प्रत्येकाचं स्वत:च घर असावं हे एक स्वप्न असतं.डोक्यावर हक्काचं छप्पर असणं हे रात्री बिछान्यात पडल्यावर लागणाऱ्या शांत झोपेचं एक कारण.छप्पर कसंही असो.अगदी झोपडी ताडपत्रीतही सुखानं झोप लागते.यासाठी आयुष्यभर जमा केलेली काडी न काडी आपण त्यासाठी लावतो.
आपल्या ऐपतीप्रमाणे अंथरून बघून पाय पसरायचं तसं.माझही स्वप्न होतं.अर्थात यात आईवडलांच्या संपत्तीचाच वाटा.तर घाटकोपरचं घर जीथं आयुष्य गेलेलं ते विकून आम्ही शिफ्ट झालो.नवीमुंबईत.बजेटमध्ये घर घ्यायचं होतं.मुंबईत वा उपनगरात कुठेही शक्य नव्हतं.मग शेवटी जवळपास दोन महिने फिरून एका ठिकाणी शोध थांबला.एजंट आपलाच.त्यात गाववाला.त्यामुळे विश्वासाने पाउल टाकलं.
सिडको म्हणजे तशी भीती नव्हतीच.तरीही एजंटनच सांगितलं.वकिलाकडून प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट करून घेऊया.त्याचे दोन हजार घेतले.ते त्याने वकिलाला दिलेच नाहीत हे नंतर वकिलाकडून समजलं.सर्च रिपोर्टमध्ये सदर रूम कुणाला विकली असेल किंवा तिच्यावर काही लोन काढले असेल तर त्या नोंदी समजतात.रूम रिसेल होता.म्हणजे तसा रिसेल नाही.तर त्यात भाडोत्री होते.
बुकिंग करून घेतो तसा नव्हता.रेडी पजेशन.वकिलाने क्लीअर आहे असं सांगितलं.विशिष्ट बजेटला रूम नक्की केला.रुममध्ये थोडं काम होतं म्हणून तो बजेटमध्ये बसला.थोडेफार लोन.ठीकय म्हणून पुढे सौदा केला.खूप घासाघीस झाली.रूम मालकाचा साडेबाराटक्केचा प्लॉट त्यावर ही इमारत.मालकही बिल्डरच.कामे घ्यायचा.
त्याच्या अलिशान ऑफिसमध्ये डील झाली.ज्यूस वगैरे सोपस्कर.पेमेंट कसं करणार वगैरे ठरलं.
मला कुणाला तंगवायला आवडत नाही.अडवणूक करणे आपला स्वभाव नाही,याउलट पेमेंट करून जेवढे लवकर मोकळे होऊ तेच बघतो मी.आज नाहीतर उद्या द्यायचंच असतं कशाला डोक्याला ताप अशी आपली वृत्ती.टोकन म्हणून त्याला रीतसर एक लाखाचा चेक दिला.
त्याचा चलन अन एमओयु बनवला.जागा आईच्या नावाने म्हणून त्याच्या आईच्या नावे सगळे पेपर बनले.
चेक देताना मी lacs अशी स्पेल केलं होतं जे आता चालत नाही लाख असं लिहावं लागतं.मग मालक गाडी घेऊन आला आणि मला बँकेत घेऊन गेला.सगळे व्हाईट मध्ये.कायदेशीर.सदर रुममध्ये किचन आणि बाथरूमचे काम करून घ्यायचं होतं.त्याचा खर्च दीड पर्यंत सांगितला होता.
कंत्राट घेणारा एजंटचाच एक भावोजी होता. त्याला प्रत्यक्ष काम दाखवायचं होतं.दुसऱ्या आठवड्यात त्याला घेऊन आम्ही रूमवर गेलो.तीथं एक मुस्लीम व्यक्ती (शेखभाई)रूम पहायला अगोदरच आलेला.तो एजंटचा ओळखीचा.दोघांनी हाय हैलो केले.मग त्याने दोन रूम बुक केल्याचे समजलं.
त्याने वरही (पहिल्या माळ्यावर)एक रूम बुक केल्याचे समजलं.आम्हाला त्याबद्दल फार काही जास्त उत्सुकता नव्हती त्यानेच विचारलं नक्की कोणती रूम?मग त्याला घेऊन गेलो.तेव्हा माझ्यापेक्षा तोच जास्त गर्भगळीत झाला.म्हणाला "साहब इसका पेमेंट अभी अभी सिडको मै भर कर आ रहा हुं | चलो पेपर दिखाता हुं"
तो खाली घेऊन आला.गाडीतून पेपर काढले.
flat नंबर बरोबर होता.माझ्या तोंडाला सोकड पडली.मी टोकन द्यायच्या अगोदरच हा सौदा झालेला त्यामुळे ही फसवणूक धक्कादायक होती.पण दुसऱ्याक्षणी सावरलं स्वत:ला.माझ्या जागी दुसरा असता तर स्ट्रोकने आडवा झाला असता.धक्काच असा होता.घराचं स्वप्न डोळ्यात साठलेल्या पाण्यात विरघळून गेलं.बाहेर पडू दिलं नाही.
मालकाला फोन केला.एजंट अन शेखभाई मला टेन्शन घेऊ नको असं सारखं सांगून धीर देत राहिले.
न तुमचे पैसे बुडणार नाहीत याची मी खात्री देतो असं शेखभाईने सांगितलं.तेव्हा थोडा जीवात जीव आला.एक लाख ही आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे.तसे मी करोडो बघितले रेकोर्सला.कमावलेही थोडेफार (करोड नाही.pls नोट) पण ही रक्कम आजही जास्तच आहे.
मालक आला.आणि शेखभाईला म्हणाला "मैने आपको मना किया है आपका पैसा नीचे वाले रूम मै एडजस्ट करता हुं" रोशन भडकला म्हणाला तू आमच्याघरी येवून पाया पडून गयावया करून पैसे घेऊन गेलास आणि दोन्ही रूम घ्या म्हणाला होता.आता पलटी मारू नकोस..हवेतर यांचे पैसे मी देतो.मालक उडवाउडवी करू लागला.मग रोशनने फोनकरून बायकोला बोलावले.
भाभी धावतच आली.आल्या आल्या शिव्या द्यायला सुरुवात.मालक घाबरला.वरमला.मला म्हणाला तुम्हाला काय करायचं? मला एकदा अनुभव आला की परत त्या वाटेस जात नाही.सुरुवातीलाच धोका म्हणून मग माझं मनच तयार होईना.मन मोडलं होतंच.आणखी पुढे काही लीगल झमेला नको.हा विचार करून मी हा रूम नको सांगितलं.पैसे परत करा एवढंच शांतपणे म्हणालो.
शेखभाई म्हणाला आप टेन्शन मत लो आपका पैसा मै देता हुं इनसे मत लेना.मालकासमोर हे सांगितल्यावर मला जीवात जीव आला.दुसऱ्या दिवशी एजंटला घेऊन आम्ही शेखभाईच्या घरी गेलो.त्याने चहा दिला.मग चेक दिला.25 तारीख टाकली.आणखी वीस दिवस अवकाश होता.
शेखभाईला दोन्ही रूम हवेच होते. त्यामुळे तो मला सारखं धीर देत पैसे बुडणार नाहीत मी देतो बोलत राहिला.मी ठरवलं असतं तर रूम घेऊ शकलो असतो.तुम्ही उगाच नकार दिला मी शेखला थांबवलं असतं माझा जुना दोस्त आहे तो असं एजंटही म्हणाला.पण एकदा मन मोडलं की काही अर्थ उरत नाही.आम्ही चेक घेऊन बाहेर पडलो.दुसरा रूम शोधू लागलो.चेकमुळे अर्धा जीव भांड्यात पडला होता.
पण त्यासाठी आणखी वीस दिवस चेक क्लियर व्हायची वाट बघत बसावं लागणार होतं.दुसरा रूम सिलेक्ट केला.त्यांना हे घडलेलं प्रकरण सांगितलं.सगळं पेमेंट चेकने दिलं.आणि यावेळी सुरुवातीला फक्त दहा हजारच टोकन म्हणून दिलेले.एक लाख बाकी होते.पेपर बनवले.सह्या झाल्या.
दरम्यान मी चेक बँकेत टाकला.तो आठवडाभराने 150 रुपये बाउंस चार्ज लावत रिटर्न आला.शेखभाईनेही मारली होती.त्याला फोन केला तर म्हणाला मालक म्हणाला टाकू नको.चिडून मालकाला फोन केला तर पुन्हा उडवाउडवी सुरु.ऑफिसला भेट म्हणालो दोघेही टाळत राहिले.इकडे जो रूम घेतला त्यांनी उरलेले पैसे फेडा म्हणून तगादा लावला.डोकं चालत नव्हतं.शेखभाईला आठवण करून दिली.
तो चिडून वैतागून म्हणाला "आप दोनो का व्यवहार हुआ था मुझे बीचमे मत घसीटो",
त्यावेळी मालकाने फसवल्यापेक्षा याने जो दिल दर्या गांड समंदरपणा दाखवलेला त्याची विलक्षण चीड आलेली.कारण चेक दिला तोही वीस दिवस उशिराचा त्यात बाउंस करून माझं बँक रेकॉर्ड खराब वर चार्जेस वेगळे अन आता म्हणतोय मुझे बीचमै मत घसीटो?
हेही बरोबर होतं.मी उगाच त्याच्यावर विसंबून राहिलो.त्याचा तसा तांत्रिकदृष्ट्या संबंध नव्हताच.शेवटी मालकाच्या ऑफिसला फेऱ्या सुरु झाल्या.रोज जायचं.रोज टाचा घासायच्या.मग चार महिन्याने दिवाळीत मागेपुढे त्याने पन्नास हजार दिले.बाकीचे चारपाच दिवसात देतो म्हणाला.त्यावेळी अमोल जाधव हा मित्र सोबत होता,मी घेत नव्हतो मला पूर्ण रक्कम हवी होती.
तो म्हणाला भागते भूत की लंगोटी म्हणून घे..जे मिळतेय घ्यायचं.आपण चुकलो असं समजून गप्प बसायचं.तेही ठीकच होतं.माझाही अर्धा जीव आला.ते पैसे थेट बँकेत भरून त्याचदिवशी पन्नासचा चेक नवीन घर मालकाला सुपूर्द केला.आता फक्त पन्नास उरलेले.पुन्हा मालकाच्या ऑफिसला फेऱ्या आज देतो उद्या देतो हेच सुरु.नाही देणार असं आजतागायत बोलला नाही पण दिलेही नाहीत.
नवीन मालकाने पुन्हा उरलेल्या पैशासाठी तगादा लावला.मालकीणबाई दारात येवूनच ओरडून बोलायची मोठ्याने आपण लाजून मरून जावं असं वाटायचं.डोकं चालत नव्हतं.शेवटी बायको म्हणाली आपल्या घरात इमर्जन्सीला असतं ते करा.मग घरातले डाग गहाण ठेवले.त्यातून हे देणं भागवलं.त्याचं व्याज आजही भरतोय.
हे सांगायचं एक कारण की गावठाणमध्ये चुकनही कधी व्यवहार करू नका.कितीही चांगलं असू दे तुम्हाला घोडाच लागणार आहे.
एक दिवस त्याच्या घरी गेलो.त्याच्या आईला भेटलो.वाटलं आईला सांगितलं तर आई त्याला जाब विचारेल दमात घेईल.पेपर तिच्यानावाने होते अंगठा घेतला होता याने.त्यामुळे तिच्या हे कानावर गेलं पाहिजे असं वाटलं.अन त्याला बर्डन यावं ही इच्छा होती.त्याच्या आईला व्यथा सांगितली.आईने व्हय व्हय पोरा म्हणत ऐकून घेतलं आणि मग "मला कायपन मैइत नाय या डोकर्याने काय केला.फक्त मांजा आंगठा नेला छापून बै मला कै बी मायीत नाय" असा पवित्रा घेतला.
काय बोलणार परत घरी आलो.मोदीने नोटबंदी करून अगोदरच कंबरडे मोडले होते.
पुन्हा फोन पुन्हा ऑफिसला चकरा सुरु केल्या..मध्यंतरी पोलिसात जावं असं खूप वाटायचं पण आमची आई नको म्हणायची.यांचा भरवसा नाही.तुझ्या जीवाला बरं वाईट करतील ती लोकं.यांचा काय भरवसा नसतों अशी तीची काळजी.साला पैसे आपले आणि घाबरायचंही आपणच.
त्याच्यावर खरेतर एट्रोसिटी बनू शकली असती.जात सांगत नाही.उगाच इथं वेगळा विषय सुरु व्हायचा.त्यात प्रत्येक गोष्टीत एट्रोसिटी आणून ती स्वस्त नव्हती करायची.म्हणून मी ते टाळले.लोक मात्र पैसे उकलण्यासाठी एट्रोसिटीचा वापर करतात अशा कहाण्या रचून वात आणतात.इथं लुटलेले पैसे वाचवायला ते पाउल नको वाटायचं.पोलिसांकडे जावून फसवणुकीची केस तरी करावी असं वाटत होतं.
तर आई म्हणाली आपण घरी जाऊन त्याच्या बायकोला समजवू तुझ्या नवऱ्याला पैसे द्यायला लाव वगैरे बोलूया.तीचं तरी ऐकेल.बघूया.मग आम्ही मी पत्नी आई त्याच्या घरी गेलो.कित्येक महिने तो फोनच उचलत नव्हता.कधी उचलला तर देतो काय पळून चाललो काय?दिले ना अर्धे ? अशीच भाषा कायम. त्याच्या रूमवर गेलो तिसरा माळा.तो घरीच होता.त्याला बघून माझा संयम सुटला.
घरी आल्यामुळे तो अडचणीत आला होता.सगळं ऐकत होता.गप्पा माझा आवाज चढला.त्याची बायको आली आवाजाने खाली. कोणय ..? हे यांच्ये पैशे घेतलेस..देवा किती लोक घरी येणार असे? काय लाज शरम ..तुला सोडून जाईन मी राहणार नाय इथं..
(मला मनातून बरं वाटलं याला शिव्या पडू लागल्या..)
अन मग एकाएकी तीनं आमच्याकडे मोर्चा वळवला.त्यादिवशी तुम्हीच आलेला का आईकडे?
मी हो म्हणालो.तर म्हणाली
"परत यायचं नाय इथं.आणि या घरातपण यायचं नाय.तुमचा व्यवहार ऑफिस मध्ये झालाय ना मग तिकडेच काय ते मिटवायचं.असे कित्तेक लाख थुंकलेत मी..आता जर परत या घराची पायरी चढला तर याद राखा,माज्या सारखी वाईट कुणी नाय..पोलिसात तकरार करेन आम्हाला मारायची धमकी देतात हे लोक म्हणून.."
आम्ही सगळे सर्द झालो.एकमेकांकडे बघायला लागलो..आमची आई तीला मी जगाशी भांडताना पाहिलंय ते बघतच मोठा झालो मी पण आज तीही गप्प होती.हल्ली आई थकल्यामुळे या गोष्टी टाळते मग मीही आवरते घेतले.उगाच आईला आणखी त्रास नको.
मालकाला म्हणालो पैसे लवकर रिटर्न कर.आमचेच पैसे मागायला घरी यायचं तू ऑफिसला सापडत नाही फोन उचलत नाही आणि मग घरी आलो तर अपमान करून घ्यायचं? एवढी बायको शेठच्या पोटची आहे तर देवून टाकना आमचे पैसे तर..त्याची बायको म्हणाली "माझ्याशी व्यवहार केला असता तर तुम्हाला घरी येवून दिले नसते, हा भाडखाऊ आहे त्याने केलाय व्यवहार त्याच्या ऑफिसला जा काहीही करा."
त्यावर आम्ही बाहेर पडलो.असेच दोन तीन महिने गेले.आज उद्या आज उद्या करत मध्यंतरी त्याने त्यातले काही पैसे परत केले.आता त्याच्या जोर वाढला.आता दिले ना एवढे काय बुडवले का? देणार ना? नाही म्हणालो का? असं चालू असतं.
त्याने एक बारवाली ठेवलीय.तीला वन बीएचके flat घेऊन दिलाय सोनेनाणे घरी बायकोलाही माहित आहे.
अशा लोकांच्या घरचेही आई असो बायको सगळे निर्ढावलेले सराईत असतात हे अनुभवलं.
ही एक गोष्ट ज्यामुळे मी इथं काही दिवस फेसबुकवरही नव्हतो.बराच डिस्टर्ब होतो.
अन नंतर आयुष्यात एकामागून एक अशा गोष्टींची मालिकाच सुरु झाली.
आज फोन केला होता.आले की देतो...देणारच मी काय पळून जातोय..? असं बोलून फोन कट केला...!