hindu festivals gudhi padava Buddhist community लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
hindu festivals gudhi padava Buddhist community लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

गुढीपाडवा आणि बौद्ध समाजाची भूमिका (B)

गुढीपाडवा साजरा करण्याच्या विरोधी कल्टमध्ये आंबेडकरी समाजाने सहभाग घेऊ नये 
या संर्दभातील लेखाचा उत्तरार्ध -
गुढीपाडवा साजरा का करू नये याचे संदर्भ दावे वगैरे जे सोशल मिडिया
आणि इतर ठिकाणी प्रचलित आहेत.
मी ते अॅज इटीज दिले.जे बाहेर प्रचारित आणि प्रसारित होतेय,ज्यावर एक पुस्तकही छापलेलं आहे तेच मुद्दे इथं मांडले कारण मग मूळ मुद्दा समजायला सोपं जातं.अनेकांना ते समजलेही.विशेषतः ज्यांच्यासाठी लिहिलं त्यांना.
यात कुणा समाज व्यक्तीला बदनाम करण्याचा टीका करण्याचा छुपा अंत्यस्थ हेतू नव्हता तसा तो कधी नसतो.म्हणजे जे म्हणायचं आहे ते उघड म्हणन्यास काही प्रत्यवाय नाही.त्यादिवशी अशाच प्रकारचे संदेश मला व्हाटसेपवर प्राप्त झालेले आहेत तेही आंबेडकरी मित्रांकडून.ज्यांना इच्छा आहे त्यांनी इनबॉक्समध्ये तशी विनंती करावी पुरावे दिले जातील.यात माझ्या मनाचं कपोलकल्पित वगैरे काही नाही.हे संदर्भ दावे वगैरे माझं संशोधन नाही.
असे संदेश उघड प्रसारित होतात ते लक्षात घ्यायचं नसेल किंवा डोळे झाक करत केवळ मिलिंद धुमाळे ने मांडलं म्हणून थयथयाट करायचा असेल त्यांनी तो जरूर करावा.मात्र जे माझे दावे नाहीत संशोधन मांडणी माझी नाही त्याबद्दल मला दोषी धरून ऊर बडवणाऱ्यानी वस्तुस्थिती एकदा तरी जाणून घेतली पाहिजे.
मला कीव येते त्यांच्या बालिशबुद्धीची.माझ्या पोस्टवरून काहींनी थयथयाट सुरु केला आहे. पुरोगामी व्यक्तींची चळवळ त्यांचं माध्यम बदनाम करण्याचा हा एक बालिश प्रयत्न आहे तो अक्षरनामा आणि बिगुल या पोर्टलचा जाणीवपूर्वक नामोल्लेख झाल्यामुळे लक्षात आलं.अर्थात तो विशिष्ट लोकांकडूनच सुरु आहे हे वेगळं सांगायला नको.त्यांचे अजेंडे असतात त्याप्रमाणे ते वागत असतात.अर्थात माझाही त्या पोस्टमागे काहीएक अजेंडा आहे होताच. तो अत्यंत स्पष्ट होता.
माझ्या समाजाने कोणत्याही परीस्थितीत तोफेच्या तोंडी उभं राहून नुकसान करून घेऊ नये.मुद्दा फक्त हिंदू धर्मातील सणांचा नाही.गांधीवरील टीकेचाही आहे.
हे मागेही एकदा मी मांडलं आहे.
ज्यांनी खून केला ते राष्ट्रभक्त राष्ट्रवादी म्हणून मिरवतात आणि आम्ही मात्र गांधीवर टीका करून देशद्रोही ठरवले जातो.आज समाजाला महत्वाचं काय हे पाहणं जास्त गरजेचे आहे.जे घडून गेलेय त्यानिरुपयोगी मुद्यांवर टीका करून ते आज बदलणार नाही.आणि फायदाही होणार नाही.
आपलं विशिष्ट डबकं म्हणजे जग नाही.त्या डबक्याबाहेर प्रचंड मोठं आणि समजुतीने वागणारं समजून घेणारं आणि आपल्या चुका मोठे मन करून स्वीकारत पुढे चालणारं एक जग आहे हे विशिष्ट डबक्यात हुंदडणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं.तुम्ही नागडे आहात याची जाणीव करून दिली म्हणून थयथयाट करण्यापेक्षा कपडे घालावे आपत्कालीन परिस्थिती टॉवेल गुंडाळून घेतला तरी चालेल पण नाही आमचा नग्नपणाही पारदर्शक आहे हे जगाला दाखवून द्यायचं असतं यांना.त्यामुळे यांना कार्पेटमध्ये गुंडाळलं तरी नग्नता झाकली जात नाही.हिंदू धर्म हा विषमतावादी धर्म आहे यात नविन काय आहे? मुद्दा हा नव्हताच सणांचा होता.आणि आम्ही तर टीका करू नका हेच सांगतोय.
त्यात एक सांगायचं राहिलं ज्या सण उत्सवांचा त्रास होतो त्यावर तर बोललेच पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळली पाहिजे अशा सणांचा इतरांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी त्या त्या धर्मांनी घेतली पाहिजे.
मी तर उघड माझ्याच आंबेडकरीसमाजावर टीका केली दुषणे दिली तरीही त्यांनाच त्रास झाला ये बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना क्यू? माहितेय कारण तूम्ही सुधारू नये असं त्यांचं मत असतं कायम नको त्या प्रश्नावर मुद्यांवर संघर्षरत करणे बिझी राहणे हेच त्यांचे ध्येय असते जेणेकरून तुम्ही प्रगती करू नये.म्हणून आरक्षण बंद करण्याची धमकी दिली जाते दम असेल तर करून बघा म्हणावं.
मला व्यक्तिशः १९५६ अगोदरच्या कोणत्याही प्रकारच्या इतिहासात रस नाही.
फारतर १९४७ नंतरचा इतिहास स्वीकारायला हरकत नाही.अर्थात तोही स्वातंत्र्यलढा या अनुषंगाने.
आंबेडकरी-बौद्ध समाजासमोर सण-उत्सव यात रममाण होण्यापेक्षा आणि इतर सणांना विरोध करण्यापेक्षा जास्त कळीचे आणि मुलभूत प्रश्न आहेत,सर्वात प्रथम भयमुक्त जगण्याचा नैसर्गिक हक्क अधिकार,संरक्षण,शिक्षण,रोजगार या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे.ही त्या पोस्टची मुख्य भूमिका होती.असो.

सोमवार, २८ मार्च, २०१६

गुढीपाडवा आणि बौद्ध समाजाची भूमिका (A)

गुढीपाडवा हा उपद्रवमूल्य नसलेला सण आहे.
ना लाऊडस्पिकर ना ढोलताशे,ज्यांना साजरा करावासा वाटतो ते घरात गोडधोड करतात दारात बांबू रोवून गुढी उभारतात.
मात्र अलिकडे काही ठिकाणी शोभायात्रा काढण्याचे आणि त्यात ढोलताशा वाजविण्याचे प्रकार वाढले आहेत.
स्त्रिया-मुली नऊवारी आणि वर भगवा फेटा बांधून थोर प्रथा संस्कृती की काय ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जपायचा प्रयत्न करताना दिसतात.
नटायला मुरडायला मिरवून घ्यायला मिळणे ही नैसर्गिक आवड आहे.यानिमित्ताने ती हौस भागवली जाते म्हणून तरुणाई यात आघाडीवर आहे.यामागे एवढाच विचार आहे.हे लक्षात घेतलं पाहिजे.
गुढीपाडवा साजरा करण्यामागचे कारण-
या दिवशी संभाजी महाराजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली,
आणि त्यांचं धड वेगळं करून मुंडके भाल्यावर की उंच बांबूवर रोवून मिरवणूक काढल्या गेली.शेवटपर्यंत हा आपला स्वाभिमानी राजा बधला नाही.म्हणून त्यांच्या शरिराचे अक्षरश: तुकडे केले गेले होते.असे सांगितले जाते.संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनांचा इतिहास या पुस्तकात पान क्र.24 वर ही माहिती दिली आहे इतर काही मराठा संघटनाही ही माहिती देत असतात,पाडवा साजरा करू नये यासाठी यामागील हे कारण सांगितलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे संधीसाधू पक्ष संघटना आणि इतर काही लोकांना हे मिथ वाटतं.त्यामुळे मराठा समाजातच यात मतभेद आहेत.ब्राह्मणांनी गुढी उभारली की नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होत नसले आणि कुणी मान्य करत नसले तरी संभाजी राजांची अशी धिंड काढून त्यांचे शिर फिरवले गेले होते हे सत्य आहे.अशी पुष्टी सेतू माधवराव पगडी यांनी देखील केली आहे.त्याच्याशी कुणाला देणेघेणे नाही.नसते.कारण शेवटी सगळे राजकारण हे ब्राह्मणीसंस्कृती केंद्रित.यात विशेष बाब म्हणजे अब्राह्मणी म्हणजे बहुजन जाती सर्वात पुढे आघाडीवर असतात.
यात आणखी एक गोष्ट अशी की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या विखूरलेल्या शरीरअवयवांना गोळा करून ते शिवून त्यावर विधिवत अंत्यसंस्कार हे वढू येथील गोविंद महार नामक पहिलवानाने केले ही बाब सांगायला सर्वांना लाज वाटते कारण एका महाराच्या हातून राजांचा अंत्यविधी झाला हे लाजिरवाणे वाटत असावे म्हणून वढू येथील समाधी जवळ तसा उल्लेख असलेला बोर्डही हिंदुत्ववादी संघटनांनी काढून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आणि भलत्याचेच नाव त्यात लावले गेले.
इतिहास फक्त विशिष्ट समाजाच आपल्या सोयीने लिहितो अशातला भाग नाही सगळेच आपापल्या सोयीचा लिहितात.
दुसरा मुद्दा गुढीपाडवा रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून त्यादिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितलं जातं मात्र रामायण हेच एक मिथ आहे,काल्पनिक काव्य आहे त्यामुळे या संदर्भालाही तसा अर्थ उरत नाही.शिवाय जिथे जिथे रामायण घडलं असं संगितलं जातं त्या भागात गुढी उभारण्याची प्रथाच नाहीये.
तिसरा मुद्दा – इथून हिंदूंचे नविन वर्ष सुरु होते.आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.निसर्ग चक्र पाहता मला हे नविन वर्षे वाटत नाही.
म्हणजे उलट हे वर्ष संपतेय.पानगळ होतेय झाडे झडतायत झरे नदी नाले आटत आहेत उन्हाळा सर्वात भयंकर दमवणारा ऋतू आहे.भारतीय समाजहा ऋतूंच्या कालचक्रावर जास्त अवलंबून आहे.त्यामुळे हा ऋतू नववर्षाच्या आगमनासाठी अनुकूल वाटत नाही.याउलट पाऊस सुरु होतो.
तो सुरुवातीचा दिवसच नवीन वर्षे म्हणून साजरा केला गेला असता तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं.पाऊस सुरु झाला की धरणी नवीन साज चढवते.सगळं साचलेलं धुवून स्वच्छ होऊन जातं.नवीन पालवी फुटते.झाडे बहरू लागतात.पाण्याचं मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.
नवीन वर्षासाठी याचा विचार का केला गेला नाही? कळत नाही.असो.
आता वरिल कारणे सोडा,हे काहीही असले तरी हिंदू लोक हा सण साजरा करतात,यात आंबेडकरी समाजाने विरोधरुपी करणीचामोगा कशाला बनायला पाहिजे? कुणाच्या गुढीखाली किती अंधार हाय हे समद्या गावाला ठावं हाय..बरोबर ना?
परंतु, आम्ही बौद्ध आहोत आम्हाला अमूकढमूक सणाच्या शुभेच्छा देऊ नका असे फेसबुकवर पूर्वी कुणा छपरीने पसरवलं होतं.आज त्याचीच ही पुनरावृत्ती पहावयास मिळते,कुणी ना कुणी याची री ओढताना दिसतो.
उद्या असेच कुणा हिंदूने आम्ही हिंदू आहोत आम्हाला आंबेडकर जयंती बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देऊ नका म्हणून पोस्टीं टाकल्या तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? अंगाला मसाला चोळून सोशलमीडिया डोक्यावर घ्याल ना?
अशा अक्कलशुन्य लोकांमुळे ध्रुवीकरणाला हातभार लागतोय.
आंबेडकरी समाज वेगाने आयसोलेशनकडे ढकलला जातोय.मित्रता वाढायची सोडून आणखी शत्रू निर्माण होत आहेत.आपण हिंदूंचे सण साजरे करत नाही ठीक आहे.आपण 22 प्रतिज्ञा पाळतो मानतो तेही ठीक आहे.ती अपेक्षा पुरातन देवभोळ्या अंधश्रद्ध हिंदू समाजाकडून कशीकाय आणि कशासाठी?
हिंदू समाजाला सुधरवायचा ठेका आंबेडकरी बौद्धांनी घेतलाय काय?
पारशी जैन शीख लिंगायत मुस्लिम ख्रिस्ती हे समाज या देशात आहेत की नाही?
की फक्त कट्टरहिंदू आणि आंबेडकरी बौद्ध समाज आहे? आणि आम्ही बौद्ध झालो म्हणजे आम्हीच सर्वात ग्रेट आम्हीच बुद्धिमान हुशार बाकी सगळे मूर्ख या गंडातून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? बुद्धाने प्रेम करायला शिकवलं मंगलमैत्रीचा संदेश दिलाय.आपण नक्की कुठे चाललोय? यावर कधीतरी विचार करा.
ऐकीकडे देशाची वेगाने हिंदू राष्ट्राकडे घोडदौड सुरु आहे आणि आपण आपल्या शेजारी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी त्रास न होणाऱ्या सणांवर देखील टीका करून विरोध करून त्यांना आणखी कट्टर बनवत चाललो आहोत.आज मराठा समाजातील बहुतांश व्यक्तीना संभाजी राजांची हत्या झाल्याचे मान्य नाही हा सण आणि संभाजी राजांची हत्या या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे अनेकांचे मत आहे.शिवाय यात ब्राह्मण पुरोहित वगैरे यांचा हस्तक्षेप नाही.
हा वैयक्तिक,कौटुंबिक पातळीवर साजरा केला जाणारा सण आहे त्यामुळे तो साजरा केला तर कुणाच्या झोळीत दगड येणार आहे?अशी मानसिकता सण साजरा करणाऱ्या व्यक्तीची असेल तर ती चुकीची ठरत नाही.जे सण आपण साजरेच करत नाही ते इतरांनीही साजरे करू नये हा अट्टाहास सोडला पाहिजे.
आपल्याला वैयक्तिक सांघिक पातळीवर ज्याच्या त्रास होत नाही.त्या सण प्रथा काहीही असो त्याविषयी बोलून विरोध करून ते आणखी रुजवणे बंद केले पाहिजे.याउलट भायाचारा कसा वाढेल हे पाहणे जास्त गरजेचे आहे.येणारा काळ आंबेडकरी बौद्ध आणि समविचारी पुरोगामी नास्तिक लोकांसाठी कठीण असणार आहे.ते लक्षात ठेवून पाउले उचलणे गरजेचे आहे.
विरोध कशाला करायचा कुठे करायचा त्यातून निष्पन्न काय होणार आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या !!

Translate