बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

एससी एसटी क्षमस्व

विवाहोत्सुक मुलगा - हॅलो..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हं बोला..(?)
विवाहोत्सुक मुलगा - मी चिन्मय बोलतोय मुंबैतून
विवाहोत्सुक मुलगी - कोण हवंय ?
विवाहोत्सुक मुलगा - सुकन्या बोलताय का?
विवाहोत्सुक मुलगी - हो बोलत्यीये...(?)
विवाहोत्सुक मुलगा - तुम्ही जाहिरात दिलेली वाचली लग्नासाठीची (?)
विवाहोत्सुक मुलगी - हम्म..अच्छा..बोला नं....
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत वर्णन असलेल्या तुम्हीच का त्या? म्हणजे तुमच्यासाठीच दिलेलीत का?
(जाहिरात जन्म 1976 रा.पुणे (महाराष्ट्र) शिक्षण:- बी.ई.(इले.)
व्यवसाय/नोकरी:- नोकरी मासिक उत्पन्न: - 50 हजार उंची:- 5' 2''. वर्ण:- गोरा वजन:- 60 कि. आई / वडिल- नोकरी/ भाऊ- नाही / बहिणी:- तीन पत्रिकाविषयक अटी:- पत्रिका पाहणार, मंगळ नाही जन्मरास-मेष /
अपेक्षा:- डॉक्टर/इंजिनिअर हवा, परदेशी जाण्याची तयारी, गावाची अट नाही.शक्यतो मुंबई, पुणे राहणारा. एकुलता एक असल्यास प्राधान्य.
जातीची अट नाही (एससी एसटी क्षमस्व)
विवाहोत्सुक मुलगी - होय..माझ्या डॅडनी दिलेली
विवाहोत्सुक मुलगा - अच्छा.. मी चिन्मय,इंजिनिअर आहे रहायला मुंबै,खाजगी कंपनीत जॉब करतो.14 लाख वार्षिक पेकेज आहे.
विवाहोत्सुक मुलगी - छानच की..घरी कोण कोण असतं?
विवाहोत्सुक मुलगी - आई आणि मी दोघेच
विवाहोत्सुक मुलगी -गुडच हे म्हणजे...छान गाव कोणतं म्हणालात ?
विवाहोत्सुक मुलगा - अहो मी अजून ते सांगितलंच नाहीये..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हम्म..मग सांगा ना? तेच तर विचारत्यीये
विवाहोत्सुक मुलगा - विदर्भातला आहे मी...तुम्ही गावाची अट नाही असे लिहिले आहे ..(?)
विवाहोत्सुक मुलगी - हो हो अगदी...चालेल की...पण रहायला मुंबैच ना?
विवाहोत्सुक मुलगा - होय..तुमचे वय खरे आहे काय? म्हणजे जन्मतारीख दिली आहे ती खरी आहे?
विवाहोत्सुक मुलगी - इश्श खरीच देणार नं...पण तेवढ्या वयाची दिसत नाही हं मी..अगदीच..
२५ वर्षाची वाटते मी असं माझ्या मैत्रिणी म्हणतात..युनो..मी योगा वगैरे करते नियमित अन टोटल वेगन आहे म्हटलं..
विवाहोत्सुक मुलगा - अरे वा छान आहे .. मी चाळीसचा आहे तेवढाच वाटतो..दोन वर्षे मोठ्या आहात तरी चालेल मला.आजकाल कोण बघत नाही या गोष्टी यु नो सचिनची बायको तर तीन वर्षे मोठी आहे म्हणे..
विवाहोत्सुक मुलगी - होय..छान विचार आहेत हो तुमचे आय लाईक इट..मुंबैत स्वत:चे घर असेल ना?
विवाहोत्सुक मुलगा - हो आहे की मोठ्ठा 2 बीएचके flat आहे स्वत:चा अन तेही दादर भागात.
विवाहोत्सुक मुलगी - छानच की...तीथे चौपटी जवळच आहे म्हणतात मला खूप आवडते समुद्रावर जायला.वाळूत नावे लिहायला.वाळूचा बंगला बनवायला..कित्ती गोड मजाच येईल..
विवाहोत्सुक मुलगा - तुम्ही आलात तर रोज घेऊन जाईन चौपाटीवर फिरायला
विवाहोत्सुक मुलगी - अय्या कित्ती छान...मग कधी येताय मला बघायला..आयमिन आमच्या डॅडशी बोलणी करायला?
विवाहोत्सुक मुलगा - येतो की,सुट्टी टाकून रविवार वगैरे गाठून चालेल...ना?
विवाहोत्सुक मुलगी - हो हो अगदी..चालेल की..मलाही रविवारी सुट्टीच असते बाबाही घरीच असतात..म्हणजे सकाळी कमिटी शाखा वगैरे आटपून अकरा प्रयत्न येतातच ते ..तुम्ही आडनाव नाही सांगितलेत ?
विवाहोत्सुक मुलगा - आडनाव कशाला आता? ओके तरीही सांगतो हसू नका पण...ठोकेवाले
विवाहोत्सुक मुलगी - इश्श हे काय आडनाव आहे?
विवाहोत्सुक मुलगा - अहो आमचे पूर्वज इंग्रजांच्या काळात चर्चच्या घंटा वाजवायचे लाकडी दांड्याने ठोके देवून तेव्हापासून हे आडनाव रूढ झालेय आम्हाला..एकदा झोपून गेल्यामुळे घंटा वाजवायची राहून गेली..अन आमचा पगार कापल्या गेला.त्याचा राग येवून आम्ही तीच घंटा अशी काही वाजवली की इंग्रज थरथर कापू लागले..त्यांचे कान किटून गेले..देशात स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले गेले अवघी धरणी स्वातंत्र्याच्या ओढीने तेजाळून निघाली.आम्ही पण स्वातंत्र्यवीर आहोत.काय समजलांत..?
विवाहोत्सुक मुलगी - पण मला नाही आवडलं हे तुमचं आडनाव...मी माझेच ठेवणार कायम..चालेल का?
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत ही अट नव्हती पण ठीक आहे आजकाल काय स्त्रीवाद बराच फोफावला आहे.मीही त्यात सामील होतो मग..चला घेऊ हेही जुळवून..
विवाहोत्सुक मुलगी - वाह किती सुंदर विचार..असं वाटतं लग्न करून आताच यावं तुमच्याकडे ..बाय द वे तुमची कास्ट काय आहे हो?
विवाहोत्सुक मुलगा - आमची कास्ट ग्रेट आहे.पण तुम्हाला कास्टशी संसार करायचा आहे की अनुरूप जोडीदाराशी? तुमचं वय बघा आतापर्यंत व्हायला हवं होतं ना...?
विवाहोत्सुक मुलगी - अजिबात चालणार नाही...करीन तर जातवालाच नाहीतर करणारच नाही आयुष्यभर तशीच राहीन..
विवाहोत्सुक मुलगा - जाहिरातीत जातीची अट नाही असं लिहिलं होतं तुम्ही..?
विवाहोत्सुक मुलगी - होय परंतु कंस वाचला नाहीत का? तुम्ही कोण आहात सांगा बरे...?
विवाहोत्सुक मुलगा - अच्छा तर मी त्यातच मोडतो असे समजा हवे तर...
विवाहोत्सुक मुलगी - वाह एका उपवर मुलीला दगा देण्याचा प्रयत्न केलात फसविण्याचा प्रयत्न केलात..तिच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलात..एवढा वेळ गुलगुलू करत होतात मग...? दुष्ट निर्दयी...असेच असतात तुम्ही लोक..
विवाहोत्सुक मुलगा -अहो लग्न जोडीदाराशी/माणसाशी करायचं असतं त्याच्या जातीशी नाही.आणि गाडी लेट होती हातात लोकसत्ताची जाहिरात पाहिली म्हटले चला टाईमपास करू म्हणून केला फोन सॉरी हा...ठेवतो..बाय
विवाहोत्सुक मुलगी - xxxxxxxxx

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

डुक्कर आणि आपली मनस्थिती

डुक्कर विनाकरण ढुशा देतं तुम्हाला धडक देवून पळून जातं
तुम्ही त्याला धडा शिकवायला मागे धावता,
डुक्कर बाजूच्या गटारात लोळून सर्वांग माखून घेतं
तुम्ही थबकता,मग डुक्कर तुम्हाला आव्हान देतं..
ललकारत म्हणतं... दम असेलतर भीड आता...
तुम्ही त्याच्यासोबत चिखलात माखून घेणार नाही.तुमचे कपडे खराब होणार असतात वेळ व्यर्थ जाणार असतो यातून काहीच हाती लागणार नसतं त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करता-
डुक्कर 56 इंची छाती फुगवून... जिss तम जिsss तम म्हणत असते.
चिखलात लोळणे डुकराचा स्वभाव आहे तुमचा नाही.
शांत रहा.तुम्ही त्याच्यासोबत लोळून कपडे खराब केले नाहीत याचे स्वत:साठी आभार माना.मानसिक समाधान मिळेल.

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

15 ऑगस्टपेक्षा 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस आहे.
15 ऑगस्टला कमी लेखण्याचा प्रश्नच नाहीये.पण तोही आता "इतिहासच" झालेला आहे.आणि आपल्याकडे एक अशी फॅशन रुजवली जात आहे की गतइतिहासाबद्दल ब्र काढू नये.
दुसरा मुद्दा आहे 15 ऑगस्टला आपण फारतर झेंडा फडकावतो स्वातंत्र्यसैनिकाना याद करतो त्यांचे कौतुक आहेच.परंतु दुसऱ्या महायुद्धात आपण भारतीय ब्रिटीशांच्या सैन्यात होतो आणि जपानच्या विरोधात लढत होतो.
होय तेच जपान ज्याच्याकडून आपण बुलेट ट्रेनची भीक घेणार आहोत.जपान ते देणारच आपल्या नाकावर टिच्चून.ब्रिटीशांच्या दफ्तरी कोणत्या समाजाचे कारकून अधिकारी होते कोण कोण ब्रिटीशांची पेन्शन खात होते.
ते तपासले तर काहीना तोंड लपवून फिरावे लागेल.तेच लोक अमुक तमुक इंग्रजांच्या बाजूने लढले असा अपूर्ण आणि खोडसाळ इतिहास मांडून इथे जातीत भांडणे लावून फोडा-झोडा ही नीती वापरून पुन्हा या देशावर आपली निरंकुश सत्ता असावी याची तोडजोड करत आहेत.
यासोबत करणी सेना सारख्या नवीनच अतिरेकी संघटना जन्माला घालून भविष्यात देशात अराजक माजवण्याची तजवीज करून ठेवत आहेत.याचा ट्रेलर आपण आज पाहिलेला आहेच.जेव्हा देश जळत होता.तेव्हा देशाचे नेतृत्व करणारे जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वित्झर्लंड मध्ये बर्फात फोटोग्राफी करण्यात मग्न होते.हे इतिहासात नोंदवले जाईलच.
याचसोबत म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस का आहे?
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करत आलो आहोत.प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.तेव्हा यास खरेतर लोकसत्ताक असा योग्य शब्द योजणे सुरु केले पाहिजे.सुरुवात इथून करूया.
याचा व्यापक अर्थ जरा नीट समजून घेऊया.घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच त्यावेळचे सर्वच नेते ज्यांनी ज्यांनी घटनेला मान्यता दिली ती अंमलात आणण्यासाठी होकार दिला त्या सर्वांचे अगोदर आभार मानले पाहिजेत.तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काहीही किंतु परंतु मनात न ठेवता आभार मानूया.
त्यावेळी या सर्वानीच लोकांच्या बाजूने निर्णय घेतला.स्वार्थ ठेवला नाही.त्यावेळची ही माणसे वेगळी होती.यात काही अपवाद आहेत ते बाजूला ठेवा.परंतु ज्यांनी ही अमुल्य भेट देश बांधवाना दिली त्या सर्वांचेच मनाच्या अंतकरणातून आभार मानले पाहिजेत.मी या मताचा आहे.आणि आज आपली जबाबदारी जास्त वाढली आहे.
वर म्हणल्याप्रमाणे ही लोकांची सत्ता आहे.लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणाकरता चालवलेलं गणराज्य खरेतर किती सुंदर आणि उदात्त विचार आहे हा.आणि त्याबरहुकूम जर आपली घटना राबवली आपण तसे वागलो तर या जगाच्या पाठीवर आपल्या देशाशी बरोबरी करणारा देखील कोणताच देश उरणार नाही.एवढे मोठे तत्वज्ञान आपल्या राज्यघटनेत सामावलेले आहे.गरज आहे ते प्रामाणिकपणे राबविण्याची.
म्हणून 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी फार महत्वाचा दिवस आहे.
यासाठी संविधान वाचविणे ते योग्यप्रकारे राबविणे याची दक्षता प्रत्येक जात-धर्मातील लोकशाहीप्रेमी नागरिकाने घेतली पाहिजे.
तुमचे हक्क,तुमचा नकार देण्याचा,आवाज उठवण्याचा,विरोध करण्याचा,लिहिण्याचा बोलण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य तुम्हाला केवळ आणि केवळ हे संविधानच देते बाकी कुणीही नाही.उद्या जर तेच नसेल तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा.कारण-
आज आपण सत्ताधारी भाजपने देशात जो काही धुमाकूळ घातला ते आपण सर्वांनी उघडपणे पाहिले त्यांच्या एका नेत्याचे कबुलीजबाब देखील पाहिले.यातून आपण बोध घेऊया अशा धर्माध शक्तींना आपल्या देशात थारा देता कामानये सत्ता देता कामा नये.
लक्षात ठेवा देशात यापुढे कधीही कुठेही दंगा सुरु होऊ शकतो.आपले प्रिय मुले-मुली नातेवाईक मित्र रस्त्यात कुठेही कधीही अशा हिंसक घटनांचे बळी जाऊं शकतात.याची खात्री बाळगा.अशा अप्रिय घटना घडू नये म्हणून वाईट गोष्टीना आपण थारा दिला नाही पाहिजे,
मंदिराने आपल्या आयुष्यातला प्रश्न सुटणार नाही.इतिहासातील पात्रे पुतळे स्मारके यांनी आपला प्रश्न सुटणार नाही.ना प्रगती होणार आहे.
ही खुणगाठ मनाशी पक्की करून ठेवा.लोकांची सत्ता अबाधित राखायची असेल तर जात-धर्मीय राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून न देता जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविणाऱ्या पक्षांना मतदान केले पाहिजे हेच खरे लोकसत्ताक व्यवस्थेचे भान आणि कर्तव्य आहे.
जात-धर्म-वेश-भाषा-संस्कृती विविधतेने नटलेल्या सर्वांगसुंदर देशातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार अभिव्यक्त होण्याचं निपक्ष स्वातंत्र्य बहाल करणारं संविधान !!
तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना मित्रांना सर्वांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचे मंगल हो !!
प्रजासत्ताक अन त्याचा दस्तावेज संविधान चिरायू होवो
जयभीम जय भारत जय संविधान !!

रविवार, २१ जानेवारी, २०१८

मि. मेवाणी ‘डेंजर झोन’ अहेड!

राजकारणात जितकी समीकरणं महत्त्वाची, तितकाच संयमही महत्त्वाचा असतो. त्याच सोबत असावी लागते मुत्सेद््गिरी. तगडा जनसंपर्क अन् उपद्रवमूल्य कायम राखण्याच्या भानाची. यातील काही गोष्टी राजकारणात सरावाने आत्मसात करता येतील मात्र संयम आणि मुत्सेद््गिरी अंगभूत असणे गरजेचे असते.

अलीकडेच झालेल्या गुजरात निवडणुकीत बलाढ्य मोदी-शहा जोडीला कडवं आव्हान देत राज्यातल्या दलित समुहाचा चेहरा आणि आवाज बनू पाहणाऱ्या आमदार जिग्नेश मेवाणींच्या संदर्भात विचार करताना, त्यांच्याबाबतीत समिकरणं तर चांगलीच जुळून आलीय, परंतु त्यांच्याकडे संयम नाहीये का, असा प्रश्न अलीकडच्या आक्रमक राजकारणामुळे पडू लागलेला आहे.

ते अल्पावधीतच स्वत:चं ‘पॅन इंडियन’ नेतृत्व प्रस्थापित करू पाहत असल्याचंही जाणवत आहे. महाराष्ट्रात भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवरची त्यांची सभा, दिल्लीतली मोदी सरकार विरोधातली ‘हुंकार रॅली’ ही त्यांच्यातली अधीरता स्पष्ट करणारी आहेत असे निरीक्षण नोंदवावे लागेल.दीर्घकालीन राजकारण करायचे असेल तर प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्यापेक्षा आपला मतदार संघ अधिकाधिक मजूबत करणे, त्यासोबत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे गरजेचे आहे.

जिग्नेश मेवानी यांची राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता, अगोदर ते आम आदमी पार्टीत होते. उना येथे हिंदू-गोरक्षकांकडून हिंदू-दलित तरुणांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्ह मेवानी यांनी संघर्ष सुरू केला. तेव्हा भाजमधील काही लोकांनी आम आदमी पार्टीला टार्गेट करत, या प्रकरणाला राजकीय वळण देत मेवाणींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे हानी पोहचू नये म्हणून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे राज्यव्यापी आंदोलन उभारले, जे देशभरात चर्चेचा विषय ठरले.

गुजरात इलेक्शनमध्ये जिग्नेश यांची पक्ष सोडल्यानंतरही ‘आप’ने मदत केली. कारण दोघांचा मुख्य विरोधक हा भाजप पक्ष असल्यामुळे, आम आदमी पार्टीने तिथे उमेदवार उभा केला नाही. पक्षाचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरून जिग्नेश यांना शुभेच्छा दिल्या. गुजरातमधील वडगाममध्ये झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या सहमतीमुळे जिग्नेश तिथे निवडून जाऊ शकले. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर त्यांची पहिली जाहीर सभा महाराष्ट्रातील पुण्यात झाली.

भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणांचे आरोप होत आहेत, ते बालीश अन् निराधार आहेत, ही वस्तुस्थिती असली तरीही महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील आयोजकांनी एक काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे, प्रत्येक राज्याची एक श्रवण संस्कृती आहे. शाब्दिक चकमकी झेलण्याची ताकद आहे. भारताचा विचार करू जाता, इथे भडक स्वरूपाची भाषणे देणारे जवळपास सर्वपक्षीय नेते आहेत, हे ही खरे आहे. परंतु ते आपापल्या राज्यात भाषणे देत असतात. महाराष्ट्राला जहाल भाषणांची परंपरा आहे. धर्मांची आणि व्यक्तिविशेष नावे घेऊन इथे अगदी पातळीसोडून शाब्दिक हल्ले भाषणांमधून झालेले महाराष्ट्र पहात ऐकत आलेला आहे. परंतु अशा चकमकी करणारा परराज्यातील असेल, तर लोकांची मानसिकता ही अगोदरच टोकदार अन् विरोधात उभी ठाकलेली असते. अशावेळी आपला तो ‘बाबू’ दुसऱ्याच ते ‘कार्ट’ अशी मानसिकता नेत्यांच्या बाबतही खरी ठरते, ती जिग्नेश मेवाणींच्या बाबतही तशी ठरली आहे. पुण्यातील भाषणात त्यांनी नरेंद्र मोदींवर थेट हल्ले केले आहेत.

आमदारकीच्या पहिल्याच प्रयत्नात लहान तोंडी मोठा घास घेण्याचा त्यांचा अट्टाहास अंगलट येण्याची शक्यता आहे का? एक उभारता राजकीय नेता म्हणून हा प्रश्न गांभीर्याने पाहणे अगत्याचे ठरते. मोदी बॅशिंग किंवा मोदी विरोध’ या व्यक्तीकेंद्री कार्यक्रमावर त्यांना यशस्वी राजकारण करणे शक्य आहे का? की भाजपचे एकूण बहुजनविरोधी राजकारण शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगार युवकांचे प्रश्न उद्योगधंद्यातील मंदी महागाईने होरपळलेली जनता शिक्षणक्षेत्र आंबेडकरी व इतर मागास समूहांचे शोषण इत्यादी ठळक फेल्यूर झालेले मुद्दे घेऊन भाजपला घेरता येईल? याचा विचार झाला पाहिजे.

कारण अलीकडील त्यांच्या भाषणात ते कायम मोदींना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.वरील ढोबळ राजकीय मुद्दे विचारात घेत असताना, आंबेडकरी समूहात जी एक उत्साहाची लाट आली आहे, ती मागे सारून डोळसपणे विचार व्हावयास हवा. कारण, आंबेडकरी समूह जिग्नेश मेवानीमध्ये नेतृत्व शोधत असेल, तर त्याअगोदर त्यांनी थोडे थांबले पाहिजे. जिग्नेश यांना इथला सोशलफॅब्रिक समजून घ्यायला वेळ लागणार आहे. धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीत, असे मेवानी यांनी एका मुलाखतीत म्हटलेले आहे. हे अतिशय बाळबोध अन् अपेक्षाभंग करणारे वक्तव्य आहे. आजचा आंबेडकरी समूह ज्याप्रमाणे समाजाच्या मुख्यप्रवाहात धडका देत मुसंडी मारतो आहे. तुलनेत ज्यांनी धर्मांतर केलेलं नाही, ते मागास समूह आजही चाचपडताना दिसत आहेत.

एकाच वेळी मार्क्स लेनिन अन् आंबेडकरी तत्वज्ञान त्यासोबत भगतसिंग यांचे विचार, अशा वैचारिक चक्रव्यूहात जिग्नेश सापडल्याची शक्यता आहे. यासाठी विचारांची बैठक पक्की असणे गरजेचे आहे. त्यानुसार भविष्यात समविचारी म्हणून काही विचारी प्रवाह आपणास सोबत घेता येतीलही.
परंतु त्यांचे कोलॅबरेशन करत नवीनच काहीतरी उभे करताना त्रेधा उडणार आहे, याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे.

आजच्या भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्षात उमर खालिद, शहेला रशिद, कन्हैयाकुमार यासारख्या विद्यार्थी नेत्यांचे उपद्रवमूल्य बेरजेच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत नगण्य आहे. ते काहीही करिष्मा करू शकत नाहीत, हे वास्तव सर्वानीच स्वीकारले पाहिजे.

वरील मंडळी जे तत्वज्ञान मांडू पाहतात, ते अशा लोकांसाठी योग्य असते, जे विद्यापीठीय अभ्यासक आहेत. त्यांच्या भूमिकांचे सूक्ष्म कंगोरे ते समजून घेण्याची कुवत बाळगतात.इथल्या सामान्य जनतेत ती कुवत नाही. याचाच फायदा घेऊन या जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांना विरोधकांनी फुटीरतावादी राष्ट्रविरोधी म्हणून लोकांच्या मनावर बिंबवण्यात काही प्रमाणात यश मिळवलेले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे योगदान त्याच परिघात सीमित ठेवणे योग्य राहील. सध्याच्या काळात त्यांच्याबरोबर वावरण्याची मेवानीची खेळी प्रगल्भ राजकारणाचे लक्षण मानता येईल, असे वाटत नाही. त्यांचा हा मार्ग राजकीयदृष्ट्या विघातक ठरू शकतो. नवतरुण मतदारांना अपेक्षित विधायक राजकारणाची चाहुल त्यांच्या कृतीत वा वक्तव्यांत मिळत नाही. तर या तिघांप्रमाणे त्याच विद्यापीठीय राजकारणाचा ते नकळतपणे एक भाग होऊ लागले आहेत काय? अशी चिंतायुक्त भीतीही वाटते. स्वत:चे नेतृत्व उभारायचे असेल तर त्यांनी संयमाने दीर्घकालीन राजकारण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत. मुत्सेद््गिरी दाखवली पाहिजे. वरील मुद्यांच्या विचार करता ‘जिग्नेश मेवाणी स्वत:हून राजकीयदृष्ट्या अपघातप्रवण क्षेत्रात प्रवेश करताहेत का? हा प्रश्न इथे म्हणूनच कळीचा ठरतो आहे.
पूर्वप्रकाशित दैनिक दिव्यामराठी Jan 21,2018  

शनिवार, २० जानेवारी, २०१८

भीमा कोरेगाव दंगल. आरोपी मिलिंद एकबोटे विरुद्ध पुरावे मिळाले

भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. हिंदू संघटनांनी हा हल्ला केला होता, असा सत्यशोधन अहवाल समन्वय समितीनं दिलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी ही समिती नेमली होती.
त्या ठिकाणी हजर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं. पोलिसांना ऑडिओ ,व्हिडीओ,फोटोजचे पुरावे देणार. संभाजी भिडे ,मिलिंद एकबोटे हे आरोपी असून त्यांना अटक करावी यासंदर्भातले पुरावेही पोलिसांना देणार, असं या अहवालात म्हटलं आहे.
तसंच मिलिंद एकबोटे यांनी किमया हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची तीस डिसेंबरलाच बैठक घेतल्याचे पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याचं म्हटलंय.
सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले.- दैनिक लोकमत First Published: Jan 20, 2018 04:35 PM
संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे या दोघांना ताबडतोब अटक केली पाहिजे त्यांना आता सुट्टी देवू नये.
मुख्यमंत्री जर मुख्यमंत्री म्हणून काम न करता दहशतवादी ब्राह्मण बांधवाना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर हे समस्त ब्राह्मणसमाजासाठी घातक आणि लाजिरवाणे ठरणार आहे.
बहुजन समाजात फुट पाडणारे मराठा-बौद्ध भांडण लावून विकृत इतिहास रचून तरुणांची माथी भडकावून आपली पोळी शेकणारे या सर्वांच्या मागे हा मनुवादी ब्राह्मणी मेंदू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
सदर समाजकंटक ब्राह्मण आहेत म्हणून आजवर मुख्यमंत्री आणि स्वत:च गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पाठीशी घातले अभय देत आले असे तर नाही ना? त्यांनी जातीसाठी माती खाऊ नये.
काय आहे आम्ही अन्याय अत्याचार भोगतच आलो आहोत परंतु तुमच्या वागण्यातून तुम्हीच तुमची जात आणखीन अन आणखीनच बदनाम करत आहात.याठिकाणी स्वत: ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी समाजसेवकांनी अशा समाजकंटक लोकांना थारा न देता पकडून दिले पाहिजे.आणि समाजाची होणारी संभावित बदनामी थांबवली पाहिजे.
नाहीतर येणाऱ्या पिढ्याना हाच संदेश जाईल की भारतात जातीय कलह कळी करण्यात तुमचाच हात कायम रंगत आलेला आहे.
जी गोष्ट मागील दोनशे वर्षात कधीच घडली नाही.कधी कुणाचा राग नाही.कधी साधी बाचाबाची नाही.उलट प्रत्येकवर्षी सामाजिक सलोख्यातून तिथे इतर सोयी-सुविधा सर्वच बहुजनसमाजातील घटकांनी पुरवल्या पुरवत आले आहेत.आणि रोजगारव्यवसाय देखिल निर्माण झालेला आहे.
अशा शांततेच्या वातवरणाला या विकृत मानसिकतेच्या लोकांनी गालबोट लावून सामाजिक एकतेचाच खून पाडला आहे.यात त्यांना काही जातीयवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी देखील साथ दिली.अन अशा विकृत लोकांनी फेसबुकवर पोस्टी लिहून त्यांच्यासाठी बचावात्मक पवित्रा देखील घेतला.तसेच सामना या जातीयवादी पेपरमधून भलतेच बालिश तर्क मांडणारे संजय राऊत या सर्वाना वरील अहवाल थोबाड फोडणारी सणसणीत चपराक आहे.
एकबोटेने ३० डिसेंबरलाच मिटिंग घेतली होती म्हणजे याचा अर्थ जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंसा भडकली असाही होतच नाही.त्याबद्दल तक्रार करणारे हे जातकीडे अत्यंत जातीयवादी अन पाताळयंत्री आहेत.हे याद्वारे सिद्ध झाले.याशिवाय यांच्यामुळेच दुर्दैवी राहुल फटांगळेचा मृत्यू झाला त्याबद्दल या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
आंबेडकरी समाज कायम अशा अग्निपरीक्षेतून तावून सलाखून सहीसलामत बाहेर पडला आहे.आता परीक्षा आहे इथल्या माणूस म्हणून वावरणाऱ्या पशूंची बघूया यावेळी तरी पास होतात की नेहमीप्रमाणे फेलच.

रविवार, १४ जानेवारी, २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याला आज २३ वर्षे झाली.आज माझ्यासहित अनेक तरुणांना हा लढा अस्मितेचा वाटू शकेल.हकनाक माणसे बळी गेली.
घरादाराची राखरांगोळी झाली वगैरे वस्तुस्थिती आहे.हे खरेच.
परंतु केवळ नावासाठी आम्ही भावनिक झालो होतो?
हे सत्य नाही.आम्ही गांधी विद्यापीठात शिकतो.नेहरू विद्यापीठात शिकतो.
टिळक सावरकर शिवाजी महाराज एवढेच काय बनारस हिंदू विद्यापीठातही
शिकतो.आम्ही बाटत नाही आम्हाला जातीयवाद शिवत नाही.आमची मने शुद्ध आहेत मेंदू शुद्ध आहेत.
तुम्हाला विद्यापीठ अन गुणपत्रिकेवर डॉ.बाबासाहब आंबेडकर नाव आल्याने मनात आणि डोक्यात जातीयकीडा वळ्वळू लागला होता.
हाच तो मनु जो आजही अधूनमधून आपले डोके वर काढत असतो.इतर जातीधर्माचे तुम्हाला नावही सहन झाले नाही.
हेच लोक यांचेच पूर्वज यांची आजची पिढी मुलेबाळे (तन्मयचिन्मय) आजही हीच मानसिकता घेऊन जगत आहेत.अपवादांना सलाम.
तुमच्या मागील पिढीची पापे चुका आम्ही तुमच्या माथी मारत नाही.फक्त एवढीच अपेक्षा करतो कि तुम्ही त्याच मार्गाने जावू नका.
माणूस बना.माणुसकीने वागा.हे तुमच्या कृतीत दिसले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब ब्राह्मण असते तर या देशात त्यांची मंदिरे बांधली गेली असती.
परंतु बाबासाहेबाना आजही जातीयदृष्टीकोनातून पाहिले जाते.दलितांचे नेते म्हणून पोट्रेट केले जाते.
कुणीतरी शास्त्री फास्त्री बरळतो बाबासाहेबानी घटना लिहिली नाही.कुणीतरी गावखेड्यात पुतळ्याची विटंबना करतो कुणी बाबासाहेबानी भीमा-कोरेगांवची लढाई मिथक म्हणून रचली म्हणून गरळ ओकतो.
अहवेलना आजही सुरु आहे.जातीयवाद आजही तोच आहे टोकदार आहे.काही गोष्टी जरूर बदल्या.काय तर शारीरिक अस्पृश्यता कायदा करून गेली.मात्र मनमेंदुवर अजूनही मनूचा अज्रस्त विळखा आहे.
मुख्यमंत्री ब्राह्मण आहे हा मुद्दा होऊ शकत नाही.मुख्यमंत्री जातीयवादी आहे हा मुद्दा आहे.मुख्यमंत्री भीमा-कोरेगावच्या हल्लेखोरांना पकडायचे आदेश देत नाही
मात्र प्रत्येक पोलिसस्टेशनला किमान ४० केसेस नोंद करण्याचे निर्देश देत आहेत.मुख्यमंत्री पेशव्यांचा वारसदार नाही हे त्याने कृतीतून दाखवून दिले पाहिजे होते.तसे होताना दिसत नाही.
नामांतर लढ्याने आम्हाला संघर्ष शिकवला.स्वाभिमान शिकवला.चिवटपणा शिकवला.प्रतिकूल परिस्थितीत तग धरायला शिकवले.
अन राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचे आत्मभान दिले.त्याजागी इतर समाज असता तर देश सोडून परागंदा झाला असता.
आम्ही इथेच झुंज देत आहोत.आम्ही या मातीत जन्मलो आहोत.
एवढे हाल या देशात कोणत्याच समाजाच्या वाट्याला आलेले नाहीत.याचा एकदा माणुसकीच्या नात्याने विचार करावा.नाही केला तर गिल्ट घेऊन जगणे नशिबी येते त्याला इलाज नाही.माणूस बनणे हाच अंतिम इलाज.
आता परिस्थिती बदलली आहे.समीकरणे बदलली आहेत.यापुढे अशी आंदोलने नाही झाली तर समाजाच्या हिताच्या दृष्टीने ती होणार नाहीत याची काळजी घ्यावी.आज स्मारक नामांतर हे समाजाचे विषय होऊ शकत नाहीत.
विद्यापीठ कॉलेज हॉस्पिटल्स वसतिगृह शिक्षण नोकरी ऍट्रॉसिटी हेच मुद्दे प्राधान्याने अगत्याने लढणे सोडवणे गरजेचे आहे.
असो नामांतर लढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात शहिदांना विन्रम अभिवादन
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।
कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
जयभीम जय भारत जय संविधान !!

शेवटचा मोर्चा हा शेवटचा आक्रोश (कविता)

त्यांनी संभाजींना मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी तुकोबांना मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी गांधींना मारले 
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी बाबरी विध्वंस केला
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी दंगली घडवल्या
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी गोध्रा घडवले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी करकरेंना मारलं
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी मालेगांव बॉम्बस्फोट घडवले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी दाभोलकरांना मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी पानसरेंना मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी कलबुर्गीना मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी अखलखला मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी पहलुखानला मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी रोहितवेमुलाला मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी गौरी लंकेशला मारले
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी नजीबला गायब केलेय
जबाबदारी घेतली नाही
त्यांनी भीमा-कोरेगावला दगडफेक केली
जबाबदारी घेतली नाही
ते भेकड आहेत हिंस्त्र लांडगे
नीच आहेत अमानवीय हांडगे
त्यांना आपलीच जात श्रेष्ठ वाटते
त्यांना इतर लोक गुलाम वाटतात
त्यांनी आजवर कधीच जबाबदरी घेतली नाही
ते छुपे युद्ध करत आलेत
आम्ही एकमेकांकडे संशयाने बघत आहोत
ते पसार आहेत नामानिराळे खैबरच्या गुहेत
हसत आहेत गात आहेत
आम्ही जेलमध्ये सडत आहोत
तुरुंगात स्वातंत्र्याच्या कविता लिहीत आहोत
बेड्या आमच्याच मेंदूला पडलेल्या आहेत
ते आता आमच्यातच उभे आहेत
आम्हाला चळवळ शिकवत आहेत
आमचे शोषकही तेच आमचे रक्षकही तेच बनत आहेत
अन्यायही तेच करणार बातमीही तेच देणार तपासही तेच करणार
निकालही तेच देणार अन क्रांतीचे भाषणही तेच उच्चरवात देणार
वेशांतर करावे कि देशांतर?
साखळ्या तोडायच्या की तुरूंगच घेऊन उडायचे
हा आमच्या पुढील प्रश्न आहे
प्रश्न सुटतच नाही विचार करायला वेळ नाही
साहेबांचा मात्र आदेश सुटलाय
मोर्चेकरी झेंडे घेऊन चालू लागलेत
डोळे रक्त ओकत आहेत घोषणा आग लावताहेत
पोटात ज्वालामुखीचा आगडोंब उसळलाय
शुष्क ओठांवर मानवमुक्तीचा नारा आहे
यावेळी साहेबाने कच खाऊ नये
नेटाने आपला बुडखा शाबूत ठेवला पाहिजे
गारद्यांना फशी पडू नये
बाटग्यांना भिशी देऊ नये
मालकाच्या मांडीवर बसून खेळणे मागू नये
यावेळी बुद्धाने हसले पाहिजे एकदा तरी हसले पाहिजे
हा शेवटचा मोर्चा हा शेवटचा आक्रोश

- मोर्च्यातला कार्यकर्ता

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

मी लोकशाही न मानणारे परंतु इथे "अहिंसक" मार्गाने आंदोलन करणारे लोक असतील त्यांना सोबत घेईन-प्रकाश आंबेडकर

मान.ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी बीजेपीमाझाला
Jan 6, 2018 रोजी एक मुलाखत दिली होती.
त्यात बीजेपीमाझाचे तीन पत्रकार प्रश्न विचारत होते.पैकी Prasanna Joshi यांनी बाळासाहेबांचे एक वक्तव्य कोट करत त्यांना प्रश्न विचारला.
की या देशात लोकशाही न मानणारे चालतील काय?
त्यावर प्रकाश आंबेडकरांनी समर्पक उत्तर दिलेले आहे.
त्याबद्दल पुढे स्पष्टीकरण येईल.परंतु प्रसन्न जोशी यांनी फेसबुकवर
<लोकशाही न मानणारेही चालतील-प्रकाश आंबेडकर ,
आंबेडकरांना माओवादी पेशवाईपासून वाचवाsss>
अशी पोस्ट करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला
याचा मी इथे अगोदर निषेध करतो.एकतर त्यांना ते समजले उमजले नाही किंवा त्यांनी खोडसाळपणा केलेला आहे.तिसरी कोणतीही शक्यता नाही.
त्यामुळे त्यांनी किमान माफी मागण्याची अपेक्षा बाळगतो.
मराठी भाषा वळवावी तशी वळते असे म्हणले जाते.
तसेच आपण केलेलं वक्तव्य कुठल्या परिप्रेक्षात म्हणले गेले आहे.
त्यामागची पार्श्ववभूमी काय हे कोणतेही मत बनविण्याअगोदर आपण तपासून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
तर प्रकाश आंबेडकर जे म्हणाले ती या देशातील वस्तुस्थिती आहे.
सत्य आहे.हे कुणीही नाकारू शकत नाही.आणि मी स्वतः त्याचे इथे थेटपणे स्पष्टपणे समर्थन करतो.
काय म्हणाले ते - मी लोकशाही न मानणारे परंतु इथे "अहिंसक" मार्गाने आंदोलन करणारे लोक असतील त्यांना सोबत घेईन.
त्यांच्यासोबत उभा राहीन.
या वक्त्यव्याचे स्पष्टीकरण पाहूयाच.
त्याअगोदर देशात लोकशाही न मानणारे लोक शोधूया
सगळ्यात वरचा क्रमांक आरएसएस आणि तिच्या परिघावरील हिंदुत्ववादी पक्ष संघटना ज्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बाबरी पाडली.
लोकशाहीला डांबर फासले.
दुसरे हिंदू धर्मातील कांचीपिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती जे खुनाच्या आरोपात जेलयात्रा करून आले त्यांना अटक करू नये म्हणून रास्तारोको रेलरोको करत लोकशाहीचा खून करणारे भाजपआरएसएस आणि तिच्या परिघावरील हिंदुत्ववादी पक्ष संघटना.
राजसमंद येथील शंभूलाल रेगरला शिक्षा सुनावू नये म्हणून न्यायालयाच्या इमारतीवर चढून भारताचा लाडका तिरंगा काढून धर्माचा भगवा झेंडा फडकावून लोकशाहीचा तिसरा स्तंभ असणाऱ्या न्यायालयांना फाट्यावर मारणारे कट्टर हिंदुत्ववादी.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे ज्यांना लोकशाहीच अमान्य होती शिवसेनेत लोकशाही नाही हे ते अनेकदा भाषणात स्पष्टपणे म्हणाले आहेत.त्यांची शिवसेना स्टाईल आंदोलने नंतर उगवलेली मनसे त्यांची आंदोलने.
आणि शेवटचे नक्षलवादी माओवादी खलिस्तानवादी काश्मीरमधील फुटीरतावादी ज्यांची भाजपसोबत युती आहे सत्तेत आहेत.
हे झाले हिंसक कारवाया करणारे.किंवा लोकशाही न मानणारे.
यात अंर्तभूत करा आजचे वर्तमान भाजप सरकार.
जे भीमा-कोरेगांव येथील हिंसाचारातील आरोपीना अटक करत नाही मात्र आंबेडकरी समाजातील तरुणांना कोंबिंगऑपरेशन करून मारझोड करत आहे.काही ठिकाणी तर पोलिसांनी वस्त्यांमध्ये घुसून मारहाण केली आहे.
यात आणखी एक जोडता येईल.अंनतकुमार हेगडे जो म्हणाला होता की आम्ही इथे संविधान बदलायलाच बसलेलो आहोत.वरीलपैकी सर्व लोक लोकशाही मानत नाहीत.असे स्पष्टपणे मानता येते.
मात्र संविधानाचा खुट्टा मजबूत असल्यामुळे त्यांना लोकशाहीनुसार निवडणूक लढवून सत्तेवर यावे लागते.हे सर्व आपल्या देशातील दुर्दैवी परंतु ढळढळीत वास्तव.
आता प्रकाश आंबेडकर काय म्हणाले पहा.
की जे लोक लोकशाही मानणार नाहीत परंतु अहिंसक मार्गाने आंदोलने करतील त्यांना मी सोबत घेईन हिंसक मार्गापासून परावृत्त करेन
त्यांना हिंसक पेक्षा शांततेने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेन
हे बोलताना त्यांचा रोख होता डावे-कम्युनिस्ट.(Ref.सुधीर ढवळे)
हिंसेचा मार्ग सोडून अहिंसक आंदोलने करणार असतील तर त्यात गैर काय आहे?
याचा अर्थ सरळसोपा आहे.लोकशाहीत अहिंसक मार्गानेच आंदोलने करावी लागतात.त्या अर्थाने लोकशाही न मानणारेही पाय आपटत लोकशाहीच्या कक्षेतच उड्या मारणार मारत आहेत.इथे वैचारिक चर्चा डायलॉग महत्वाचे असेच ते सुचवू पाहत आहेत.
दुसरा अर्थ असा की कम्युनिस्ट किंवा नक्षलवादी माओवादी हिंसक मार्ग अवलंबत असतील तर त्यांना आपला विरोधच असणार आहे.
परंतु ते जर "अहिंसक" मार्गाने जात असतील तर त्याचा कुणाला कशाला त्रास झाला पाहिजे?
या देशात अनेक लोक लोकशाही मानतच नाहीत.हे स्पष्ट आहे.परंतु असे असताना जरा ते हिंसा करणार नसतील तर स्वागतच केले पाहिजे न?
मग काय चुकीचे म्हणाले बाळासाहेब आंबेडकर? ते चुकीचे ठरवले जात असतील तर वर उल्लेख केलेल्या लोकशाही न मानणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार उरतो काय?

रविवार, ७ जानेवारी, २०१८

दुर्दैवी राहुल फटांगळेचा मृत्यू वढूतील हिंसाचारात झालेला आहे

दुर्दैवी राहुल फटांगळेचा मृत्यू वढूतील हिंसाचारात झालेला आहे.
त्याची चौकशी झाली पाहिजे.दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
परंतु आपण हेही विसरता कामानये हिंसाचाराची सुरुवात कुणी केली?
असं काय झालं अचानक की एका रात्रीत गावकऱ्यानी घरावर इमारतीमध्ये दगडी विटा जमा केल्या? गाव बंद ठेवण्याचे ठराव ग्रामपंचायतीने केले तसे आदेश दिले गेले.हिंसाचार करणारे हल्लेखोर बाहेरचे होते तर गावकऱ्यानी त्यांना आपल्या घरांवर इमारतींमध्ये
गोन्या भरून भरून दगड-विटांचे थर कशासाठी लावू दिले?
सकल मराठा समाजाच्यावतीने शिवप्रतिष्ठाणच्यावतीने हिंदू आघाडीच्या वतीने लाखोंच्या संख्येने जमा होण्याचे आदेश आणि मॅसेजेस कोणत्या कारखान्यात बनून वायरल केले गेले? हे पद्धतशीरपणे घडवून आणलेलं छोटे परंतु अयशस्वी युद्धच होते.ते फेल गेलं.
असं काय झालं अचानक की एका रात्रीत वढू येथे आणि इतरत्र गाड्यांवर तुफान दगडफेक केली जाळपोळ केली गेली.काही गाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे स्टिकर होते किंवा स्लोगन्स होती तरीही त्या गाड्या गावातील हिंसक जमावाने फोडल्या.
या गाड्या आंबेडकरी समाजाने भाड्याने आणलेल्या होत्या आणि त्या वरीलप्रमाणे मराठा किंवा इतर समाजाच्या असू शकतात.या स्टिकरवाल्या गाड्या फोडल्याचा कुणी इशू करत नाहीत.
मात्र ४ तारखेच्या बंद मध्ये फुटलेल्या गाड्यांचे इशू जोरजोरात केले जात आहेत.
बाबा राम रहिमला अटक करू नये म्हणून त्याच्या बावळट छपरी भक्तांनी जाळपोळ हिसाचार केला.या हिंसाचारात तब्ब्ल ३५ जणांचा बळी गेलेला होता.आणि हे सर्वच बाबा राम रहिमचेच भक्त होते.पोलिसांनी त्यात अजिबात हस्तक्षेप केलेला नव्हता.सर्व शहर जळत होते.
राहुल फटांगळेचा मृत्यू वढूतील हिंसाचारात झालेला आहे.दोनशे वर्षात अशी हिंसा घडली नव्हती ती हिंसा जाणीवपूर्वक घडवणारे कोण?.
ते यात स्वतः नामानिराळे झालेले आहेत.त्यांच्या नादानपणामुळे कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा बळी गेला.
काय साध्य झाले? तुमचं कुणीच बळी गेले नाही अन कधीच जात नाही.
अशा या समाजद्रोह्यांना काही लोक पहिल्या दिवसापासून पाठीशी घालत आहेत.
हे ओळखून समाजाने अशा समाजविघातक लोकांपासून सावध राहिले पाहिजे.ज्यांचे अजेंडे मराठा विरुद्ध बौद्ध भांडणे लावून राजकीय पोळी शेकणे आहे.ते पुन्हा समाजात विष पेरणी करण्यास सज्ज झालेले आहेत.
विवेकवादी लोकांनी त्यांचे हे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत.
ज्यांनी हिंसाचार केला गुन्हे केले आहेत त्यांना पकडून देण्यासाठी सहकार्य करावे.दोन्ही कडील अतिउत्साही पोरांना शांत करणे दोघांची जबाबदारी आहे.
यासोबत दोन्ही समाजाच्यावतीने तेढ निर्माण होणार नाही.
सामाजिक सलोखा वाढेल याची काळजी घेतली गेली पाहिजे.
२०१९ पर्यंत आणखी भयानक गोष्टी घडवून आणल्या जातील सावध आणि सजग राहूया.

Translate