हा प्रश्न वाचला कि तुमच्याही भुवया उंचावल्या असतील तर थांबा आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो.
त्यानुसारच हा प्रश्न आहे परंतु पंतप्रधान वैयक्तिक धारण करतात त्या धर्माशी या प्रश्नाचे काही देणेघेणे नाही.
त्यांना पुन्हा एकदा त्यांचा “राजधर्म” कोणता याची आठवण करून द्याविशी वाटते.अशी परिस्थिती खुद्द त्यांनीच निर्माण केलेली आहे.मागे एकदा गुजरात दंगल घडविली गेली तेव्हाही त्यांच्याच पक्षाचे त्यावेळचे दस्तूरखुद्द पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना तेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या आणि सध्या देशातील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच “राजधर्माची” आठवण करून द्यावी लागली होती.
नरेंद्र मोदी यांचे तेव्हाचे वागणे आणि आजचे वागणे यात फरक करता येत नाही. इतके सार्धम्य आहे.
नरेंद्र मोदींनी केवळ सरकारवर स्तुतिसुमने उधळणारे सरकारचे खुशमस्करे आणि आपला लाडका भक्त परिवार यांचीच काळजी व्हायची नसून सरकारवरच्या धोरणांवर नापसंती व्यक्त करत टीका करणाऱ्या,खुश नसणाऱ्या आणि मने दुखावलेल्या सामान्य नागरिकांवरही कृपादृष्टी ठेवायला हवी.कृपादृष्टी हा शब्द प्रयोग यासाठी कि मोदी सध्या कोणत्या जगात वावरतात हे सामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. तसे साहेब देशात कमीच असतात.त्यामुळे साहेबांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष अंमळ जातच नाही.मोदी अनके भाषणात “मेरे सव्वासो करोड” देशवासी असे अभिमानाने सांगत असतात.मात्र त्यांच्या कथनी आणि करणी मध्ये अनेकदा तफावत दिसून आलेली आहे.
देशात रंगलेल्या सहिष्णुता आणि असहिष्णुता या वादात सिनेअभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेत दिल्लीत मोर्चा काढून आम्ही सरकार सोबत आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.जो कि फारच हास्यास्पद आणि देशाच्या घटनात्मक व्यवस्था व प्रशासन प्रणालीसाठी काळजी करण्यासारखा ठरला आहे.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि अनुपम खेर हे भाजपा खासदार किरण खेर यांचे पती आहेत.
“देशात असहिष्णुता वाढलेली नसून काही राजकीयदृष्ट्या प्रेरित लोक देशाचे नाव मुद्दाम बदनाम करत आहेत.
आम्ही ते होवू देणार नाही.” असा अनुपम खेर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांचा दावा होता.
वास्तविक सत्तारूढ पक्षालाच कुणाला तरी ढाल करून सरकारची दिवसेंदिवस ढासळत जाणारी प्रतिमा सावरायला लागणे
हे पक्षीय लोकशाही आणि घटनात्मक प्रशासनप्रणाली असणाऱ्या देशात चिंतेचे आहे.
अनुपम खेर यांनी या वादात उडी घेतली यासाठी बिलकुल आश्चर्य किंवा सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही.
अनुपम खेर हे पत्नीधर्माला जागले कि पक्ष आणि संघटन धर्माला हा इथे खरा प्रश्न आहे.कारण पत्नी किरण खेर प्रमाणे अनुपम खेर हे सुद्धा भाजपाशी संबंधित आहेत.आणि त्याहीपेक्षा ते आरएसएसशी जास्त संबंधित आहेत असे मागेही बोलले गेले आहे..२००४ साली सेन्सोर बोर्ड CBFCच्या अध्यक्ष पदावरून त्यांना याच कारणासाठी काढले गेले होते.
यामागे कारणही असेच महत्वाचे होते. Final Solution नावाची गुजरात दंगलीवरील एक डाक्युमेंट्री होती.
तीला अनुपम खेर हिरवा कंदील देत नव्हते. गुजरात दंगलीत दोन हजाराच्यावर मुस्लिम मारल्या गेले आहेत.
हि डाक्युमेंट्री अडकविण्याची अनुपम खेर आटोकाट काळजी घेत होते.असा त्यावेळी त्यांच्यावर आरोप होता.आणि अ’खेर' त्यांच्यीच तिथून उचलबांगडी करण्यात आली.तेच अनुपम खेर आज सरकारसाठी रस्त्यावर उरतले तर आश्चर्य ते काय वाटून घ्यायचे? अनुपम खेर यांचे दुसरे सहकारी गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमानच्या खटल्यातील वादग्रस्त वक्तव्य कुप्रसिद्ध होतेच.
हेच भट्टाचार्य आंदोलनाच्या दिवशी ट्विटरवर त्यांना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या एका मुलीला देशातून हाकलले पाहिजे
असे ट्विट करताना दिसले. मधुर भांडारकर यांच्यावरील आरोप आपल्याला माहित आहेतच.तरीही यांनी त्यांचे म्हणने मांडू नये असे अजिबात नाही पण नैतिकता नावाची एक गोष्ट असते.त्याचे काय?बर आपण काय करत आहोत? तर दुषित वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक,शास्त्रज्ञ, कलाकार, इ च्या विरोधात उभे रहात आहोत. असे करणे म्हणजे स्पष्टपणे केवळ विरोधाला विरोध आहे.
दुसरे काहीनाही. आणि यातून एक वेगळाच संदेश हि मंडळी देवू पाहत आहेत.जो घातक आहे.हा एक प्रकारचा फासीवादच आहे.जे सभ्य लोक पुरस्कार परत करणाऱ्यांना विरोध करत आहेत ते खरोखरच नैतिकदृष्ट्या सभ्य आहेत काय?
अनुपम खेर यांनी ज्या लोकांना सहिष्णुता आणि देशाची बदनामी रोखण्यासाठी गोळा केले होते,ते गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे वार्तांकनासाठी आलेल्या महिला पत्रकाराला घेराव घालून अत्यंत गलीच्छ भाषेत शिवीगाळ करताना दिसले.सदर घटनेच्या चित्रफिती सोशल साईटवर व्हायरल झाल्या आहेत.
पुरस्कार परत करणार्यांना “चपला मारा” “हाकलून लावा” अशा घोषणा परिसर दणाणून सोडत होत्या.
यामुळे आंदोलनाचा अक्षरशः फज्जा तर उडालाच.परंतु अनुपम खेर यांनी सहिष्णुता दाखविण्यासाठी मोर्चा काढला होता कि
असहिष्णुता दाखविण्यासाठी हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.त्यामुळे त्यांचा हा स्टंट अत्यंत हास्यास्पद ठरला यात काही वादच नाही.
मुळात ‘सहिष्णुता’ आणि ‘असहिष्णुता’ हे अवघड शब्द सामान्य माणसांच्या पचनी पडत नाहीत.
रोजच्या व्यवहारात ते वापरात नसल्यामुळे नेमके काय चालूय हे अनेक सामान्यांना ठाऊक नाही.अनेकांनी याबाबत विचारणा केलेली आहे. “सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?”यासाठी सहिष्णुता आणि असहिष्णुता असे बोजड आणि अप्रस्तुत शब्द टाळून मूळ वातवरणास चपखल काय आहे ते शब्द योजले पाहिजेत.आणि सध्याच्या वातावरणात धर्माचा आधार घेत “बेकायदेशीर खून करणे” आणि “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच बाळगणे”म्हणजे बोलण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार नाकारणे हे शब्द चपखल आहेत.
या बिघडलेल्या दुषित वातावरणाचा निषेध सर्व प्रथम लेखक साहित्यिकांनी केला त्याचे कारण हेच आहे.
कि त्यांचा अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिवसेंदिवस आकसत चालला आहे.या ना त्याप्रकारे त्यांना धमक्या देवून लेखन करण्यापासून रोखले जात आहे.हे लेखन करत नसलेल्या सामान्य माणसाला माहित असण्याचे कारण नाही.
ज्यादिवशी वास्तव समजेल तेव्हा देशात सामान्य माणसांच्या रोषाची त्सुनामी येवू शकते.
देशात असहिष्णुतेचे वातावरण नसून असे काहीच होत नाही असा दावा सरकार आणि त्यांच्या समर्थकाकडून वारंवार केला जातो आहे.आरएसएस प्रमुख भागवतांनी दसऱ्याला हेच सांगीतले कि सगळे शांत आहे देश प्रगती करत आहे.
ज्या देशात साठ वर्षे वयावरील वृद्धास तो केवळ दलित आहे या कारणे तो मंदिरात गेला म्हणून
रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले जाते.जातीयवादातून दीड वर्षे आणि चार वर्षे वयाच्या लहानग्यांना
रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले जाते.जातीयवादातून दीड वर्षे आणि चार वर्षे वयाच्या लहानग्यांना
झोपेत असताना पेट्रोल टाकून पेटवून दिले जाते.चार वर्षे वयाच्या दलित मुलाचा हात चुकून जेवणाच्या ताटाला लागला म्हणून मरेपर्यंत बेदम मारले जाते.धर्मावर टीका करतो म्हणून दलित लेखकास बोटे छाटण्याच्या
जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
बीफ मुद्यावर सरकारवर टीका केली म्हणून अभिनेत्रीला बलात्कार करू
नग्न धिंड काढू अशा धमक्या दिल्या जातात.बीफ खाणाऱ्याचे मुंडके छाटू पाकिस्तानला पाठवू अशी धमकी दिली जाते.
शिक्षणाचे भगवेकरण केले जावे हे उघड बोलल्या जातेय.उच्च शिक्षणातील स्कॉलरशिप या अगोदरच बंद केली गेलीय.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव कृत्रीमरीत्या वाढवून सरकारच त्या कमी भावात विकत आहे.
या सर्व घटनांच्या विरोधात बोलले तर अशा लोकांना पाकिस्तानी एजेंट म्हणायचे.
पाकिस्तानात चालते व्हा म्हणायचे.हे भारताचे तालिबानीकरण नाहीतर काय आहे.
पाकिस्तानात चालते व्हा म्हणायचे.हे भारताचे तालिबानीकरण नाहीतर काय आहे.
समाजसुधारकांच्या हत्या आणि या अगोदर झालेल्या दलित ह्त्यांबद्दल.तर काहीच म्हणने नाही
कारण ते फार जुने झाले आत हे जे आहे ते मागील महिन्यातील आहे.हि सर्व सहिष्णुतेची लक्षणे आहेत काय?
याची उत्तरे सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी द्यायला हवीत.ज्यांना सहिष्णुता काय असते हेच माहित नाही.
ते असहिष्णुता कुठे आहे..कुठे आहे असे विचारत आहेत.या सर्व घटना काय सांगत आहेत?
ज्यांचा कुणी मारला गेलेला नाही, ज्यांना कधी धमक्या मिळालेल्या नाहीत.
ज्यांचा कुणी मारला गेलेला नाही, ज्यांना कधी धमक्या मिळालेल्या नाहीत.
ज्यांच्या देशभक्तीवर संशय घेतला जात नाही.आपले मरण कुठून येईल याची ज्यांना भीती नसते.
अशा टिनपाट लोकांना काय कळणार आहे असहिष्णुता कशाशी खातात ते.आता या सरकार पुरस्कृत दडपशाहीच्या विरोधात निवृत्त सैनिकांनी उडी घेतली आहे.अतुलनीय शौर्य आणि साह्सासाठी त्यांना मिळालेली पदके ते सरकारला परत करणार आहेत.भारतीय इतिहासात पदक मान चिन्ह पुरस्कार सरकारचा निषेध व्यक्त करत परत करण्याचे हे कृत्य दुर्मिळ आणि पहिलेच असावे.देशासाठी सर्वोच्च योगदान दिलेल्या या सैनिकांच्या भूमिकेवरही आत संशय घेतला जाईल काय?
लोकांनी या अगोदरचे सरकार साठ वर्षे कसेबसे सहन केले आणि कंटाळून यांना सत्ता दिली तर या सरकारने लोकांचा अवघ्या वर्षभरात भ्रमनिरस केला.आणि लोकांना कंटाळण्यास भाग पाडले.सत्ताधारी पक्षात असूनही सत्ताधारी नेते शीर कापण्याच्या धमक्या उघड देतात आणि देशाचे पंतप्रधान त्याबद्दल ब्र देखील काढत नाहीत.गंमत म्हणजे पंतप्रधान पुरस्कार परत करणार्यांना भेटायचे सौजन्य दाखवत नाहीत,
मात्र पुरस्कार परत करणार्यांच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या अनुपम खेर आणि
त्यांच्या चौकडीला तत्पर वेळ दिला जातो.हा संदेश जाणे अत्यंत वाईट आहे याचे भान पंतप्रधानाना आहे कि नाही?
पंतप्रधान टीका ऐकण्यास घाबरतात काय? कि त्यांचे कान एवढे सक्षम नाहीत?
याचा अर्थ नरेंद्र मोदींनी केवळ सरकारवर स्तुतिसुमने उधळणारे सरकारचे खुशमस्करे आणि आपला लाडका भक्त परिवार यांचीच काळजी जास्त आहे असे स्पष्ट दिसत आहे.
असे वागणे त्या पदासाठी नक्कीच भूषणावह नाही.
पंतप्रधानांचा नेमका धर्म कोणता आहे ? हे आता त्यांनीच आपल्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे.
- मिलिंद धुमाळे
पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा