प्रेमाने थोपटत आणि सांगत आई ला त्रास देऊ नकोस
बाबासाहेबांनी एकदा कुठल्या गोष्टीचा ध्यास घेतला कि ते पूर्ण केल्याशिवाय सोडीत नसे. बाबासाहेब जितके कठोरशिस्तप्रिय होते तितकेच ते रसिक आणि मृदू स्वभावाचे होते हे यातून दिसून येते.बाबासाहेबांचा हात व्हायोलीन वाजवताना दुखू लागला काही काळाने त्यांनी व्हायोलीन वाजवायचे थांबवले परंतु त्यांना आता चित्रकलेत आवड निर्माण झाली. बाबासाहेबांनी चित्र काढण्यासशिकण्यास सुरवात केली. बाबासाहेब फार सुंदर चित्र काढत आणि घरातील नोकरांची पहिली दाद मिळत, "साहेबचित्रात जणू जाणच ओतलीत" असे ते म्हणत बाबासाहेबांना आनंद होत असे ते गालातल्या गालात हसतबाबासाहेबांनी रेखाटलेले डोळे उघडे असलेली गौतम बुद्धांचे चित्र अजूनही औरंगाबादला ठेवली आहे.
सुंदर चित्र आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना बाबासाहेबांना आकर्षित करत असेशिल्प कलासुंदर इमारतीचे बांधकाम याबद्दल बाबासाहेब आपल्या गप्पांमध्ये चर्चा करत असे. एखाद्या कलेचे कौतुक सुद्धा भारतात जातीय दृष्टीकोनातून पहिले जाते,आणि अशा प्रवृत्तीमुळे कला दाबली जाते आहेसंपुष्टात येत आहे अशी ते तक्रार करतमाणसाने अशा जातीत जन्म घ्यावा जिथे कुठल्या न कुठल्या कलेचा वारसा आहे.
बाबासाहेबांचे घर म्हणजे काही वाडा वगैरे न्हवता पण एखाद्या राजा प्रमाणे थाट मात्र होताबाबासाहेबांच्या राजगृहात भले मोठे ग्रंथालयकित्येक उंची बुटांचे जोडनिरनिराळेविविध प्रकारचे फाउंटन पेन बाळगणे बाबासाहेबांची विशेष आवड , तसेच उंची कोट आणि टोपी ते बाळगतदुर्मिळ चित्रांचे संकलन त्यांच्या विजयी व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील अडथळ्यांची उडवलेली दाणादाण याचे पुरावे होते. असे वाटायचे कि उंची राहण्यातदर्शवण्यात त्यांचा एक सुप्त आनंद होता. बाबासाहेबांनी सिगारेट दारू पासून कायम दूर राहिले इतर सर्व प्रकारच्या लोकांच्या सानिद्ध्यात राहून सुद्धा त्यांनी स्वतःला निर्व्यसनी ठेवले होते.
बाबासाहेबांचे पुस्तकप्रेम त्यांना समाजातील इतर करमणुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवत होते. नाही म्हणायला त्यांनी काही सिनेमे पाहिले होते. रमाई सोबत त्यांनी "Uncle Tom" हा सिनेमा पहिला होता. " अछुत कन्या" हा हिंदी सिनेमा पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या दुसर्या पत्नी डॉ.शारदा कबीर यांच्या सोबत त्यांनी "Oliver Twist " हा सिनेमा पहिला होता.
बाबासाहेबांना क्रिकेट खेळ खूप आवडायचाते तरुण वयात खुपदा खेळायचेपहिल्या पत्नी सोबत त्यांच्या माहेरी धारवाडला आल्यानंतर ते तेथील वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थांसाठी क्रिकेटचे सामने भरवत असत आणि स्वतः सुद्धा भाग घेत असत. विशीत असताना बाबासाहेब पत्ते (cards, raund the bridge ) सारखे खेळ खेळतमित्रांसोबत व्यायाम म्हणून किंवा बदल म्हणून बाबासाहेब समुद्रात पोहण्यास सुद्धा जात असत
प्राणीप्रेमी बाबासाहेब-
बाबासाहेबांच्या हस्ताक्षाराला एक वेगळी शैली आणि अंदाज होताफार सुंदर पद्धतीने ने पेन चालवायचेखूप लोक त्यांच्या अक्षराची प्रशंसा करायचेबाबासाहेबांना कुत्रांची फार आवड होतीएखाद्या वेगळ्या वंशाचा कुत्रा त्यांना हवा असल्यास ते देशाच्या कानाकोपरयात चौकशी करत. त्यांनी पळालेल्या "टोबी" कुत्रा आणि एक हरणाचे पाडस वर त्यांचे विशेष प्रेम होतेखूप लळा लागला होता त्यांना त्यांचादामोदर हॉल वर वस्तीला असताना बागेत ते तासंतास या दोघांसोबत खेळत असतत्यांना भरवत असत.एकदा त्यांचा लाडका कुत्रा टोबी जेवण करत न्हवताबाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला पण तो जेवला नाहीबाबासाहेब त्याला विचारायचे "अरे कशासाठी हा सत्याग्रह आणि उपोषण ?" बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचे ते सुद्धा त्या दिवशी जेवत नसत.
माणुसकी जपणारे बाबासाहेब-
एकदा प्रवासात आपल्या सोबत असलेल्या सहकारी कार्यकर्त्याकडे पांघरून न्हवते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्याकडील असलेले चादर त्याला दिली आणि झोपायला सांगितलेसकाळी जेव्हा जाग आली तेव्हा बाबासाहेबांच्या अंगावर काहीच न्हवते फक्त वळकटी अंथरून ते झोपले होतेत्याने विचारले असे का केले तेव्हा बाबासाहेब म्हणाले "माझ्याकडे एकाच होती ती मी तुला दिली" तो अनुयायी काहीच बोलला नाही पण डोळ्यात अश्रू मात्र चमकले. एकदा कुणीतरी जवळचा सहकारी साहेबाना भेटायला आलात्यावेळी नेमके घरात कुणी न्हवतेबाबासाहेब स्वतः स्वयंपाक घरात गेले आणि चहा बनवायला घेतलं पण त्यांना दुधाचे भांडे काही सापडेनात्यांनी मित्राला विचारले "काळा चहा घेतोस न रे बाबा ?" मित्र म्हणाला "बहुतेक वेळा मी बिन दुधाचा चहा घेतो" बाबासाहेब मिशिकीलपणे म्हणाले,"पण आपल्या आयुष्यात दुधाचा साठा एकदा तरी मिळालाच पाहिजे" असे बोलून बाबासाहेबांनी पावाचे दोन तुकडे केले (double roti), मित्र एवढा पाव नको म्हणताच बाबासाहेब हसून म्हणाले "अरे समान हक्कांसाठी तर आपली लढाई आहे" आणि दोघ गप्पांमध्ये रंगून गेले
एकदा संध्याकाळी बाबासाहेब घरी परतत असताना त्यांना थंडीने कुडकुडत बसलेला एक वृद्ध गृहस्त दिसलाबाबासाहेबांना त्याची दया आलीबाबासाहेब त्याच्याजवळ गेले आपला उंची कोट काढून त्याच्या अंगावर टाकलात्याला मिठी मारली आणि म्हणाले "तुमच्यासारखे या समाजात कित्येक लोक आहेतआपल्याला जमेल तेवढे प्रत्येकाने करायला पाहिजे" असे बोलून बाबासाहेब निघून गेले.बाबासाहेबांची करुणा आणि दुसऱ्याचे दुखः आपले मानण्याचा स्वभाव त्यांना बोधीसत्व पदापर्यंत घेऊन जातात.
बाबासाहेब संसारात लक्ष देत नाहीत कधी विचारपूस करत नाहीतफक्त कामकाम आणि समाज एवढच करत असतात म्हणून रमाई आंबेडकर या काहीशा नाराज असत आणि त्यावरून उभयतांत थोडी फार भांडणे होत असत. एकदा असेच रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या "कधी तरी घरात लक्ष द्याकाय आहे काय नाहीभाजी पाला,धान्य आहे कि नाही हे पहाव" ते ऐकून बाबासाहेब तडक बाहेर गेले आणि ६ - ७ भाजीच्या जुड्या आणि १०० - १२५ बोंबीलच्या काड्या घेऊन आलेते पाहून त्यांच्या आत्या हसत म्हणाल्या, "भीमा अरे एवढी भाजी आणलीसखराब होईल तीएक दिवसात संपणार आहे का ?
बाबासाहेबांना मधुमेहा ने हैराण केले होतेत्यांचे शरीर त्यांना तसे संकेत देत असावेत म्हणून मरणापूर्वी बाबासाहेब आपल्या अत्यंत निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांना एका पत्रात म्हणतात, "भाऊराव मी आत जास्त काळ नाही जगणारतुम्ही मनाची तयारी करून ठेवा". या एका वाक्याने भाऊरावांची काय अवस्था झाली असेल हे भाऊरावच जाणतातशोषित पीडितांचे उत्कर्षासाठीच त्यांना दीर्घ आयुष्य लाभले असावे असे बाबासाहेब गमतीने म्हणत असत आणि हाच विश्वास बाबासाहेबांना त्यांच्या शारीरिक विकार आणि त्रासावर मात करण्यास बळ देत असावेत. मृत्यूच्या आधी काही दिवस एका निवांत संध्याकाळी साहेबांचा सेवक नानाकचंद रत्तू बाबासाहेबांच्या सोबत होताबाबासाहेबांनी नानाकचंद रत्तू ला डोक्यात तेल घालून मसाज करण्यास सांगितलेबाबासाहेबाना थोड बरं वाटलंबाबासाहेब काहीतरी गुणगुणत होतेहळू हळू रत्तू ला आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला "बुद्धं सरणं गच्छामि"  " बुद्धं सरणं गच्छामि
बाबासाहेबांनी नानाकचंद रत्तुला त्यांचे आवडते बुद्ध गीत रेकोर्ड वर लावण्यास सांगितले.
असे आपले बाबासाहेबनारळासारखेवरून कठोरशिस्तप्रिय गंभीर वाटणारे आणि आतून गोड पाण्यासारखे आणि मृदूरसिकनिर्मळ आणि मिश्किल स्वभावाचेकामाच्या ओझ्याने आणि समाजाच्या चिंतेने स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणारेलाडकी पत्नी आणि मुले यांना सामाजिक कार्यबाहुल्यामुळे  पुरेसा वेळ न देऊ शकणारेहळवेदयाळूमनमिळाऊ आणि जिंदादिल... आपले बाबासाहेब !!

- पूर्वप्रकाशित दैनिक पुण्यनगरी जयंती विशेषांक २०१६ 

Translate