परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मुल्यसूत्रांवर आधारित एक व्यक्ती एक मूल्य वोट असणाऱ्या लोकशाहीचा दस्तावेज म्हणजे आपली राज्यघटना लिहून देशावर अनंत उपकार केले आहेत.म्हणूनच त्यांना भारतरत्न या उपाधीने देशाने गौरवान्वित केले आहे.
ते केवळ भारतीय घटनेचे शिल्पकारच नसून आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक आहेत.
यंदाचे वर्षे हे त्यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्षे म्हणून देशवासीय साजरे करत आहे. कमानी ट्युब्जच्या कल्पना सरोज यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्रसंघातही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी होणारअसून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमासाठी १६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.त्यानिमित्ताने या लेखमालेतील हे पहिले पुष्प.बाबासाहेब केवळ अस्पृश्योद्धारक शोषित वंचित समाजाचे मार्गदाते कायदेपंडीत घटनाकार नव्हते तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक विषयांवर अभ्यास केला आणि असाध्य ते साध्य करत त्यावर प्रभुत्व मिळविले.त्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते.मानवी कल्याणाच्या उपयोगाकरिता असलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून त्यांनी त्याची पराकाष्ठा केली.त्यांच्या अशाच वाचनात न आलेल्या काही महत्वाच्या आणि वेगळ्या पैलूंवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
कलाप्रेमी बाबासाहेब-
एकीकडे देशासाठी समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजत असताना बाबासाहेब वैयक्तिक छंद सुद्धा जपत असत वाचन मनन आणि कलेची आवड यातून बाबासाहेबांनी वयाच्या ६० व्या वर्षी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. रेगे आणि त्यांचे मोठे बंधू दोघेही बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवायचे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शिकवणे कसे जमणार म्हणून अनिच्छेने आम्ही शिकवण्यास गेलो पण बाबासाहेबांच्या मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावामुळे आमचे दडपण दूर झाले असे साठे अभिमानाने सांगतात. साठे बाबासाहेबांना त्यांच्या वेळेनुसार राजगृह वर व्हायोलीन शिकवत असे, बाबासाहेबांनी २ वर्ष हे तंतू वाद्य शिकून घेतले आणी आपल्या फावल्या वेळेत ते हे वाजवायचे. खूप दुखः भोगलेली माणसे व्हायोलीन उत्तम वाजवतात असे मी कुठेतरी वाचलेले आठवतंय. व्हायोलीनमधून निघणारा स्वर एक वेगळ्या प्रकारचे तरंग मनात निर्माण करतो. १९५१ ते १९५३ या कालावधीत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्याचा सन्मान मिळाला पहिल्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले कि व्हायोलीन हे तंतू वाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे,
बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, "व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट" हे पुस्तक स्वतःसाठे यांनी बाबासाहेबांना दिले होते संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हते, व्हायलीनचा बो खूप वेळ ते धरू शकत न्हवते, त्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत,थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजूउ लागले असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बाबासाहेब काही काळाने दिल्लीत स्थलांतरित झाले तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी मुखर्जी नावाच्या व्हायोलीन शिक्षकाला रुजू केले होते अशी माहिती आहे.
बाबासाहेबांच्या घरात कामात मदत व्हावी म्हणून एक १२ वर्षाची मुलगी येत असे तिचे नाव वनस्पती दुर्गत, ती बाबासाहेबांची आठवण सांगताना म्हणते कि, "बाबासाहेब व्हायोलीन चा सराव करायला लागले कि मी रमाई च्या खोलीत त्या सुरावर नाचत असे, रमाईला फार गम्मत वाटे त्यांनी कधीच माझी तक्रार करत नसे उलट प्रेमाने मला जवळ घेत,बाबासाहेबांशी जास्त बोलणे होत नसे पण कशी आहेस, जेवलीस का ? अशी विचारपूस करायचे,बाहेर निघताना माझ्या गालावर डोक्यावर प्रेमाने थोपटत आणि सांगत आई ला त्रास देऊ नकोस
बाबासाहेबांनी एकदा कुठल्या गोष्टीचा ध्यास घेतला कि ते पूर्ण केल्याशिवाय सोडीत नसे. बाबासाहेब जितके कठोर, शिस्तप्रिय होते तितकेच ते रसिक आणि मृदू स्वभावाचे होते हे यातून दिसून येते.बाबासाहेबांचा हात व्हायोलीन वाजवताना दुखू लागला काही काळाने त्यांनी व्हायोलीन वाजवायचे थांबवले परंतु त्यांना आता चित्रकलेत आवड निर्माण झाली. बाबासाहेबांनी चित्र काढण्यास, शिकण्यास सुरवात केली. बाबासाहेब फार सुंदर चित्र काढत आणि घरातील नोकरांची पहिली दाद मिळत, "साहेब, चित्रात जणू जाणच ओतलीत" असे ते म्हणत बाबासाहेबांना आनंद होत असे ते गालातल्या गालात हसत, बाबासाहेबांनी रेखाटलेले डोळे उघडे असलेली गौतम बुद्धांचे चित्र अजूनही औरंगाबादला ठेवली आहे.
सुंदर चित्र आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना बाबासाहेबांना आकर्षित करत असे, शिल्प कला, सुंदर इमारतीचे बांधकाम याबद्दल बाबासाहेब आपल्या गप्पांमध्ये चर्चा करत असे. एखाद्या कलेचे कौतुक सुद्धा भारतात जातीय दृष्टीकोनातून पहिले जाते,आणि अशा प्रवृत्तीमुळे कला दाबली जाते आहे, संपुष्टात येत आहे अशी ते तक्रार करत, माणसाने अशा जातीत जन्म घ्यावा जिथे कुठल्या न कुठल्या कलेचा वारसा आहे.
बाबासाहेबांचे घर म्हणजे काही वाडा वगैरे न्हवता पण एखाद्या राजा प्रमाणे थाट मात्र होता, बाबासाहेबांच्या राजगृहात भले मोठे ग्रंथालय, कित्येक उंची बुटांचे जोड, निरनिराळे, विविध प्रकारचे फाउंटन पेन बाळगणे बाबासाहेबांची विशेष आवड , तसेच उंची कोट आणि टोपी ते बाळगत, दुर्मिळ चित्रांचे संकलन त्यांच्या विजयी व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील अडथळ्यांची उडवलेली दाणादाण याचे पुरावे होते. असे वाटायचे कि उंची राहण्यात, दर्शवण्यात त्यांचा एक सुप्त आनंद होता. बाबासाहेबांनी सिगारेट दारू पासून कायम दूर राहिले इतर सर्व प्रकारच्या लोकांच्या सानिद्ध्यात राहून सुद्धा त्यांनी स्वतःला निर्व्यसनी ठेवले होते.
बाबासाहेबांचे पुस्तकप्रेम त्यांना समाजातील इतर करमणुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवत होते. नाही म्हणायला त्यांनी काही सिनेमे पाहिले होते. रमाई सोबत त्यांनी "Uncle Tom" हा सिनेमा पहिला होता. " अछुत कन्या" हा हिंदी सिनेमा पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या दुसर्या पत्नी डॉ.शारदा कबीर यांच्या सोबत त्यांनी "Oliver Twist " हा सिनेमा पहिला होता.
बाबासाहेबांना क्रिकेट खेळ खूप आवडायचा, ते तरुण वयात खुपदा खेळायचे, पहिल्या पत्नी सोबत त्यांच्या माहेरी धारवाडला आल्यानंतर ते तेथील वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थांसाठी क्रिकेटचे सामने भरवत असत आणि स्वतः सुद्धा भाग घेत असत. विशीत असताना बाबासाहेब पत्ते (cards, raund the bridge ) सारखे खेळ खेळत, मित्रांसोबत व्यायाम म्हणून किंवा बदल म्हणून बाबासाहेब समुद्रात पोहण्यास सुद्धा जात असत
प्राणीप्रेमी बाबासाहेब-
बाबासाहेबांच्या हस्ताक्षाराला एक वेगळी शैली आणि अंदाज होता, फार सुंदर पद्धतीने ने पेन चालवायचे, खूप लोक त्यांच्या अक्षराची प्रशंसा करायचे, बाबासाहेबांना कुत्रांची फार आवड होती, एखाद्या वेगळ्या वंशाचा कुत्रा त्यांना हवा असल्यास ते देशाच्या कानाकोपरयात चौकशी करत. त्यांनी पळालेल्या "टोबी" कुत्रा आणि एक हरणाचे पाडस वर त्यांचे विशेष प्रेम होते, खूप लळा लागला होता त्यांना त्यांचा, दामोदर हॉल वर वस्तीला असताना बागेत ते तासंतास या दोघांसोबत खेळत असत, त्यांना भरवत असत.एकदा त्यांचा लाडका कुत्रा टोबी जेवण करत न्हवता, बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला पण तो जेवला नाही, बाबासाहेब त्याला विचारायचे "अरे कशासाठी हा सत्याग्रह आणि उपोषण ?" बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचे ते सुद्धा त्या दिवशी जेवत नसत.
माणुसकी जपणारे बाबासाहेब-
एकदा प्रवासात आपल्या सोबत असलेल्या सहकारी कार्यकर्त्याकडे पांघरून न्हवते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्याकडील असलेले चादर त्याला दिली आणि झोपायला सांगितले, सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा बाबासाहेबांच्या अंगावर काहीच न्हवते फक्त वळकटी अंथरून ते झोपले होते, त्याने विचारले असे का केले तेव्हा बाबासाहेब म्हणाले "माझ्याकडे एकाच होती ती मी तुला दिली" तो अनुयायी काहीच बोलला नाही पण डोळ्यात अश्रू मात्र चमकले. एकदा कुणीतरी जवळचा सहकारी साहेबाना भेटायला आला, त्यावेळी नेमके घरात कुणी न्हवते, बाबासाहेब स्वतः स्वयंपाक घरात गेले आणि चहा बनवायला घेतलं पण त्यांना दुधाचे भांडे काही सापडेना, त्यांनी मित्राला विचारले "काळा चहा घेतोस न रे बाबा ?" मित्र म्हणाला "बहुतेक वेळा मी बिन दुधाचा चहा घेतो" बाबासाहेब मिशिकीलपणे म्हणाले,"पण आपल्या आयुष्यात दुधाचा साठा एकदा तरी मिळालाच पाहिजे" असे बोलून बाबासाहेबांनी पावाचे दोन तुकडे केले (double roti), मित्र एवढा पाव नको म्हणताच बाबासाहेब हसून म्हणाले "अरे समान हक्कांसाठी तर आपली लढाई आहे" आणि दोघ गप्पांमध्ये रंगून गेले
एकदा संध्याकाळी बाबासाहेब घरी परतत असताना त्यांना थंडीने कुडकुडत बसलेला एक वृद्ध गृहस्त दिसला, बाबासाहेबांना त्याची दया आली, बाबासाहेब त्याच्याजवळ गेले आपला उंची कोट काढून त्याच्या अंगावर टाकला, त्याला मिठी मारली आणि म्हणाले "तुमच्यासारखे या समाजात कित्येक लोक आहेत, आपल्याला जमेल तेवढे प्रत्येकाने करायला पाहिजे" असे बोलून बाबासाहेब निघून गेले.बाबासाहेबांची करुणा आणि दुसऱ्याचे दुखः आपले मानण्याचा स्वभाव त्यांना बोधीसत्व पदापर्यंत घेऊन जातात.
बाबासाहेब संसारात लक्ष देत नाहीत कधी विचारपूस करत नाहीत, फक्त काम, काम आणि समाज एवढच करत असतात म्हणून रमाई आंबेडकर या काहीशा नाराज असत आणि त्यावरून उभयतांत थोडी फार भांडणे होत असत. एकदा असेच रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या "कधी तरी घरात लक्ष द्या, काय आहे काय नाही, भाजी पाला,धान्य आहे कि नाही हे पहाव" ते ऐकून बाबासाहेब तडक बाहेर गेले आणि ६ - ७ भाजीच्या जुड्या आणि १०० - १२५ बोंबीलच्या काड्या घेऊन आले, ते पाहून त्यांच्या आत्या हसत म्हणाल्या, "भीमा अरे एवढी भाजी आणलीस? खराब होईल ती, एक दिवसात संपणार आहे का ?
बाबासाहेबांना मधुमेहा ने हैराण केले होते, त्यांचे शरीर त्यांना तसे संकेत देत असावेत म्हणून मरणापूर्वी बाबासाहेब आपल्या अत्यंत निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांना एका पत्रात म्हणतात, "भाऊराव मी आत जास्त काळ नाही जगणार, तुम्ही मनाची तयारी करून ठेवा". या एका वाक्याने भाऊरावांची काय अवस्था झाली असेल हे भाऊरावच जाणतात, शोषित पीडितांचे उत्कर्षासाठीच त्यांना दीर्घ आयुष्य लाभले असावे असे बाबासाहेब गमतीने म्हणत असत आणि हाच विश्वास बाबासाहेबांना त्यांच्या शारीरिक विकार आणि त्रासावर मात करण्यास बळ देत असावेत. मृत्यूच्या आधी काही दिवस एका निवांत संध्याकाळी साहेबांचा सेवक नानाकचंद रत्तू बाबासाहेबांच्या सोबत होता, बाबासाहेबांनी नानाकचंद रत्तू ला डोक्यात तेल घालून मसाज करण्यास सांगितले, बाबासाहेबाना थोड बरं वाटलं, बाबासाहेब काहीतरी गुणगुणत होते, हळू हळू रत्तू ला आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला "बुद्धं सरणं गच्छामि" " बुद्धं सरणं गच्छामि”
बाबासाहेबांनी नानाकचंद रत्तुला त्यांचे आवडते बुद्ध गीत रेकोर्ड वर लावण्यास सांगितले.
असे आपले बाबासाहेब, नारळासारखे, वरून कठोर, शिस्तप्रिय गंभीर वाटणारे आणि आतून गोड पाण्यासारखे आणि मृदू, रसिक, निर्मळ आणि मिश्किल स्वभावाचे, कामाच्या ओझ्याने आणि समाजाच्या चिंतेने स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणारे, लाडकी पत्नी आणि मुले यांना सामाजिक कार्यबाहुल्यामुळे पुरेसा वेळ न देऊ शकणारे, हळवे, दयाळू, मनमिळाऊ आणि जिंदादिल... आपले बाबासाहेब !!
- पूर्वप्रकाशित दैनिक पुण्यनगरी जयंती विशेषांक २०१६
- पूर्वप्रकाशित दैनिक पुण्यनगरी जयंती विशेषांक २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा