जेएनयु विद्यापीठात तथाकथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणात कन्हैया कुमारला सहा महिन्याचा अंतरिम जामीन मंजूर होऊन तो विद्यापीठात परतला आहे.त्याच्यावर देशद्रोही म्हणून लावण्यात आलेला तथाकथित आरोप हा न्यायालयात सिद्ध करणे अशक्य आहे.हे अनेकदा कायद्याच्या जाणकारांनी स्पष्ट केले होते.तरीही सरकारने हटवादीपणा करत स्वत:चे अवलक्षण करून घेतले.मुळात ज्या देशविरोधी घोषणा दिल्या असं म्हणले जातेय त्यांना पकडण्याऐवजी जो हजरच नव्हता त्याच्यावर खटला गुदरून सरकारने हसे करून घेतले आहे. अलिकडे देशात अन पार्लमेंटमध्ये मजेशीर वातावरण आहे.विरोधी पक्ष नावाला उरला आहे.सूर हरवून बसला आहे.सरकारवर अंकुश ठेवणे हे त्याचे काम.ते काम आज सरकारच्या धोरणांनी त्रस्त जनता करते आहे.याचा अर्थ असा कि देशात विरोधी पक्ष म्हणून जनताच काम करते आहे. हे ऐतिहासिकच म्हणले पाहिजे.आणि यासाठी जागरूक जनतेचे कौतुक देखील केले पाहिजे.
विद्यापीठात परतल्यानंतर कन्हैया कुमारने कॅम्पसमध्ये जे भाषण केले ते जेएनयु कॅम्पसच्या इतिहासात ऐतिहासिक ठरले आहे.भाषणात कन्हैया कुमारने देशाच्या एकूणच भवितव्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र मोदी आरएसएस एबिविपी आणि भाजपा यांना लक्ष केले होते.खटला न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यावर त्याने भाष्य करणे टाळले मात्र देशविरोधी घोषणाबाजी बाबत वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण दिले. क्न्हैयाच्या या भाषणाने असहिष्णुतेच्या मुद्यावर पुरस्कार वापसी करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यानाही प्रभावित केले. देशातील पक्षविरहीत अन कोणतीही आयडॉलॉजिकल विरहीत असे अनेक तरूण अशा भाषणाने आकर्षित होणे स्वाभाविक आहे.कन्हैयाला देशातील मिडीयाने ज्याप्रमाणे प्रेझेंट केले आहे त्याप्रमाणे तो जबाबदारी पार पाडेल असे म्हणने आताच घाईचे ठरेल.तसे मानण्याचे काही कारणही नाही.कन्हैया नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करत माध्यमांनी एकप्रकारेमात्र कन्हैया ज्या प्रकारे मुलभूत प्रश्न उपस्थित करतो आणि त्यावर उपाय आणि मॅकॅनिझम सांगतो त्यावर इथल्या प्रत्येक तरुणाने राज्यकर्त्याने देशप्रेमी नागरिकाने विचार करणे गरजेचे आहे.तुम्ही कन्हैयावर आरोप असलेल्या काही गोष्टींवर जरूर आक्षेप घेऊ शकता विरोधी करू शकता परंतु त्याने जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत ते तुम्हाला टाळून पुढे जाता येणार नाही.कन्हैयाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते काही १६ मे नंतर उद्भवलेले नाहीत म्हणजे सरकार सत्तेवर आले म्हणून ते निर्माण झालेले नाहीत.ते इथे पूर्वपार होते व हेतूता भिजत दुर्लक्षित करून ठेवण्यात आलेले आहेत.शिक्षण घेण्याची आजादी,आतंकवाद,नक्षलवाद,मनुवाद, भूकबळी ,गरिबी,दारिद्र्य,असमानता,जाती यवाद धार्मिक द्वेष,रोजगार,हे ते प्रश्न आहेत आणि यापासून स्वातंत्र्यमिळाले पाहिजे सुटका झाली पाहिजें असे तो मांडतो हे भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकांचे मत आहे.याच्याशी कुणाची मतभिन्नता असू शकते काय?
गंमत आहे अशी कि हे प्रश्न उपस्थित करूनही माध्यमे सत्ताधारी नेते यांना या प्रश्नांवर चर्चा करावीशी वाटत नाही.सत्ताधारी बेफिकीरीने म्हणतात कन्हैया फुकटची प्रसिद्धी मिळवतो आहे.विरोधी पक्ष पाठ थोपटतो आहे.ज्यांची भावना आहे कि एका देशद्रोह्याला सोडले ते दुषणे देत आहेत.म्हणजे याअगोदर आपण कन्हैया आणि जेएनयु हे अफजल गुरुच्या कथित फाशीच्या मुद्यासाठी न्यायालयाचा अवमान करतात असे समजत होतो आणि आता त्याच न्याय व्यवस्थेने कन्हैयाला जामीन दिलेला असताना आणि गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्याला आपणच निर्णय देवून देशद्रोही मानून मोकळे होतो हा विरोधाभास नाही काय? त्याच्यावर कुणी जीभ कापायला 5 लाख देत आहे. कुणी गोळी मारायला ११ लाख जाहीर करतो आहे.जणू काही स्पर्धा सुरु आहे.अशी पोस्टर्स राज्यात लावली जात आहेत.कन्हैयावर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला.पुन्हा कॅम्पसमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय.या गोष्टी पूर्वी तालिबान सिरीयामध्ये कट्टरपंथी आयसीसवाले करत,आता हे आपल्याकडे सुरु झालेय.अशा गोष्टी १६ मे च्या अगोदर घडल्या नव्हत्या हेही तितकेच खरे.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला यावर विचार करावासा वाटत नाही का? हे उद्या आपल्याच प्रियजणांच्या विरोधात घडणार नाही याची खात्री कुणी देवू शकेल काय?
देशद्रोह म्हणजे काय असतं? एखादी वृत्तवाहिनी एडीट केलेले व्हिडिओ आपल्याला दाखविणार आपण त्याची शाहनिशा न करताच जे दाखवले आहे त्यावर विश्वास ठेवणार,मत बनवणार आणि कायदा हातात घेणार?त्या व्यक्तीवरील आरोप न्यायालयात सिद्ध करण्याची वाट आपण पाहणार आहोत कि नाही?
निवृत्त जवानांच्या वन रेंक पेन्शनच्या मुद्यावर जवानांवर लाठीमार करत जखमी करणाऱ्या सरकारला आपण देशभक्त सरकार म्हणन्याचे धाडस करू शकतो काय? तेच सरकार आध्यात्मिक व्यावसायिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी देशाच्या सीमेवरील जवानांना राबवून घेते हे कोणत्या देशभक्तीत बसते?
अभिनेते अनुपम खेर पहिल्यांदाच आदित्य योगिनाथ आणि साध्वीच्या विरोधात बोलले ,त्या दोघानी सुद्धा अनुपम खेरना चोख प्रत्युत्तर दिले आहे यावरून त्यांचा आतातरी सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून विश्वास उडाला असण्याची खात्री करायला हरकत नसावी.
वैचारिक प्रतिवाद आणि मुद्दे संपले कि माणूस वैयक्तिक चारित्र्यहनन करण्यात पुढाकार घेतो.सोशलमिडिया आणि प्रसारमाध्यामात कन्हैयाच्या विरोधात सध्या तेच चालू झाले आहे.जे अगोदर रोहितच्या मुद्यावर झाले होते.लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचे वेगाने अधपतन होते आहे.आजकाल तर प्रसारमाध्यमांतील तथाकथित उच्चभ्रू पत्रकार आपला पेशा विसरून बेधडक वक्तव्य करतात.कन्हैयाचा गरीबीची थट्टा करतात.यात मराठी वृत्तवाहिनीतील एबीपी माझावरील दोन महिला पत्रकार आघाडीवर होत्या.कन्हैयाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना इतरांनी केलेले आरोप हे सनसनाटी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली जाते.आपल्या व्यावसायिक टीआरपीच्या नादात आपण एका विद्यार्थ्याचे आयुष्य बरबाद करू शकतो याची किमान जाणीव कुणी ठेवताना दिसत नाही. कोणताही आरोप सिद्ध न झालेला व्यक्ती आज लोकांच्या नजरेत गुन्हेगार आहे देशद्रोही आहे.लोकांना तो जिवंत असलेला पहावत नाही.त्याला मारले पाहिजे एवढ्या टोकाची मानसिकता लोकांच्या मनात निर्माण केली गेलीय.रोहितच्या आत्महत्येचे काय झाले?
तपासकार्य कुठवर आले ? हे सरकारने सांगितले पाहिजे.देशात रोज नविन काहीतरी घडवून आणले जाते.आणि हे प्रश्न मागे पाडतात.विरोधीपक्षाने जाब विचारला पाहिजे. महिषासुर आणि दुर्गा हे मिथक आजच्या घडीला चर्चेला घेणे महत्वाचे नाही.भाजपा शिवसेना आणि त्यांच्या परिघावरील हिंदुत्ववादी संघटना जसे राममंदिर आणि पुराणातील दाखले उकरून त्यावर चर्चा घडवून आणतात आणि इथल्या जनमानसात पुन्हा ते रुजवू पाहतात तसाच हा प्रकार आहे.२१ व्या शतकात बहुजनांचे आणि अभिजनांचे देव मिथकशास्त्र इत्यादीचे वर्गीकरण करत संशोधन करून वाटून घेण्यात हशील नाही.याने समाजाची उन्नती होणार नाही.मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.हे जेएनयु मधील विद्यार्थ्यांनी आणि इथल्या इतर चळवळ्या लोकांनीसुद्धा लक्षात घ्यावे.सामाजिक स्वास्थ्य राखणे हि सर्वांची जबाबदारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा